Tuesday, May 20, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

किरीट सोमय्यांच्या कार्यालयात ७ लाखांचा अपहार

किरीट सोमय्यांच्या कार्यालयात ७ लाखांचा अपहार

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मुलुंडमधील कार्यालयात ७ लाखांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. विरोधकांच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करणा-या किरीट सोमय्या यांच्या मुलुंड येथील कार्यालयात श्रवण यंत्राचा घोटाळा झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. कार्यालयातील दोन कर्मचा-यांनी संगनमताने ‘ऐका स्वाभिमानाने’ उपक्रमांतर्गत राबवण्यात येणा-या श्रवणयंत्र वाटपातील जवळपास साडेसात लाखांच्या मशीनचा परस्पर अपहार केला. ही बाब कार्यालय प्रमुखांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे.


सोमय्या यांच्या निर्मलनगर, मुलूंड पूर्व कार्यालयाचे प्रमुख प्रफुल्ल कदम यांच्या तक्रारीवरुन नवघर पोलीस ठाण्यात गुरुवारी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तक्रारदार कदम हे २०१७ पासून सोमय्या यांचे कार्यालयातील कामकाज पाहतात. २०१७-२०१८ पासून सोमय्या यांच्या संस्थेमार्फत ऐका स्वाभिमानाने या उपक्रमांतर्गत कानाचे मशीन ५०० रुपये दराने ज्येष्ठ नागरिकांना दिले जातात. कॅम्पचे आयोजन करुन मशीनचे वाटप होते. कार्यालयातील प्रज्ञा जयंत गायकवाड (३७) आणि श्रीकांत रमेश गावित (३६) यांची प्रकल्प प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. गायकवाड आणि गावित त्याचा हिशोब कदम यांना देतात. मिळालेली रक्कम बॅंकेत जमा केली जाते. काही दिवसांपूर्वी कदम यांनी प्रज्ञा यांच्याकडे किती मशीन शिल्ल्क आहे? याबाबत विचारले. त्यांनी सर्व मशीनचे वाटप झाल्याचे सांगितले. मात्र, कदम यांना संशय आल्याने त्यांनी तपासणी केली. तेव्हा १ हजार ४७२ मशीनची जवळपास ७ लाख ३६ रुपयांची तफावत आढळली. दोघांकडे जाब विचारताच त्यांनी अपहार केल्याची कबुली दिली आहे.

Comments
Add Comment