Wednesday, March 26, 2025
Homeमहत्वाची बातमीहवामान बदलाची कारणे व उपाययोजना

हवामान बदलाची कारणे व उपाययोजना

  • डॉ. श्वेता चिटणीस

जगातील १०० राज्यांना हवामान बदलांमुळे उद्भवणाऱ्या संकटांचा सर्वाधिक धोका आहे. त्यामध्ये महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या चौदा राज्यांचा समावेश आहे. ‘ग्रॉस डोमेस्टिक क्लायमेट रिस्क’ या अहवालात म्हटले आहे की, हवामान बदलाचे आघात चीन, अमेरिका व भारत ह्या देशांना अधिक सोसावे लागतात.

नैसर्गिक आपत्ती म्हणजे नदीची पातळी वाढून पूर येणे, वेगाने वारे वाहून जंगलामध्ये आग लागणे, दुष्काळाची परिस्थिती उद्भवणे, रोगराई पसरणे इत्यादी असू शकतात. वरील अहवालात पर्यावरणातील माहितीप्रमाणे २०५० पर्यंतचे नुकसान मोजण्यात आले आहे. त्यानुसार भारतात आसाममध्ये सर्वात जास्त नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतात ज्या ठिकाणी सर्वात अधिक रोजगार उपलब्ध होतो किंवा आर्थिक उलाढाली होतात अशा शहरांना अधिक नुकसान सोसावे लागेल, अशी शक्यता आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजेच भारताची आर्थिक राजधानी मुंबई होय; परंतु भारताच्या आर्थिक उलाढाली पाहता मुंबईची तुलना अनेक वेळा अमेरिकेची राजधानी न्यूयॉर्क आणि जर्मनीची राजधानी बर्लिनबरोबर करण्यात येते. या अहवालानुसार भारतात बिहार व आसाम या राज्यांना अधिक नुकसान सोसावे लागणार आहे. कारण, इथे विकासकामांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव दैनंदिन जीवनात जाणवतो. महाराष्ट्रात मुंबईसह ११ जिल्ह्यांमध्ये हवामान बदलाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. अन् २०५० सालापर्यंत पृथ्वीच्या तापमानात १.५ डिग्री सेल्सिअसने वाढ होणे अपेक्षित आहे. २०२३ सालामध्ये उष्णतेचे प्रमाण अर्थातच २०२२ पेक्षा अधिक असेल; परंतु इंटर गव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लाइमेट चेंज (आयपीसीसी) यांनी दिलेल्या निष्कर्षानुसार आपल्याला येणाऱ्या हवामान बदलांची तयारी करण्याकरता १५ ते २० वर्षांचा अवधी आहे. योग्य पावले उचलून आणि खबरदारी घेऊन आपण हवामान बदलाचे दुष्परिणाम नक्कीच कमी करू शकतो. ‘ग्रॉस डोमेस्टिक क्लायमेट रिस्क’ या अहवालात पूर परिस्थिती, पाण्याचा अभाव, दुष्काळ किंवा वादळामुळे शहरातील इमारतींचे राहण्यासाठी बनवलेल्या घरांचे व कारखाने आणि कचऱ्यांचे होणारे नुकसान याविषयी सखोल विचार करण्यात आला आहे. अशा विषम हवामानामुळे अनेक वेळा रोगराई पसरते, जीवितहानी होते किंवा लोकांना रोजगार मिळेनासे होतात व त्यामुळे लोकांच्या जीवनावर भीषण परिणाम होतो. शहरी व ग्रामीण भागात जैवविविधतेचा नाश होतो आणि निसर्गाचा तोल ढासळतो.

हवामान बदलाचा सामना करण्यासाठी हरित व नील स्थापत्यशैलीचा वापर शहरात करणे गरजेचे आहे. शहरी शेती व वृक्षारोपण करण्याकडे लोकांचा कल असावा. तसेच नैसर्गिक स्वरूपात उपलब्ध असलेली सौरऊर्जा, नैसर्गिक जलस्त्रोत, जलप्रपातांमुळे निर्माण होणारी ऊर्जा यांचा वापर अधिक केल्यास उत्तम. कारण नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिकदृष्ट्या उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र शेती करणाऱ्या व्यावसायिकांच्या जीडीपीची घसरण होते. त्यामुळे रोजगाराचा अभाव निर्माण होतो व गुन्हेगारी वाढते. मानवाने अनेक नैसर्गिक अधिवासांचे शहरीकरण करण्यास सुरुवात केलेली आहे हे प्रमुख कारण नैसर्गिक आपत्तींचे देता येईल. औद्योगिक क्रांती पूर्वीच मानवाने विशाल जंगलं असलेल्या जमिनींचे शेती करण्यासाठी वापर करणे सुरू केले. आज अशी परिस्थिती आहे की, थोडीफारच जंगले शिल्लक आहेत व ती जंगले वाचवणे अत्यंत गरजेचे आहे. पर्यावरण वाचवताना विकासकामांमध्ये अडथळा येऊ शकत नाही; परंतु विकासकामे अशी करावीत जेणेकरून पर्यावरणाला हानी होणार नाही. प्रशासकीय इच्छाशक्तीची गरज पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आहेत; परंतु प्रत्येकाने आपापल्या परीने लहानसे बदल आयुष्यात केले तरीही आपण पर्यावरणाची बरीचशी हानी टाळू शकतो. उदाहरणार्थ मुंबईसारख्या शहरात बस किंवा ट्रेनने प्रवास करणे, स्वतःची गाडी कमी वापरणे, आपल्या आजूबाजूच्या परिसरात झाडे लावणे,

उन्हाळ्यात एसीचे तापमान नेहमीपेक्षा एक किंवा दोन डिग्रीने वाढवणे, खरेदी करताना प्लास्टिकच्या पिशव्या नाकारणे किंवा कोणतेही रबर थर्माकोल व इतर प्रकारचे जास्त पॅकेजिंग नाकारणे यानेही बदल घडू शकतात. भारताचा छोटा शेजारी भूतान हा देश अतिशय पर्यावरणपूरक असून आपणसुद्धा त्याचे उदाहरण नजरेसमोर ठेवणे गरजेचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -