सावरकरांप्रति भाजपची आत्मीयता

Share
  • अरुण बेतकेकर

२६ फेब्रुवारी १९६६ रोजी महान देशभक्त, क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर इहलोकातून स्वर्गलोकी परतले. त्यास आज ५७ वर्षे पूर्ण झाली. सावरकर अजरामरच! अलीकडे दुर्दैवाने त्यांच्याविषयी उलटसुलट चर्चांना ऊत येत असतो. राहुल गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वेळोवेळी गरळ ओकत असतात. सर्वज्ञानी उद्धव ठाकरे यांनी एका वाक्यात ‘त्यांच्या मताशी आम्ही सहमत नाही’ म्हटले. पण पुढे या विषयावर बोलण्याचा अधिकार संघाला, भाजपला नाही म्हणत व्याख्यान ऐकविले. बोलघेवडे संजय राऊत सुरुवातीस म्हणाले, ‘राहुलजींना असे म्हणण्याची गरज नाही. अशाने महाविकास आघाडीत फूट पडेल.’ दुसऱ्याच दिवशी त्यांना राहुलजींचा फोन गेला अन् राऊतांनी शेपटी घालून राहुलजींचा उदो-उदो सुरू केला. विविध माध्यमांद्वारे संघ आणि भाजपचे सावरकरप्रेम हे बेगडी आहे, अशी टीकाटिप्पणी झाली. म्हणूनच सावरकर आणि संघ व भाजप यांचे संबंध अधोरेखित करणे आवश्यक वाटले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आर.एस.एस.), त्यांच्या अंगीकृत संघटना आणि भारतीय जनता पक्ष (भाजप), यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबद्दल नेहमीच आदरभावना राखली. त्यात दिखावा नाही, जे आहे ते मनस्वी. केवळ तोंडाची बकवास नव्हे, तर कृतीने त्यांनी तसे सिद्ध करून दाखवले. अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान होताच २००३ साली कर्तव्यबुद्धीने विरोधकांना सोडाच. पण स्वतःस पाठिंबा देणाऱ्या मित्र पक्षांनाही न जुमानता संसदेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे अनावरण केले आणि त्यांना स्वातंत्र्यलढ्यातील अन्य महान नेत्यांच्या पंक्तीत मानाचे स्थान प्राप्त करून दिले. २००४ साली वाजपेयी यांनी अंदमान-निकोबार येथील ब्रिटिशकालीन ‘पोर्ट ब्लेअर’ विमानतळाचे नामांतर ‘वीर सावरकर आंतराष्ट्रीय विमानतळ’ असे केले. या विमानतळाचा विस्तार होत असून आज ते आंतराष्ट्रीय विमानतळ म्हणून कार्यरत झाले. सावरकरांची दूरदृष्टी, त्यांनी त्याच वेळी आपल्या दक्षिण सीमा सज्ज करण्याचे म्हटले होते. आज ती शंका खरी ठरत आहे. अशा वेळी दक्षिणेकडून देशावर आक्रमण झाल्यास हेच विमानतळ सैन्यास देशाच्या संरक्षणार्थ उपयुक्त होऊ शकेल. याद्वारेच जगाच्या पटलावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव उमटेल, देशातून-जगभरातून सावरकरभक्त तसेच पर्यटक या ठिकाणी येतील, सावरकरांनी ज्या काळकोठडीत मरणयातना भोगल्या तेथे माथा टेकतील. २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी देशाचे प्रथमतः पंतप्रधान झाले. त्यानंतर पुढच्या दोन दिवसांतच म्हणजे २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती होती. तरीही मोदींनी संसद भवनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जयंती सोहळा आयोजित करून तो जल्लोषात साजरा केला. मित्र तसेच संपूर्ण विरोधी पक्षांनी यास विरोध केला आणि कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. तरीही मोदींनी या विरोधास भीक न घालता जयंती साजरी केली.

