‘प्रहार’ नाशिक आवृत्ती प्रथम वर्धापन दिन विशेष
- डॉ. सुकृत खांडेकर, संपादक
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून दैनिक प्रहारची स्थापना पंधरा वर्षांपूर्वी मुंबईत झाली. दि. ९ ऑक्टोबर २००८ रोजी प्रहारचा पहिला अंक प्रकाशित झाला. पाठोपाठ प्रहारची सिंधुदुर्ग आवृत्ती आणि रत्नागिरी आवृत्ती दि. ९ नोव्हेंबरला सुरू झाली. प्रहार म्हणजे राणे, हे माध्यम क्षेत्रात व सार्वजनिक जीवनात समीकरण बनले आहे. मुंबई व कोकणातील मराठी माणसाचा आवाज व सर्वसामान्यांचा आधार म्हणून प्रहार गर्जना करू लागला.
नारायण राणे हे लढाऊ व आक्रमक नेते म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. ते कोणाची पर्वा न करता आपली भूमिका रोख ठोकपणे मांडत असतात. तीच भूमिका प्रहारच्या मध्यमातून मांडली जात आहे. अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी जनतेचा आवाज राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रहार करीत आहे. ‘शब्दांना सत्याची धार’ हे प्रहारचे ब्रीद वाक्य असून तोच मंत्र हाती घेऊन प्रहारची वाटचाल चालू आहे. कोरोना संकटाच्या काळात सर्वच प्रसार व प्रसिद्धीमाध्यमांना मोठा फटका बसला. दोन-अडीच वर्षे या संकटाची माध्यमांना विलक्षण झळ बसली. अनेक वृत्तपत्रे बंद पडली. अनेक मोठ्या वृत्तपत्रांनी आपल्या काही आवृत्त्या बंद केल्या. अनेकांनी साप्ताहिक पुरवण्यांची संख्या कमी केली किंवा त्या बंद केल्या. कॉस्ट कटिंग म्हणून पत्रकार व कर्मचारी यांची नोकर कपात मोठी झाली. वेतन व मानधनावर परिणाम झाला. वृत्तपत्रांचा प्रमुख आधार असलेल्या जाहिरातींचे उत्पन्न कमालीचे घटले. दैनिक वृत्तपत्रांचे खप प्रचंड घसरले. अनेक साप्ताहिके दिसेनाशी झाली. पण प्रहार कधीच डगमगला नाही.
राणे प्रकाशनचे सर्वेसर्वा नारायण राणे तसेच संचालक निलेश राणे व नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहारची वाटचाल चालूच राहिली. संकटांना टक्कर देत आणि त्यावर मात करीत प्रहार गेल्या वर्षी नाशिकच्या भूमीवर येऊन पोहोचला. कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस महाराष्ट्रात मराठी भाषा दिन म्हणून साजरा होतो. याच शुभदिनाला गेल्या वर्षी २७ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रहारने गोदाभूमीवर प्रवेश केला. इतर वृत्तपत्रे आवृत्त्या बंद करीत असताना प्रहारने मात्र नाशिक आवृत्ती काढण्याचे धाडस केले व प्रहार उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे व नंदुरबारपर्यंत पोहोचला आहे. प्रहारचे महाव्यवस्थापक मनिष राणे, प्रशासन व लेखा विभाग प्रमुख ज्ञानेश सावंत, वितरण विभाग प्रमुख शाहिद अख्तर, तसेच जाहिरात विभाग प्रमुख दिनेश कहर, कौशल श्रीवास्तव, किशोर उज्जैनकर आणि त्यांच्या टीमने घेतलेले परिश्रम मोलाचे आहेत.
नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील वाचकांसाठी जास्तीत जास्त पाने व स्थानिक वृत्त देण्याचा आमचा प्रयत्न आहे. उत्तर महाराष्ट्राच्या दैनंदिन जीवनाचे प्रतिबिंब प्रहारमध्ये पडावे यावर आमचा कटाक्ष आहे. नाशिकमध्ये पाऊल ठेवताना वितरण क्षेत्रातील आघाडीचे मान्यवर देवदत्त जोशी यांचे आम्हाला मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रहारच्या मुंबई आवृत्तीच्या पहिल्या अंकात पहिल्या पानावर या वृत्तपत्राचे सल्लागार संपादक नारायण राणे यांनी स्वत: ‘प्रहार आपल्या दारी…’ या मथळ्याखाली संपादकीय लििहले आहे. त्यात त्यांनी प्रहार आम्ही का सुरू करीत आहोत, हे सांगताना म्हटले आहे की, महाराष्ट्रात अनेक मराठी दैनिके आहेत, प्रहारची यापैकी कोणाशीही स्पर्धा नाही. प्रहार आपले स्वत:चे अस्तित्व या क्षेत्रात निर्माण करील.
वृत्तपत्र ही एक अजोड ताकद आहे, याची मला जाणीव असल्यामुळेच त्याचा वापर योग्य ठिकाणी होण्याकडे माझा कटाक्ष राहील. माणसातील चुका व दोष दूर करण्याचा प्रयत्न व्हावा, पण त्या व्यक्तीला संपविण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी आमची विचारसरणी राहील. महाराष्ट्र हे एक लोककल्याणकारी राज्य व्हावे व त्यामध्ये प्रहारचाही सहभाग असावा, अशी प्रहार मागची माझी भावना आहे.
एक समर्थ महाराष्ट्र घडविण्यासाठी मी हे वृत्तपत्र सुरू करीत आहे. महाराष्ट्राच्या सार्वांगीण विकासासाठी ज्ञानाचे प्रबोधन व्हावे व वस्तुस्थितीच्या आधारित बातम्या द्याव्यात, यासाठी आपले वृत्तपत्र असावे अशी मी इच्छा व्यक्त केली होती. निलेश व नितेश यांनी ती पूर्णत्वास नेली व राणे प्रकाशनच्या विद्यमाने प्रहार प्रकाशित होत आहे. हे वृत्तपत्र निर्भीडपणे व आक्रमकतेने राज्याच्या विकासाकडे लक्ष देऊन व विकासाच्या आड येणाऱ्यांवर, राज्यातील जनतेची लूट करणाऱ्यांवर आणि राज्याच्या मालमत्तेची लूट करणाऱ्यांवर प्रहार करील…. राजकारणात कायमचा शत्रू कोणीच नसतो, पण विरोधक असू शकतात, हे सूत्र लक्षात ठेवावे लागते मात्र जे स्वार्थी राजकारणापायी व सत्तेच्या लोभापायी जनहिताच्या मुळावर येतात, जनहिताशी प्रतारणा करतात, त्यांच्यावर जोरदार प्रहार करून त्यांना उघडे पाडण्याचे काम प्रहार करीत आहे. जे धोका देतात, जे विश्वासघात करतात, त्यांना कधी सोडायचे नाही, हा मंत्र प्रहारने कायम जपला आहे.
प्रहार हे दर्जेदार परिपूर्ण दैनिक असले पाहिजे यावर राणे परिवाराचा कटाक्ष असतो. प्रहारचा कागद, छपाई ही चांगली असलीच पाहिजे, प्रहारमधील बातम्या, लेख, साहित्य, स्तंभलेखन हे दर्जेदार असले पाहिजे, याची नेहमीच काळजी घेतली जाते. समाज घडवताना वृत्तपत्राचे काम मोलाचे असते म्हणून सत्यता व गुणवत्ता या दोन्ही निकषांना प्रहारने नेहमीच महत्त्व दिले आहे. प्रहार हे राणे परिवाराचे माध्यम क्षेत्रातील राजकीय शस्त्र आहे तसेच प्रहारने मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, परंपरा, यांचा नेहमीच सन्मान केला आहे. मराठी भाषा आणि मराठी अस्मिता हा मराठी माणसाचा अभिमान आहे, याची प्रहारने सदैव जाणीव ठेवली आहे.
