Friday, October 31, 2025
Happy Diwali

वामनबुवांना गुप्त संदेश

श्री स्वामी महाराजांस अक्कलकोटास येऊन तीन वर्ष झाल्यावर वामनबुवा ब्रह्मचारी बडोदेकर हे दर्शनास आले. पुढे प्रत्येक वर्षात त्यांचा दोन-तीन वेळ दर्शनास येण्याचा नेम असे. लहानपणापासून त्यांच्या उपासनेचा त्यांस नाद होता. त्यामुळे कोणी साधू, संन्याशी, योगी, ब्रह्मचारी वगैरे जो कोणी भेटेल, त्यांचे यथाशक्ती आदरतिथ्य करून त्याजजवळ वेदांतापैकी प्रश्न विचारीत; परंतु समाधान होईना.

पुण्यात तुळशीबागेत नाना नातूंच्या माडीवर गोपाळराव दादा नातू, व्यंकटेश तेलंग, एक पुराणिक असे सत्पुरुषांच्या गोष्टी बोलत बसले होते. इतक्यात एक तेज:पुंज ब्राह्मण येऊन म्हणाला, ‘सद्गुरू - कृपेवाचून व्यर्थ आहे.’ वामनबुवांनी विनंती केली की, ‘जो चित्ताची शांती व स्थिरता करील त्यास मी सद्गुरू दत्तात्रेय मानू; परंतु अद्याप असा कोणी भेटला नाही.’ ब्राह्मण म्हणाला, ‘तू अक्कलकोटास जा, तुला श्रीस्वामीसमर्थ गुरुदर्शन देतील. तुझे समाधान होईल. जा लवकर!’ असे म्हणून तो ब्राह्मण कोठे गेला ते पाहताच तो अदृश्य झाला.

पुढे सगळे म्हणाले, एकदा खरे काय ते पाहावे. म्हणून मार्गशीर्ष प्रतिपदेस निघाले, ते सोलापुरास मौनीमहाराजांचे दर्शन घेऊन अक्कलकोटास गेले. महाराज पुढच्याच गावात आहेत, असे कळले. दुसरे दिवशी नदीवर गेले असता साक्षात श्रीस्वामी समर्थांनीच दर्शन दिले आणि समर्थ म्हणाले, “काय रे आमच्या ब्राह्मणांची थट्टा का केलीस?” अशी खूण मनाला पटताच वामनबुवांनी श्रींचे पूजन करून, प्रार्थना केली की, महाराज मजला अनुग्रह द्यावा. हे बुवांनी म्हणताच त्याजकडे महाराजांनी दत्ताअवधूत गीता दिली आणि म्हणाले, “आमची सेवा करा, म्हणजे ब्रह्मनिष्ठ व्हाल आणि तुझे संसारी गाठोडे आम्हास दे.” नंतर लंगोटी नेसून त्यांनी सर्व सामान समर्थांपुढे ठेवले. ते नंतर श्रींनी त्यांना मंत्रवून परत दिले. मग त्यांनी गाणगापुरास जाऊन गुरुचरित्राचे पारायण केले. एके दिवशी रात्री स्वप्नात दत्तगुरूंनी येऊन पोथी दिली व सांगितले की, “मीच अक्कलकोटास आहे. आता इतरत्र भटकू नकोस. जा भटाचा व तीर्थाचा विचार कर.” मग ते समाराधना करून अक्कलकोटास आले. श्रींचे दर्शन घेऊन त्यांना विचारले “भट कोण व तीर्थ कोण?”. श्रीसमर्थांनी त्यांना उत्तर दिले की, “शिवशंकर, निसर्ग म्हणजे भट व तीर्थ म्हणजे तीर्थरूप आई-वडिलांची व गाईची सेवा करणे.” मग ते पुण्यास मातोश्रीची सेवा, श्रीसमर्थांचे भजनपूजन करून आनंदात राहिले. स्वामी समर्थांची आयुष्यभर पूजा करू लागले व जनतेची सेवा करून परमसुखी झाले. तेथेच त्यांची पुण्याई वाढली.

-विलास खानोलकर
Comments
Add Comment