देशात सन २००४ साली, काँग्रेसचे सरकार प्रस्थापित झाले आणि पूर्वग्रह धरून अंदमान-निकोबार येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा हटविण्यात आला आणि त्यांच्या स्मरणार्थ जी अखंड ज्योत प्रज्वलित केली होती ती शमविण्यात आली. स्वयं बाळासाहेब ठाकरे या घटनेवरून प्रक्षुब्ध झाले होते. पुढे २०१४ साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात भाजप सरकार प्रस्थापित झाले. २८ मे २०१५ रोजी सावरकरांच्या १३३व्या जयंतीच्या निमित्ताने तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसने शमविलेली अखंड ज्योत पुन्हा प्रज्वलित केली. तद्नंतर जून २०१५ मध्ये पंतप्रधान म्हणून स्वतः नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना केली.

३० डिसेंबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदमान-निकोबार बंदरास भेट दिली. ती भारताच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरेल. ३० डिसेंबर हाच दिवस का निश्चित झाला? यास एक इतिहास आहे. ३० डिसेंबर १९४३ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या बेटांना भेट दिली होती. दुसऱ्या महायुद्धात जपान सेनेच्या सहकार्याने म्हणजेच नेताजींची आझाद हिंद सेना, दुसऱ्या महायुद्धात जपानच्या सेनेशी संलग्न होती. त्यांनी सर्वप्रथम अंदमान-निकोबार ही बेटे ब्रिटिशांकडून पादाक्रांत करून घेतली. त्यानंतर स्वतः नेताजी ३० डिसेंबर १९४३ साली येथे येऊन भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच, ही बेटे ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली होती. येथे स्वतः स्वतंत्र भारताचा तिरंगा त्यांनी प्रथमच फडकविला आणि संपूर्ण भारत स्वातंत्र करण्याची प्रतिज्ञा केली होती. त्याच वेळी जवाहरलाल नेहरू नव्हे, तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांना स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले होते. या घटनेस ३० डिसेंबर २०१८ रोजी ७५ वर्षे पूर्ण झाली. या घटनेच्या स्मरणार्थ मोदी यांनी हा दिवस निवडला.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी, सावरकरांनी काळ्यापाण्याच्या शिक्षेत घालविलेल्या काळकोठडीस तसेच अन्य स्वातंत्र्यवीरांनी भोगलेल्या काळकोठडींना भेट दिली, तेथे माथा टेकला, स्थानापन्न होत ध्यानस्थ झाले, प्रार्थना केली. अंदमान-निकोबार स्वयंपूर्ण करून देशाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी मोदी यांनी अनेक विकास योजना आणि गुंतवणूक करण्याचे जाहीर केले. त्यानंतर ७५ वर्षांपूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य भारताच्या फडकाविलेल्या तिरंग्याच्या स्मरणार्थ तेथे भव्य १५० फूट उंच ध्वजस्तंभाचे अनावरण करत ध्वजारोहण केले. जेथे सुभाषचंद्र बोस यांनी जनतेला संबोधित केले, त्या जिमखाना ग्राऊंडचे नामकरण ‘नेताजी स्टेडियम’ करत, तेथूनच मोदींनी देशाला-जगाला उद्देशून केलेल्या भाषणादरम्यान तेथील अन्य बंदरांची ब्रिटिशकालीन नाव बदलत १) रॉस बेटाचे नामकरण नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप २) निल बेटाचे नामकरण शहीद द्वीप, तर ३) हॅवलॉक बेटाचे नामकरण स्वराज्य द्वीप असे करत ती भारतीय नावाने देशाला अर्पण केली. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संपूर्ण कार्यक्रमात नेताजींच्या आझाद हिंद सेनेची टोपी परिधान केली होती आणि हा कार्यक्रम नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबासमक्ष आणि आझाद हिंद सेनेतील काही हयात सैनिक यांच्यासोबत संपन्न केला. या भाषणादरम्यान मोदी म्हणाले, ज्या सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मरणयातना भोगल्या, ज्या काळकोठडीत त्यांनी काळ्यापाण्याची १० वर्षे शिक्षा भोगली, ते आमच्यासाठी मंदिराहून कमी नाही आणि सावरकर देवाहून. संपूर्ण बोस कुटुंबीयांनी मोदींची तोंड भरून स्तुती करत त्यांचे आभार मानले. अंदमान-निकोबार ही निसर्गरम्य बेटे, देशाचे महत्त्वाचे पर्यटनाचे स्थळ म्हणून नावारूपाला येईल. याच वर्षात तेथे आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत झाले. जगभरातून पर्यटक येथे पोहोचतील. सावरकरांच्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी जीवन गाथा जगभर पोहोचेल. तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील अन्य क्रांतिवीरांचे योगदान जगासमोर येईल.

