Friday, July 12, 2024
Homeरविवार विशेषशिक्षणाने माणूस घडला पाहिजे!

शिक्षणाने माणूस घडला पाहिजे!

  • दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम

फेब्रुवारी महिना उजाडला की, चाहूल लागते ती सुरू होणाऱ्या उन्हाळ्याची आणि त्याच वेळी याच महिन्यात सुरू होणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेची. अर्थात अगदी सोप्या भाषेत बारावी आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या दहावीच्या परीक्षांची.

या दोन परीक्षा मुलाचं भवितव्य ठरवतात, हे जेव्हापासून पालकांनी आपल्या मनात पक्कं ठसवून ठेवलं आहे, तेव्हापासून या दोन्ही परीक्षांना अत्यंत महत्त्व आलं आहे. इतकं की या परीक्षा जवळ आल्या की, अनेक घरांमध्ये अनेक क्रांतिकारी बदल घडवले जातात. कुठे तीन महिन्यांसाठी टीव्ही बंद होतो, मुलांचे बाहेर फिरणे बंद होते, महागडे क्लासेस आणि एकदम पहाटेपासून रात्रीपर्यंतचे वेळापत्रक, सोबत जेवणाचा डाएट प्लॅन, या कालावधीत पाल्याने काय खावं, काय पाहू नये, काय वाचावं, काय करू नये, किती बोलावं, किती झोपावं अशा अगदी बारीकसारीक गोष्टींचा किस पाडला जातो. सगळ्यात कहर म्हणजे आई-वडील तर चक्क सुट्टी घेऊन मुलांचा अभ्यास घेतात, त्यांना वेळ देतात. हे दहावी-बारावीच्या परीक्षांचं ताणाचं, होय ताणाचंच कॅलक्युलेशन सुरू होण्यापूर्वीचे स्वतः पालकांचेच दिवस त्यांनी खरं तर आठवले पाहिजेत. त्यांना आठवतं तरी का त्यांचा दहावी आणि बारावी परीक्षेचा कालावधी कसा गेला ते? त्यांच्या पालकांनी या परीक्षांना इतकं डोक्यावर घेतलं होतं का?

अर्थात यावर अनेक पालकांचं उत्तर ठरलेलं आहेच, तेव्हा अर्ध्या-अर्ध्या गुणांना इतकं महत्त्व नव्हतं, स्पर्धा जीवघेणी नव्हती वैगरे वैगरे… हो अगदी खरं… पण ही स्पर्धा, हे गुणांचं महत्त्व कुणी वाढवलं याचाही विचार केलाच पाहिजे ना? अभ्यासक्रम तयार झाला, त्याचा परीक्षा पॅटर्न तयार झाला. त्या पॅटर्नचा वापर केला की, मुलांना हमखास पैकीच्या पैकी गुण मिळतात; हा फॉर्मुला सेट झाला. खासगी शिकवण्यांचा बिझनेस सेट झाला आणि मग त्यातून नुकत्याच वयात येणाऱ्या, अंगोपांगी फुलणाऱ्या युवा पिढीच्या मागे स्पर्धा हा शब्द चिकटवला गेला. ही स्पर्धा मार्कांचीच नाही, तर आई-वडिलांच्या स्टेटसची, पाल्याने डॉक्टर किंवा इंजिनीअर बनायच्या आई-वडिलांच्या इर्षेचीसुद्धा आहेच. यात पाल्याला खेळणं केलं जातं, त्यातून आपल्या सुप्त इच्छा पूर्ण केल्या जातात.

पण या स्पर्धेमागे, रॅट रेसमध्ये आपण आपल्या पाल्याची पौगंडावस्थेतील महत्त्वाचे दिवस चक्क वाया घालवतोय, याची जाणीवच अनेक पाल्यांना नसल्याचे दिसून येते. खरं तर या वयात जेव्हा मन भरकटण्याची शक्यता असते, तेव्हा आपल्या मुलाला किंवा मुलीला चांगला माणूस बनण्याचे धडे पालकांनी आणि अगदी शाळेतसुद्धा देणे आवश्यक आहे. वयाच्या या महत्त्वाच्या टप्प्यात मुलं जे मनात साठवतात, त्याचाच त्यांच्या पुढच्या आयुष्यात परिणाम होणार असतो. अशा काळात घोकंपट्टी करणारं यंत्र बनविण्यापेक्षा मुलांना एक चांगला नागरिक बनवलं, त्यांना माणुसकी शिकवली, आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करायचा असतो हे शिकवलं, आयुष्यात वाचन, संगीत, चित्रकला, हस्तकला या कलांतून मिळणारा आनंद हा अवर्णनीय असतो याची जाणीव करून दिली, कुटुंब हा भक्कम पाया असतो हे शिकवलं, तर भारतात खूप चांगले नागरिक बनतील. त्यातून कोणी चांगले अधिकारी बनतील, समाजसेवक बनतील, राजकारणीसुद्धा बनतील आणि हा देश संपूर्ण जगात एक सक्षम राष्ट्र बनेल. पण हे कुणालाच करायचं नाहीय. पाठपुस्तके, सिल्याबस तयार करणाऱ्या मंडळातील तज्ज्ञांना यात रस नाही, मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांकडे त्यासाठी आवश्यक वेळ नाही आणि पालकांना आपल्या मुलाला वेगळं काही करायला प्रोत्साहन देण्याचं धाडस नाही, म्हणून आज शिक्षण हा शब्द केवळ गुणांसाठीच मर्यादित राहिला आहे. शिक्षणाचे मूल्य कुठेतरी हरवून गेले आहे. पण यातूनच तरुण वर्गात आत्महत्येसारख्या घटनांचे प्रमाण वाढताना दिसते आहे.

कॉपी करू नये म्हणून भरारी पथके नेमली जात आहेत, सर्वात जास्त गुण, चांगले करिअर या स्पर्धेत मुले कोमेजून जात आहेत. खरं तर प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, प्रत्येकजण डॉक्टर किंवा इंजिनीअर होऊ शकत नाही. पण प्रत्येकाकडे त्याचं जे वेगळेपण असतं. ते शोधून प्रत्येकालाच वैयक्तिक विकास करणं गरजेचे आहे.

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापुढे शिक्षण पद्धतीत बदल होणार असल्याचे संकेत दिले आहेत. हे बदल सर्वार्थाने चांगले व्हावेत, यापुढचे शिक्षण मूल्यांवर आधारित असावे हीच अपेक्षा आहे. त्यातून एक सदृढ पिढी तयार होईल आणि देशाचं भविष्य उत्तम होईल, यात वाद नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -