भारतीय जनता पक्ष हा कायम निवडणुकीच्या मोडमध्ये असतो, असे म्हटले जाते. ते खरेच आहे. आताही भाजपने पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक आणि त्यापूर्वी नऊ राज्यांतील निवडणुकांसाठी तयारी पूर्ण उत्साहात आणि जोरदारपणे चालवली आहे, विरोधी पक्ष मात्र कथित ऐक्याच्या संभाव्य लाटांमध्ये गटांगळ्या खात आहेत. काँग्रेसशिवाय विरोधी ऐक्य शक्य नाही, असे विधान नुकतेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि थिंकटँक असे समजले जाणारे जयराम रमेश यांनी केले आहे. त्यांच्या विधानात सत्यता आहेच. पण प्रादेशिक पक्ष आज काँग्रेसच्या नेतृत्वाखाली येण्यास तयार नाहीत. अर्थात काँग्रेसने पूर्वी आघाडीचे नेतृत्व करताना त्या पक्षाने दिलेली वागणूक प्रादेशिक पक्षांना विसरता येणारी नाही. पण त्याचबरोबर काँग्रेसला आघाडीतील पक्ष सांभाळता येत नाहीत, हेही स्पष्ट झाले आहे. तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न आताही अधूनमधून केले जात असतात. असाच एक प्रयत्न मध्यंतरी यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली केला गेला.
पण त्या बैठकीला काँग्रेस उपस्थित राहिलीच नाही आणि खुद्द शरद पवार यांना त्या बैठकीचे बारा वाजलेले जाहीर करावे लागले. शिवाय पवार यांनीच तेव्हा सांगितले होते की, काँग्रेसच्या सहभागाशिवाय तिसरी आघाडी अस्तित्वात येणे शक्य नाही. अर्थात पवार यांना काँग्रेसबरोबर जाण्यात वावगे वाटणार नसले तरीही काही महत्त्वाचे पक्ष म्हणजे तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी यांना काँग्रेसबरोबर जाण्यात आपत्ती आहेच. कारण त्यांची राजकीय लढाई त्यांच्या त्यांच्या राज्यात काँग्रेसबरोबर आहे. भाजप पूर्वी बंगालमध्ये नगण्य होता. आता तो मोठी ताकद म्हणून उदयास येऊ लागला आहे. त्यानेही काँग्रेसलाच घायाळ केले आहे. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधनने चांगली लढत दिली. पण काँग्रेसला जास्त जागा सोडल्याचा फटका त्यांना बसला आणि त्यांना सत्ता मिळाली नाही. नंतर नितीशकुमार यांनी पलटी मारल्याने त्यांना सत्तेत येता आले. पण नितीशकुमार यांचा भरोसा कुणालाच वाटत नाही. कधीही ते पुन्हा भाजपच्या गोटात जाऊ शकतात. पण या सर्वांचा परिणाम म्हणजे विरोधी ऐक्य दूर चालले आहे.
काँग्रेसने पंचमढी येथील अधिवेशनात ठराव केला होता. आता तो किती काँग्रेसजनांच्या लक्षात आहे, कुणास ठाऊक. त्या ठरावात काँग्रेस कुणाही पक्षाबरोबर आघाडी करणार नाही, असे ठरवले होते. त्यानंतर अगदी आतापर्यंत महाविकास आघाडी स्थापन होईपर्यंत काँग्रेसने अनेकदा त्या ठरावाला तिलांजली दिली. तरीही जे ऐक्य झाले ते पंतप्रधान मोदी यांना धक्काही लावू शकले नाही. काँग्रेसला प्रादेशिक पक्षांची अडचण होत असते आणि आजही काँग्रेस हाच भाजपनंतर राष्ट्रीय पक्ष आहे. कारण प्रत्येक राज्यात त्याचे अस्तित्व आहे. त्यामुळे भाजपला मुख्य विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस हाच होऊ शकतो. पण ममता बॅनर्जी यांच्या पंतप्रधानपद मिळवण्याच्या आकांक्षांना मध्यंतरी पंख फुटले होते तेव्हा त्यांनी यूपीए कुठे आहे, असा प्रश्न मुंबईत येऊन विचारला होता. त्यांचा रोख काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएकडे होता. अर्थ हा की, ममता असोत किंवा चंद्रशेखर राव यांच्यासारखे नेते असोत, त्यांच्या पंतप्रधान होण्याच्या आकांक्षांना धुमारे फुटले असून त्यांना काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढायचे नाही. मागेही ममता यांच्या पुढाकाराने एकवीस पक्षांचे महागठबंधन तयार झाले होते. पण त्याचा काहीच परिणाम लोकसभा निकालावर झाला नाही. आता तिकडे अमित शहा हे देशात लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यात व्यस्त असताना हे सारे विरोधी पक्ष काँग्रेससह नुसते चाचपडत आहेत.
ज्येष्ठ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काश्मीरमध्ये आपल्या ‘भारत जोडो’ यात्रेचा समारोप केला. तेव्हा अनेक विरोधी पक्ष आमंत्रण असूनही आलेच नाहीत. त्यात मायावती जशा होत्या तसेच नितीशकुमार हेही होते. अर्थात या सर्व नेत्यांमध्ये पुढील पंतप्रधान कोण यावरही वादाचे मुद्दे आहेत. या सर्व पक्षांनी एकत्र येऊन काही लोककल्याणाचा कार्यक्रम दिला आणि तोही लोकांना आकर्षित करणारा असेल तर त्या ऐक्याचा काही उपयोग होईल. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अकारण टीका केली. त्याऐवजी राजस्थान, छत्तीसगढ वगैरे पक्ष सत्तेत असलेल्या राज्याराज्यात काँग्रेसमध्ये जी गटबाजी आहे, त्याकडे लक्ष द्यायला हवे. कित्येक प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसबरोबर युती करून त्यांचा राजकीय अवकाश इतका बळकावला की, आता काँग्रेसचे तेथील अस्तित्व संपले आहे. कित्येक प्रादेशिक पक्षांचे त्यांच्या स्वतःच्या राज्यात सरकार असले तरीही शेजारच्या राज्यात अस्तित्वही नाही. द्रमुक हे त्याचे अगदी ठळक उदाहरण आहे. जर्मनीचा हुकूमशहा हिटलर यालाही कळत होते की, लोकांना चांगला कार्यक्रम दिला तरच लोक आपल्या मागे येतील. त्याने लोकांना नॉर्डिक वंशाचे लोक कसे श्रेष्ठ आहेत आणि त्यांचेच जगावर राज्य येणार आहे, असे सांगून भुलवले आणि मगच त्याची हुकूमशाही सुरू झाली.
काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी लोकांना आकर्षित करू शकेल, असा कार्यक्रम दिला तरच लोक त्यांच्या मागे जातील. आज काँग्रेस खासगीकरणाच्या विरोधात उभी आहे. पण याच काँग्रेसच्या काळात नव्वदच्या दशकात उदारीकरणाला दारे खुली करण्यात आली होती. हा काळाने उगवलेला सूड आहे. सर्वच विरोधी पक्षांनी मोदी यांना शिव्या घालण्याचे बंद करून आपली काय स्थिती आहे, ते पाहिले पाहिजे. अन्यथा विरोधकांचे ऐक्य स्वप्नरंजनच ठरेल.
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…
ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…
सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…