सांगली : वेळेवर पगार न झाल्यामुळे सांगली जिल्ह्यात एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. तर आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. भीमराव सूर्यवंशी असे एसटी कर्मचाऱ्याचे नाव असून ते कवठेमहांकाळ बस आगारात चालक पदावर कार्यरत होते.
भीमराव सूर्यवंशी यांनी आज सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाचा आदेश असूनही पगार वेळेत होत नसल्यामुळे एसटी महामंडळाचे कर्मचारी तणावाखाली आहेत. सूर्यवंशी देखील तणावाखाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वेळेवर पगार न झाल्यामुळे त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.