- प्रा. प्रवीण पांडे, अकोला
सहाव्या अध्यायामध्ये बंकटलालाने श्री महाराज व इतर मंडळींना मळ्यामध्ये मक्याची कणसे खावयास नेले. तिथे कणसे भाजण्याची तयारी केली आणि कणसे भाजण्याकरिता आगट्या पेटविल्या. आजूबाजूला चिंचेचे मोठे वृक्ष होते. त्यावर मधमाश्यांचे मोहोळ (पोळे) लागलेले होते. आग आणि धुरामुळे त्या आग्या मोहोळाच्या विषारी माश्या उठल्या व लोकांना चावू लागल्या. माश्यांना पाहून लोक घाबरून पळू लागले. श्री महाराज मात्र निर्धास्त बसून होते. त्या विषारी माश्या श्री महाराजांच्या अंगावर बसल्या आणि श्री महाराजांना चावू लागल्या. पण महाराज तिथून उठले नाहीत. त्या असंख्य विषारी माश्या चावल्या. त्यांचे काटे श्री महाराजांच्या शरीरात रुतून बसले. श्री महाराजांनी विचार केला की माशी देखील मीच. मोहोळ ही मीच आणि कणसे सुद्धा मीच. सर्व ठिकाणी तत्त्व एकच आहे. सच्चीतानंद स्वरूप. हा सर्व प्रकार बंकटलाल दुरून पाहत होता. तो मात्र तिथून पळून गेला नाही आणि बंकटलालाने श्री महाराजांजवळ येण्याची तयारी केली. हे पाहून श्री महाराजांनी मधमाश्यांना निघून जाण्यास व बंकटलाल ह्यास न चावण्याचे सांगितले आणि काय आश्चर्य, त्या सर्व मधमाश्या मोहोळावर जाऊन बसल्या. बंकटलाल महाराजांजवळ आला. श्री महाराजांना असंख्य माश्या चावल्याचे पाहून बंकटलाल अतिशय दुःखी झाला. हे पाहून श्री महाराजांनी त्यास समजविले व महत्त्वाचा बोध दिला.
श्री महाराज म्हणतात :
महाराज त्या पाहोनी।
बोलते झाले हासोनी।
वा खूप केलीस मेजवानी।
आम्हासी तू माश्यांची ।। २७।।
अरे ते जीव विषारी।
बैसले माझ्या अंगावरी।
माझ्यापासून झाले दुरी।
लडू भक्त येधवा ।।२८।।
याचा करी विचार।
संकट आल्या कोणावर।
कोणी न साह्य करणार।
एका ईश्वरा वाचूनी ।। २९।।
बंकटलाल. स्वतः फार दुःखी झाला होता. त्याने महाराजांना विचारले की, अंगातील काटे काढावयास सोनार बोलावितो. सोनार आले आणि शरीरातील काटे शोधू लागले. पण ते विषारी काटे शरीरात रुतून बसले भहोते.
श्री महाराज त्यांना म्हणाले की, हे काटे तुम्हाला दिसणार नाहीत व चीमट्यांनी निघणार नाहीत. महाराजांनी चमत्कार दाखविला. श्वास रोखून धरला आणि योग सामर्थ्याने शरीरातील काटे बाहेर आले हे पाहून लोकांना आश्चर्य वाटले आणि स्वामींची योग्यता कळली. असेच श्री महाराजांच्या योग सामर्थ्याचा उल्लेख वेगवेगळ्या ठिकाणी उल्लेखिलेला आढळतो. श्री महाराज अत्यंत वेगाने चालत चालत अनेक कोस काही क्षणात पोहोचत असतं ह्याबाबत माहिती मिळते. एकदा श्री महाराज आकोट येथे संत श्री नरसिंग महाराजांना भेटावयास गेले. हे देखील महान संत असून त्यांचे मोठे मंदिर आकोट येथे आहे. आणि ह्या मंदिरातच श्री गजानन महाराजांना ज्या पाण्याने वर येऊन अंघोळ घातली होती ती ‘मनकरणा’ विहीर देखील आहे. श्री गजानन महाराज आणि नर्सिंग महाराज ह्यांचे खूप जवळचे संबंध होते. ते दोघे एकमेकास बंधू म्हणत असतं. अकोट येथे गजानन महाराजांनी श्री नर्सिंग महाराजांशी हितगुज करताना कर्म मार्ग, योग मार्ग आणी भक्ती मार्ग ह्याबद्दल सांगितले. तसेच ह्या जीवनात कसे वागावे हे देखील सांगितले.
तुम्हा आम्हा कारणे ।
जे का धडीले इशाने ।
तेच आहे आपणा करणे ।
निरालस पणे भूमीवर ।। ७५ ।।
श्री नरसिंह महाराज यांनी श्री गजानन महाराजांना अकोट येथे वरचेवर यावे ह्याबद्दल विनंती केली. श्री नरसिंग महाराज हे देखील मोठे अधिकारी संत होते. त्यांना श्री गजानन महाराजांच्या योग सामर्थ्याबद्दल आणि अधिकाराबद्दल संपूर्ण माहिती होती हे खालील ओव्यांमधून कळते. श्री नरसिंग महाराज विनंती करतांना श्री गजानन महाराजांना म्हणतात :नंदीग्रामा राहिला भरत ।
रघुपतीची वाट पाहात ।
तैसाच मी या आकोटात ।
राहून पाहतो वाट तूझी ।। ७७।।
तुला येथे यावया ।
अशक्य काही नाही सदया ।
अवघ्या आहेत योग क्रिया ।
अवगत तुला पहिल्यापून ।। ७८ ।।
पद न लाविता पाण्याप्रत ।
योगी भरधाव वरूनी पळत ।
क्षणामाजी फिरुनी येत ।
शोधून अवघा त्रिभुवना ।। ७९ ।।
ऐसे हितगुज उभयतांचे ।
रातेभरी झाले साचे ।
भरते आले प्रेमाचे ।
दोघांचीया संगमी ।। ८०।।
क्रमशः