- सार्थ श्री ज्ञानेश्वरी: प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे
भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी किती सुंदररीत्या अर्जुनाचं समुपदेशन (काऊन्सिलिंग) केलं आहे! या भगवद्गीतेच्या आधारावर उभारलेला अप्रतिम ग्रंथ म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’ होय. यात संत ज्ञानेश्वरही ही समुपदेशकाची, गुरूची भूमिका किती उत्कृष्टरीत्या बजावतात! त्याविषयी काय बोलावं! उदाहरण म्हणून अठराव्या अध्यायातील काही ओव्या पाहूया…
ज्ञानदेव म्हणतात, ‘हे धनंजया, भाग्याने कदाचित ऐश्वर्याची जोड होते; परंतु त्या जोडलेल्या ऐश्वर्याचा उपभोग कसा घ्यावा हे एखाद्यासच समजते.’ ती मूळ ओवी अशी –
‘तरी निधान जोडावया।
भाग्य घडे गा धनंजया।
परी जोडिलें भोगावया।
विपायें होय॥’
ओवी क्रमांक १४७५
हे स्पष्ट करण्यासाठी ते लगेच दाखला देतात. (समुद्रमंथनाच्या वेळी) क्षीरसागरासारखे अप्रितम भांडे विरजताना देवदैत्यांना किती श्रम पडले! त्या श्रमाचे फळही त्यांना अमृतरूपाने मिळाले; परंतु ते जतन करण्याची हातोटी चुकली नि अमरत्वासाठी प्राप्त करून घेतलेले अमृत मरणाला कारण झाले. ज्ञानेश्वर अजून एक दृष्टान्त देतात. नहुषु नावाचा राजा यज्ञादिक कष्ट करून स्वर्गाचा अाधिपती झाला; परंतु तेथील वागणुकीची पद्धत न समजून भांबावून जाऊन सर्पयोनीत गेला. नहुषु स्वर्गाधिपति जाहला। परी राहाटीं भांबावला। तो भुजंगत्व पावला। नेणसी कायी? ओवी क्र. १४७९, पुढे येतं ‘हे किरीटी, गाय उत्तम मिळाली तरी तिचे दूध काढण्याची हातोटी माहीत असली तरच ती दूध देईल.’ ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचे विवरण करताना हे तत्त्व सांगितले आहे ते आजही किती उपयोगी, दिशादर्शक व मौलिक आहे! आजचा माणूसही वेगवेगळ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी खूप कष्ट करतो; परंतु त्या कष्टांबरोबर त्याच्याकडे त्या मिळवण्यासाठी हातोटी हवी. पुन्हा मिळवलेल्या गोष्टी जतन करण्याचेही कसब त्याच्याकडे हवे! अगदी अलीकडील काळात मानसशास्त्रात Emotional Quotient अर्थात ‘भावनांक’ ही संकल्पना महत्त्वाची ठरली आहे. माणसाला यशस्वी होण्यासाठी बुद्धिमत्ता महत्त्वाची आहे, तितकीच किंबहुना अधिक महत्त्वाची आहे भावनिक क्षमता म्हणजे इतर माणसांशी जुळवून घेणं, समायोजन, सुसंवाद इ. ज्ञानदेव ज्ञानेश्वरीच्या रूपाने अर्जुनाच्या जोडीने सार्यांना E.Q.ने असं शहाणं करतात. त्यांनी केलेला उपदेश पूर्वी उपयोगी पडला, आजही त्याचं महत्त्व आहे व उद्याही तो लोकांना मार्गदर्शक ठरेल. म्हणून ज्ञानदेव हे कालातीत असे समुपदेशक ठरतात, कारण ‘भगवद्गीता’ व ‘ज्ञानेश्वरी’ हे ‘अक्षर’ ग्रंथ आहेत.