प्रहार व्यासपीठ हे इतरांपेक्षा प्रहारचे वेगळेपण आहे. जनतेला, सर्वसामान्य वाचकांना प्रहारने आपली मते मांडण्यासाठी खुले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. दर आठवड्याला प्रहारमधून दैनंदिन जीवनातील घडामोडींवर एक प्रश्न विचारला जातो व वाचकांची मते मागवली जातात. बस, रेल्वे प्रवास, स्वच्छता, फेरीवाले, अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, शासकीय योजना व जनतेच्या अपेक्षा असे अनेक विषय व्यासपीठावरून मांडले गेले व त्यातून वाचकांना त्यांची मते मांडण्याची संधी मिळाली. प्रहार व्यासपीठचा शासकीय यंत्रणा व राज्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनाही उपयोग होतो. त्यातून जनतेची नाडी काय आहे, हे समजून येते. धकाधकीच्या जीवनात अाध्यात्माची ओढ वाढते आहे. समर्थ कृपा आणि साई श्रद्धा – विलास खानोलकर, अध्यात्म – ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज, जीवन संगीत – सदगुरू वामनराव पै, महिमा गजाननाचा – प्रा. प्रवीण पांडे, सार्थ श्री ज्ञानेश्वरी – प्रा. मनीषा रावराणे असे मान्यवर यात लेखन करीत आहेत. प्रहारची तर रविवारी प्रसिद्ध होणारी कोलाज पुरवणी ही वाचकांची साहित्यिक मेजवानी असते. कोलाज पुरवणीत लिहायला मिळावे म्हणून अनेक मान्यवर लेखक रांगेत उभे आहेत. मृणालिनी कुलकर्णी (गुलदस्ता), सतीश पाटणकर (कोकणी बाणा), श्रीनिवास बेलसरे (नॉस्टॅल्जिया), दीपक परब (ऐकलंत का), डॉ. रचिता धुरत (डॉक्टरांचा सल्ला), पल्लवी अष्टेकर (ओंजळ), प्रियानी पाटील (स्वयंसिद्धा), अॅड. रिया करंजकर (क्राइम), डॉ. लीना राजवाडे (हेल्थ केअर), मंगेश महाडिक (भविष्य), प्रा. प्रतिभा सराफ (प्रतिभा रंग), रमेश तांबे (कथा), देवबा पाटील-कथा, एकनाथ आव्हाड-कविता आणि काव्यकोडी, पूनम राणे-कथा असा मान्यवरांचा खजिना कोलाजमध्ये आहे. शिवाय मुलांसाठी किलबिलची धम्माल आहेच.
दर रविवारी प्रसिद्ध होणारी आमची शाळा, खूपच लोकप्रिय झाली आहे. शाळेची गौरवशाली परंपरा, शाळेने मिळवलेले यश आणि केलेली प्रगती यांची दखल या सदरात घेतली जाते. प्रहार मंथन ही दर रविवारी वाचकांना वैचारिक व बौद्धिक पुरवणी आहे. त्यात डॉ. वीणा सानेकर (मायभाषा), अनघा निकम, (दृष्टिक्षेप), अर्चना सोंडे (दि लेडी बॉस) यांचे स्तंभ आहेत. दर शनिवारी रिलॅक्स ही प्रहारची मनोरंजन पुरवणी प्रसिद्ध होते. त्यात नंदकुमार पाटील (कर्टन प्लीज), महेश पांचाळ (गोलमाल), रूपाली हिर्लेकर (मनातील कवडसे) तसेच हॉटेल विश्व आणि टीव्ही मालिकांमधील ताज्या घडामोडी या पुरवणीचे वैशिष्ट्य आहे. याखेरीज अल्पेश म्हात्रे (मुंबई डॉट कॉम), मीनाक्षी जगदाळे (फॅमिली कौन्सिलिंग), संतोष वायंगणकर (माझे कोकण), उमेश कुलकर्णी (अर्थभूमी), प्रासंगिक (रवींद्र तांबे) आणि मुंबई ग्राहक पंचायत हे स्तंभ ही प्रहारची शान आहे.
प्रादेशिक व राष्ट्रीय घडामोडींवर विश्लेषण करणारे स्टेटलाइन व इंडिया कॉलिंग हे अस्मादिकांचे स्तंभ अनुक्रमे दर रविवारी व बुधवारी प्रहारमध्ये प्रसिद्ध होतात. प्रहारचा नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील प्रवास येत्या वर्षात वाचक, जाहिरातदार व वितरक यांच्या सहकार्याने अधिक वेगाने होईल, असा आम्हाला विश्वास वाटतो.