सावरकर, बोस व अन्य क्रांतिकाऱ्यांविषयी खरोखरच आदराची भावना असल्यासच त्यांच्यासाठी असे विधायक कार्य घडत राहते. जेव्हा-जेव्हा भाजपची सत्ता आली सावरकरांच्या कर्तृत्वाला पुन्हा उभारी आली, धार चढली. त्यांच्याविषयी जगभरात उत्कंठा वाढीस लागली. आज खऱ्या अर्थाने सावरकर संपूर्ण जगाला कळले, अजरामर झाले. याचे संपूर्ण श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला जाते. प्रत्येक देशप्रेमी भारतीय आपल्या या कार्यासाठी आपला अखंड ऋणी राहील.

बाळासाहेबांसाठी सावरकर हे श्रद्ध्येय होते. उद्धवजी आपण २५-३० वर्षे मुंबईवर कुंडली मारून बसला आहात. कपट-कारस्थान करून का असो मामू झालात. आपण सावरकरांविषयी कोणते विधायक कार्य केलात? हे एकदा जगाला सांगाच. अजित पवार यांनी म्हटले आहेच, “शिवाजी महाराजांसारख्या युगपुरूषांची जयंती साजरी करणे म्हणजे शिवसेनेसाठी पैसे, हफ्ते, खंडणी उकळण्यासाठी पर्वणी असते.” तसेच सावरकरांविषयी. शिवसेना महाविकास आघाडीत शिरली. सावरकर विस्मरणात गेले. त्यांची जयंती बंद झाली आणि कारखानदार, व्यापारी दुकानदार, फेरीवाले, भाजीवाले यांचा जीव भांड्यात पडला. खंडणीखोरांपासून ते मुक्त झाले. सावरकरांची जयंती मात्र बंद पडली, हे दुःख आम्हास सतत सलते.

शिवसेनेचा इतिहास, बाळासाहेबांची विचासरणी, प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार यांच्याविषयीची मते विस्मरणात गेली. ज्यांनी इतिहास विसरला त्यांचा भूगोल बिघडला. अशा स्वभावाने उद्धवजी अल्पकाळाचे मुख्यमंत्री ठरले. १८ पैकी १३ खासदार, तर ५२ पैकी ४० आमदारांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. शिवसेना नाव गेले, चिन्हही गेले आणि पक्षही हातून निसटला. हा उबाठा शिवसेनेचा बिघडलेला भूगोल.

सावरकरांविषयी कवीमनाच्या अटलजींनी वाहिलेली आदरांजली…

‘सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग,
सावरकर माने तप, सावरकर माने तत्व,
सावरकर माने तर्क, सावरकर माने तारुण्य,
सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार,
सावरकर माने तिलमिलाहट, सागरा प्राण तळमळला,
तिलमिलाती हुई आत्मा। सावरकर माने तितिक्षा,
सावरकर माने तीखापन, सावरकर म्हणजे तिखट।
कैसा बहुरंगी व्यक्तित्व हैं सावरकर का!’
– अटलबिहारी वाजपेयी

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

1 hour ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

2 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

2 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

4 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

4 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

4 hours ago