केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह बहाल केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या एका जहाल विचारसरणीच्या पक्षांची धुरा शिंदे यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे. गेली पाच दशके महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वेगळा ठसा उमटलेला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर शिवसेनेची सूत्रे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्या हाती आली होती; परंतु शिवसेनेच्या इतिहासात एवढी मोठी फूट कधीही झाली नव्हती ती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ४० आमदारांनी केलेल्या बंडामुळे झाली.
या आधी शिवसेनेतून अनेक नेते बाहेर पडले; परंतु विचारांच्या आधारावर शिवसेनेतच राहून उठाव करण्याचे धाडस एकनाथ शिंदे यांनी केले. त्याला आता केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिल्याने, मूळ शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांच्याकडे आला आहे. केंद्रीय आयोगाच्या निर्णयानंतर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना पक्षाचे सर्वाधिकार हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा ठराव मंजूर झाला. त्याचबरोबर शिवसेना पक्ष म्हणून आपली वाटचाल पुढे कशी असेल याची चाहूल देण्याचा प्रयत्न म्हणून आणखी काही ठराव या बैठकीत मांडण्यात आले. त्यापैकी स्वातंत्र्यवीर सावरकर मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूरच्या दौऱ्यात महाराष्ट्रात शिवसेना- भाजप युती म्हणून ४८ पैकी ४८ जागा जिंकण्याचा संकल्प केला असला तरी, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ जागा जिंकण्याचे टार्गेट ठरविले आहे. त्याचबरोबर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत २०० विधानसभा जिंकण्याचा निश्चय करण्यात आला आहे.
शिवसेना पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी एकनाथ शिंदे यांना आली आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांला विश्वासात घेऊन काम करण्याची शिंदेंची हातोटी असल्याने ते या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करतील, यात शंका नाही. मात्र राज्याचे मुख्यमंत्रीपद त्यांच्याजवळ आहे. एका बाजूला पक्ष संघटन सांभाळणे आणि दुसऱ्या बाजूला प्रशासनाच्या गाडा पुढे नेत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला न्याय देणे ही दुहेरी जबाबदारी त्यांना पेलावी लागणार आहे. हिंदुत्वाच्या विचाराशी उद्धव ठाकरे यांनी फारकत घेतल्याने, आपण भाजपसोबत एकत्र येऊन सत्तेत आलो, असे शिंदे यांच्यासोबत असलेले ४० आमदार सांगत असले तरी, गेल्या आठ महिन्यांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उतरून सामना केलेला नाही. त्यामुळे, जनतेच्या दरबारात सेना-भाजप युती ही कशी योग्य आहे, हे सिद्ध करण्याच्या परीक्षेच्या घडीतून सत्तेत असलेल्या ४० आमदारांना जावे लागणार आहे.
देशातील काही उदाहरणे देता येतील की, त्या ठिकाणी पक्षप्रमुख असलेली व्यक्ती ही मुख्यमंत्रीपदावर आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजी, ओडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर, झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन सध्या स्वत:च्या पक्षाची धुरा सांभाळून राज्याचा कारभार करत आहेत. महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची जडण-घडण पाहता, पक्षाची सूत्रे हातात असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या मोहापायी कशी सत्ता गमावली हे नव्याने सांगायला नको. शिवसेना या पक्षाची मुख्य ताकद ही रस्त्यावर कार्यकर्ता म्हणून वावरणाऱ्या शिवसैनिकांच्या बळावर आहे. म्हणून बाळासाहेब नेहमीच सांगायचे की, जोपर्यंत माझा शिवसैनिक आहे तोपर्यंत मी शिवसेनाप्रमुख असणार आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री पदापेक्षा मला शिवसेनाप्रमुख हे मिळालेले पद मोठे आहे. त्यामुळे १९९५ साली राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली असताना, मनोहर जोशी आणि नारायण राणे यांच्या रूपाने शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसविण्याचे काम बाळासाहेबांनी केले होते. त्यामुळे जनतेच्या मनात शिवसेनेच्या प्रमुख पदावरील व्यक्तीबद्दल वेगळा आदरभाव आहे.
पोटचा मुलगा असूनही मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे यांना सामान्य शिवसैनिकांच्या मनातील भावना ओळखता आल्या नाहीत. ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी देऊन बसण्याचा प्रकार शिवसेनेतील अनेक नेत्यांना रुचला नव्हता. त्यातूनच शिंदे यांच्या नेतृत्वाखालील तब्बल ४० आमदार हे मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या नेत्याला सोडून वेगळा विचार करतात तीच भावना सर्वसामान्य शिवसैनिकांची असल्याचे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे पक्षाचे चिन्ह आणि नाव हे शिंदे यांच्या गटाला मिळाल्यानंतर, आक्रमकपणे रस्त्यावर ठाकरे गटाचे कोणीही उतरले नाहीत. आता पक्षाची सूत्रे एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर आली आहेत. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. दुसरीकडे रस्त्यावर उतरून पक्षवाढीचे काम करावे लागणार आहे. मुख्यमंत्री आणि पक्षाचा मुख्य नेता म्हणून एकनाथ शिंदे हे कशी जबाबदारी सांभाळणार आहेत, हे येणाऱ्या काळात पाहता येईल.