Tuesday, June 17, 2025

कल्याणमध्ये चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला; श्रीसप्तश्रृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू

कल्याणमध्ये चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला; श्रीसप्तश्रृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू

कल्याण : कल्याण पूर्वमधील श्रीसप्तश्रृंगी या चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये तीन महिलांसह एका दीड वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे. जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथक, पालिका अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिका-यांनी अथक प्रयत्नांनी आठ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काहींना वाचविण्यात अपयश आले. अद्यापही काही जण ढिगा-याखाली अडकल्याची शक्यता असल्याने बचाव मोहीम सुरुच आहे.



या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. इमारत जुनी असल्याची माहिती समोर आली असून त्याची स्थिती लक्षात घेता इतर रहिवाशांचीही काळजी घेतली जात आहे.


दरम्यान श्रीसप्तश्रृंगी इमारत ही धोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आली होती. प्रशासनाने इमारत रिकामी करण्याचे आदेशही दिले होते. तरी काही कुटुंब तेथे वास्तव्यास होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा