Sunday, July 6, 2025

टेनिसनंतर सानिया आता थेट क्रिकेटच्या मैदानात

टेनिसनंतर सानिया आता थेट क्रिकेटच्या मैदानात

मुंबई: भारताची प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा आता क्रिकेट जगतात अनोखी भूमिका साकारणार आहे. सानियाची महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सत्रासाठी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) या महिला संघाची 'टीम मेंटर' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपन २०२३ मध्ये तिची शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळलेल्या सानिया मिर्झाने २० वर्षांच्या कारकिर्दीत ६ ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले आहे. जागतिक दर्जाची टेनिसपटू म्हणून आरसीबीने तिची निवड केल्याचे समजते.


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रमुख आणि उपाध्यक्ष राजेश व्ही मेनन यांनी सानिया मिर्झाची मेंटर म्हणून नियुक्ती केल्याबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, “आरसीबी महिला संघाची मार्गदर्शक म्हणून सानिया मिर्झाचे आम्ही स्वागत करतो. तिच्या क्रिडा कारकिर्दीत अनेक आव्हाने असूनही कठोर परिश्रम, जिद्द आणि दृढनिश्चयामुळेच ती यशस्वी झाली. त्यामुळेच ती नव्या पीढीसाठी आदर्श ठरेल असा विश्वास आम्हाला वाटतो. आमच्या संघातील महिला खेळाडूंना तिच्यामुळे निश्चित प्रेरणा मिळेल."





आरसीबीने भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिला सर्वात जास्त बोली लावून संघात घेतले. त्यांच्या संघात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू क्रिकेटर एलिस पेरी आणि मध्यमगती गोलंदाज मेगन शुट यांची जोडी आहे, न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हाईन, इंग्लंडची कर्णधार हीथर नाइट हिच्या सह भारताची अंडर १९ स्टार रिचा घोष हीचाही समावेश आहे.

Comments
Add Comment