एअर इंडियाचा महाराजा पुन्हा मुंबईकर बनेल का?

Share
  • मुंबई डॉट कॉम: अल्पेश म्हात्रे

गेल्याच आठवड्यातील एका बातमीने जगभरात सर्वत्र खळबळ उडवून दिली, ती बातमी आपल्या देशासाठी खूपच महत्त्वाची ठरली. भारतीय विमान सेवा असलेल्या एअर इंडियाने ‘न भूतो न भविष्यती’ अशी तब्बल ८४० विमानांची ऑर्डर अमेरिकेच्या बोईंग कंपनीला व युरोपच्या एअरबस कंपनीला दिली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा व्यवहार पूर्ण केला. स्वतः मोदी, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन व टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या उपस्थितीत या जगातील तडाखेबंद व्यवहाराची घोषणा केली गेली. या व्यवहाराची संपूर्ण जगाने नोंद घेतली. या ऐतिहासिक निर्णयामुळे पाश्चिमात्य देशात साधारण दहा लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. ही निश्चितच चांगली बाब असून एकीकडे जग अनिश्चिततेच्या गर्तेत असताना अशी मोठी घटना घडणे हे निश्चितच आपल्या देशासाठी अभिमानास्पद आहे. या व्यवहारामुळे आपले परराष्ट्रीय संबंध आणखी घनिष्ठ होणार आहेत ही गोष्ट वेगळी. या व्यवहाराने परदेशात असंख्य लोकांना रोजगार निर्माण होईलच; परंतु आपल्या देशातही लाखो नोकऱ्या निर्माण होतील.

या व्यवहाराचा आपल्या महाराष्ट्राचा व विशेषकरून आपल्या मुंबईला किती फायदा मिळणार या दृष्टीने विचार आतापासूनच करावा लागेल. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की, या करारामुळे भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात नोकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होईल. कारण एअरलाइनला ऑपरेशनल कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल. या नोकऱ्यांमध्ये पायलट, केबिन क्रू, सर्व तांत्रिक आणि गैर-तांत्रिक कर्मचारी तसेच विमानतळ कर्मचारी, हवाई वाहतूक नियंत्रक, वाहतूक विक्रेते, सेवा प्रदाते इत्यादी पदांसाठी संधी निर्माण होणार आहे. असे झाले तर मुंबई शहर व पर्यायाने महाराष्ट्राला या विमानसेवांचा फायदा मिळणे जाणीवपूर्वक शक्य आहे. पूर्वी सरकारच्या मालकीचे एअर इंडियाचे मुख्य केंद्र मुंबईत होते, आंतरराष्ट्रीय मार्गावरील बहुतांश विमाने मुंबईहून सुटत असत. त्या काळी विमानसेवांचे क्षेत्रही मर्यादित असल्याकारणाने देशभरातून आंतरराष्ट्रीय मार्गावरील प्रवाशांना मुंबईस येणे भाग पडत होते. मुख्य केंद्र मुंबईत असल्याने बहुतांशी एअर इंडियात पारशांसोबत मराठी माणसांचे वर्चस्व होते. नरिमन पॉइंटवरील समुद्रकिनारी असलेली एअर इंडियाची इमारत ही पर्यटकांचे आकर्षण होते व मुंबईचेही एक वेगळे वैभव होते. एअर इंडियात मराठी माणसांची भरती ही त्याकाळी शिवसेनाकृत महाराष्ट्र लोकाधिकार समितीमार्फत मोठ्या प्रमाणात झाली. माननीय नारायण राणे हे त्यावेळी या संघटनेत बिनीचे शिलेदारही होते. मात्र कालांतराने चित्र पालटले व त्या नरिमन पॉइंटच्या एअर इंडिया इमारतीचे एक एक मजले रिकामे होऊ लागले व अखेर एअर इंडियाचा कारभार हा दिल्ली येथे स्थलांतरित केला गेला. त्यामुळे एअर इंडियातील मराठी माणसाची टक्केवारी मोठ्या संख्येने घसरली. एवढ्यावरच हे थांबले नाही, तर मुंबईहून सुटणारी लांबपल्ल्याची बहुतांशी विमाने दिल्लीहून सुटू लागली. काही अपवाद वगळता युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पूर्व आशिया, जपानकडे पूर्वी मुंबईहून विमाने सुटत असत व ती बहुधा दिल्ली मार्गे जात असत की ज्यामुळे भारतातील दोन मुख्य शहरे विमानसेवेने जोडली जातील. मात्र नंतर ती फक्त दिल्लीहून सुटू लागली. याचा परिणाम असा झाला की, मुंबई व महाराष्ट्रातील प्रवाशांना आधी दिल्ली गाठणं आवश्यक झालं. त्यात खर्च पण वाढला व प्रवास कालावधीही वाढला. अशाप्रकारे एनकेनप्रकारे महाराष्ट्राचेच नुकसान झाले. मुंबईकर असलेल्या कित्येक कर्मचाऱ्यांची दिल्ली व इतर ठिकाणी बदली झाली. ज्यांनी बदलीला जमवून घेतले नाही त्यांना राजीनामा देणे भाग पडले. या प्रकारामुळे कोणी व काय साध्य केले हे माहीत नाही. मात्र एके काळी भूषण असलेली व प्रचंड फायद्यात असलेली ही विमान कंपनी तोट्याच्या गाळात रुतून बसली ती कायमचीच. मुंबईत निर्माण झालेल्या या पोकळीचा फायदा नव्याने सुरू झालेल्या खासगी विमान सेवांनी व देशाबाहेरील आंतरराष्ट्रीय विमानसेवांनी उचलला व आपले उखळ पांढरे करून घेण्यास सुरुवात केली. सरकार दरबारी एअर इंडिया ही नंतर कायम उपेक्षितच राहिली.

