- महिमा गजाननाचा : प्रा. प्रवीण पांडे, अकोला
मागील लेखात आपण महाराज पिंपळगाव येथे आले व बंकटलाल ह्यांनी महाराजांना शेगावी परत आणले इथपर्यंतचा वृत्तान्त पाहिला. याच अध्यायामध्ये महाराजांनी आडगाव येथील भास्कर या शेतकऱ्याची अकोली येथील विहीर सजल केली असे कथानक आहे.
पुन्हा महाराज एके दिवशी भर उन्हात अत्यंत वेगाने चालत चालत दुपारच्या वेळी शेगाव येथून अकोली ग्रामाजवळ पोहोचले. वैशाख महिना होता. प्रखर उन्हाळा सुरू होता. तसे देखील विदर्भ प्रांतामध्ये उन्हाळा हा अतिशय तीव्र स्वरूपाचा असतो. अशा वातावरणात महाराजांना तहान लागली. कुठे पाणी मिळेल तर पाहावे असा विचार करत महाराज आजूबाजूला चौफेर पाहू लागले. अशा उन्हाळ्यातल्या दुपारी भास्कर नावाचा शेतकरी आपल्या शेतात काम करीत असलेला महाराजांना दिसला. जगाचा अन्नदाता असे शेतकऱ्यास म्हटले जाते. शेतकरी वर्गाला ऊन, वारा असो वा पाऊस अशा सर्व यातना सोसून शेतात काम करत राहावे लागते, तेव्हाच सर्वांना अन्नधान्य मिळते.
शेतात काम करावयास जाताना पाठीशी भाकरीची शिदोरी आणि डोक्यावर मातीच्या कळशीत पाणी असे घेऊन शेतात जाणे असा प्रकार होता. या अकोली ग्रामाच्या परिसरात पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष असे. उन्हाळ्यात तर दूर दूरपर्यंत पाणी मिळत नसे.
तर या भास्कर शेतकऱ्याने स्वतःकरिता पाण्याची घागर आणली होती व ती एका झुडुपाखाली ठेवली होती. महाराज तिथे पाणी मागण्याकरिता पोहोचले आणि भास्कर शेतकऱ्यास म्हणाले,
समर्थ म्हणती भास्कराला ।
तहान बहुत लागली मला ।
पाणी दे बा प्यावयाला ।
नाही ऐसे म्हणू नको ।। ९६।।
पुण्य पाणी पाजण्याचे ।
आहे बापा थोर साचे।
पाण्यावाचून प्राणाचे ।
रक्षण होणे अशक्य ।। ९७।।
आधीच परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष. अशातूनही हा मनुष्य पाणी मागतोय हे पाहून भास्कर रागावला व महाराजांना बोलला की, मी तुला पाणी देणार नाही. मी माझ्यासाठी डोक्यावर घागर घेऊन पाणी आणले आहे. त्या आयत्या पिठावर तू रेघोट्या ओढू नको आणि असेच अपमानजनक काही बाही श्री महाराजांना बोलला. हे सर्व ऐकून महाराजांनी स्मित हास्य केले आणि थोड्या अंतरावर एक विहीर दिसत होती तिकडे महाराज जाऊ लागले. ते त्या विहिरीकडे जात आहेत, असे पाहून भास्कर त्यांना म्हणाला, अरे वेड्या तिकडे कशाला जातोस? ती कोरडी ठणठणीत विहीर आहे. या एक कोसात पाणी कोठेही नाही. त्यावर महाराज भास्कराला म्हणाले, तुझे म्हणणे खरे आहे. विहिरीत पाणी नाही तरी मी प्रयत्न करून पाहतो. तुझ्यासारखे बुद्धिमान पाण्यामुळे हैराण होतात असे पाहून मी जर स्वस्थ बसलो, तर मग मी समाजहितासाठी काय केले हे तूच सांग आणि हेतू शुद्ध असेल, तर परमेश्वर देखील सहाय्यभूत होतो, असे भास्करास बोलून महाराजांनी डोळे मिटून नारायणाचे ध्यान केले आणि श्रीहरीची प्रार्थना केली. महाराजांची विनवणी ऐकताच शेतातील त्या कोरड्या विहिरीला मोठा पाण्याचा झरा लागला आणि त्या निर्जल प्रदेशातील ती विहीर क्षणात पाण्याने भरून गेली. हा चमत्कार पाहून भास्कराचे चित्त घोटाळले. शेतीचे काम सोडून भास्कर तिथे धावत आला. त्याने महाराज हे कोणीतरी मोठे सत्पुरुष आहेत हे ओळखले व महाराजांना शरण आला व क्षमा मागू लागला.
आणि म्हणू लागला की, सद्गुरू नाथा आता काही असो मी तुमचे चरण सोडणार नाही. माता भेटता लेकरू तिला कसे सोडील बरे. यावर महाराज भास्करला बोलले : आता असा दुःखी होऊ नकोस. गावातून डोक्यावर घागर आणू नको. तुझ्यासाठी विहिरीत जल निर्माण केले. आता तुला कष्याची कमी नाही.
पाणी आले तुझ्या करिता ।
बगिचा तो लाव आता।
भास्कर म्हणे गुरुनाथा ।
हे आमिष दावू नका ।।१४०।।
इथे संत कवी दासगणू महाराज यांनी महाराज आणि भास्कर याच्या संवादाच्या ओव्यातून रूपक अलांकराचा अतिशय सुंदर वापर केला आहे. भास्कर महाराजांना म्हणतो:
माझा निश्चय हीच विहीर ।
कोरडी ठणठणीत साचार।
होती दयाळा आजवर ।
थेंब नव्हता पण्याचा ।।१४१।।
ती विहीर फोडण्याला ।
तुम्हीच हा प्रयत्न केला।
साक्षात्काराचा लाविला ।
सुरुंग खडक फोडावया ।।१४२।।
तेणे हा फुटला खडक ।
भावाचे लागले उदक ।
आता मळा नि:शंक।
भक्तिपंथाचा लावीन मी ।।१४३।।
वृत्तीच्या मेदिनी ठायी ।
फळझाडे ती लावीन पाही ।
संनितीची माझे आई ।
तुझ्या कृपे करूनी ।।१४४।।
सत्कर्माची फुलझाडे।
लाविन मी जिकडे तिकडे।
हे क्षणिक बैलवाडे ।
ह्यांचा संबंध आता नको ।।१४५।।
क्षणैक संत संगती घडताच भास्करास केवढी उपरती झाली. यालाच सद्गुरू कृपा म्हणतात. या विहिरीला लागलेल्या झऱ्याचे व पाण्याचे वर्णन श्री दासगणू महाराजांनी खालील ओवित
केले आहे
तैसे श्रोते तेथ झाले
लोक अपार मिळाले
विहिरीचे पाणी पाहिले
पिऊन त्यांनी तेधवा ।।१५१।।
उदक निर्मळ शीत मधुर ।
गोड अमृताहूनी फार ।
करू लागले जयजयकार ।
गजानना लोक
सारे ।। १५२।।
आज देखील अकोली ग्रामामधील गजानन महाराजांनी सजल केलेली विहीर पाण्याने भरलेली आहे. येथे अनेक भाविक नित्य दर्शनास येत असतात. हे देखील एक तीर्थक्षेत्र झाले आहे.
क्रमशः