केप टाऊन (वृत्तसंस्था) : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार जवळपास अंतिम टप्प्यात आहे. निर्णायक अशा लढती शिल्लक असून उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात भारतासमोर तगड्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. आज होणाऱ्या या सामन्यातील विजेता संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ उद्याच्या सामन्यात जीव ओततील यात शंकाच नाही.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारताची विजयी हॅटट्रीक रोखण्यात इंग्लंडला यश आले असले, तरी भारतीय संघाने गटातील चार पैकी तीन सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. स्मृती मन्धाना चांगलीच लयीत आहे. त्यामुळे भारताला तीन सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवता आले आहे. तिला यष्टीरक्षक रिचा घोषने चांगली साथ दिली आहे. रिचाला मोठी खेळी खेळता आली नसली, तरी तिच्या धावा संघासाठी मौल्यवान ठरत आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात जेमिमाह रॉड्रीग्सला अर्धशतकीय खेळी करता आली होती. मात्र त्यानंतरच्या सामन्यांत तिने विशेष कामगिरी केलेली नाहीत. भारताने तीन सामन्यांत विजय मिळवला असला, तरी प्रमुख फलंदाजांचे अपयश भारतासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे हरमनप्रीत कौर, शफाली वर्मा यांच्यासह जेमिमाह यांना धावा जमवण्यात सातत्य राखावे लागेल. उपांत्य फेरीतील आव्हान मोठे आहे. त्याला पेलवायचे असेल तर फलंदाजांना महत्त्वाचा रोल निभावावा लागेल. त्यासोबतच गोलंदाजांनाही आपली जबाबदारी पार पाडावी लागेल.
ऑस्ट्रेलियाचा संघ गटामध्ये बेताब बादशहासारखा वावरला आहे. त्यांनी गटातील सर्वच्या सर्व म्हणजेच चारही सामने जिंकत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. न्यूझीलंड, बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका या चारही प्रतिस्पर्ध्यांना त्यांनी लीलया पराभूत केले आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. अशा जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या संघाचे आव्हान भारतासमोर आहे. बेथ मुनी, अॅलेसा हेली, तहलिया मॅकग्रा, मेग लॅनिंग, पेरी असे सर्वच फलंदाज फॉर्मात आहेत. त्यामुळे फलंदाजीची त्यांना चिंताच नाही. गोलंदाजांनीही प्रभावी कामगिरी केल्याने गटातील सामन्यांमध्ये पराभव त्यांच्या जवळपास भटकलाही नाही.