आता बऱ्याच वर्षांनी भारतातील हवाई वाहतूक उद्योगाचे चित्र वेगाने बदलत आहे. भारत नजीकच्या काळात जगाची केवळ हवाई वाहतुकीची मोठी बाजारपेठ असणार नाही तर या उद्योगासाठी पूरक अशा सर्व सुविधांच्या केंद्रस्थानी असणार आहे. त्याचा फायदाही आता आपल्या महाराष्ट्राने घेतला पाहिजे. एअर इंडियाच्या ताफ्यात सध्या ११३ विविध प्रकारची विमाने आहेत, तर साधारण ८४० विमानांची ऑर्डर देण्यात आली आहे. इतकी विमाने आकाशात एकाचवेळी उडणे शक्य नाही. अर्धाधिक विमाने ही जमिनीवर असणार आहेत म्हणजे या विमानांसाठी देखभाल व दुरुस्ती व पार्किंगसाठी जागा तर लागणार.म्हणजे महाराष्ट्रातील विमानतळाचा लाभ उठवणे आपल्याला सहज शक्य आहे. सध्या आपल्या राज्यात मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे वर्दळीचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्याखालोखाल पुणे व नागपूर या विमानतळांना आंतरराष्ट्रीय दर्जा आहे. एअर इंडियाची ही नवीन विमाने पुढील दोन वर्षे येईपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळही सुरू झालेले असेल. मुंबई, पुणे व नागपूर वगळता महाराष्ट्रात छोटे-मोठे असे साधारण ३० विमानतळ व धावपट्ट्या आहेत. त्याचा पद्धतशीरपणे विकास करून त्याचा लाभ आपण करून घेतला पाहिजे. येणाऱ्या संधीचा लाभ आपण सहजपणे घेतला पाहिजे. आपल्या राज्यकर्त्यांनी तरुणाईशी संवाद साधून असणाऱ्या संघींचा लाभ कशाप्रकारे घेता येईल, याचे नियोजन केले पाहिजे. तसेच नवयुवक व युवतींनीही नेहमीच्या रुळलेल्या वाटांवर जाण्यापेक्षा हवाई क्षेत्रात भरारी घेतली पाहिजे. त्यासाठी लागेल ती आपली इच्छाशक्ती व राजकीय इच्छाशक्ती. महाराष्ट्र हे नेहमीच प्रगत राज्य म्हणून गणले जाते. इथे नेहमीच कुशल कामगार मिळतात. आता मात्र गरज आहे प्रशिक्षित कामगारांची. तरच आपण या संधीचा लाभ घेऊ शकतो व पूर्वीप्रमाणे पुन्हा एअर इंडियाच्या महाराजाला इतर राज्यांना मागे सारून आपल्या महाराष्ट्रात व विशेषकरून मुंबईत आणू शकू.

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

38 seconds ago

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…

6 minutes ago

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…

1 hour ago

अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

1 hour ago

कोकणातील माकडे व वानरांचे निर्बीजीकरण करणार!

निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…

2 hours ago

६४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत जाहीर

गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…

2 hours ago