भगूर (प्रतिनिधी ): येत्या पंधरा दिवसांच्या आत भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील क्रांतिकारकांचे मुकुटमणी, द्रष्टे समाजसुधारक, प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान भगुरला अधिकृतरित्या पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणार असून त्याचबरोबर थीम पार्क आणि म्युझियमसाठी पाच कोटी रुपये देत असल्याची घोषणा मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी केली. तसेच थीम पार्क देखील पुढच्या वर्षी २८ मे रोजी पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन यावेळी लोढा यांनी दिले. नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे स्वा. सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त पर्यटन विभागाद्वारा आयोजित पदयात्रा व अभिवादन कार्यक्रमाला संबोधित करताना लोढा यांनी ही माहिती दिली.
भगूर येथे भव्य अभिवादन पदयात्रा व कार्यक्रमाचे आयोजन पर्यटन विभागातर्फे करण्यात आले होते. या कार्यक्रमास पर्यटनमंत्री लोढा, ‘विवेक व्यासपीठाच्या अश्विनी मयेकर आदींसह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर, असंख्य सावरकरभक्त नागरिक, कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते. भगूर येथील गेली अनेक वर्षे अपूर्णावस्थेत असलेले थीम पार्क हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आपल्याकडे हस्तांतरित करून घेत असून त्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होत असल्याची माहिती लोढा यांनी दिली. सावरकर संस्कार तीर्थ परिक्रमा यात भगुर, त्यानंतर पुणे, सांगली, रत्नागिरी आणि मुंबई अशा स्थळांचा समावेश असेल.. त्यानंतर १५ दिवसांच्या आत भगुर पर्यटन स्थळ घोषित होईल. त्याचबरोबर १० हजार स्क्वेअर फूटचे म्युझियम मे २०२४ मध्ये पूर्ण होईल. पुणे येथील शिवसृष्टीच्या धर्तीवर इथे देखील शिवसृष्टी होईल, असे ते म्हणाले.