Monday, May 12, 2025

देशमनोरंजनमहत्वाची बातमी

'शार्क टँक इंडिया'ची 'पोल खोल' करणारा राहुल दुआचा 'तो' व्हिडिओ व्हायरल!

'शार्क टँक इंडिया'ची 'पोल खोल' करणारा राहुल दुआचा 'तो' व्हिडिओ व्हायरल!

मुंबई : 'शार्क टॅंक इंडिया' या सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन वर सुरु असलेल्या लोकप्रिय बिझनेस शोची 'पोल खोल' कॉमेडियन राहुल दुआ याने केली आहे. राहुल दुआचा 'तो' व्हिडिओ व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले आहे की, इतकेही खरे बोलायचे नसते. आता तिसऱ्या सीझनमधून तुझा पत्ता कट... असेही अनेकांनी म्हटले आहे.


'शार्क टँक इंडिया' या शोची सध्या देशभरात प्रचंड चर्चा सुरू आहे. देशभरातील तरुण, नवीन उद्योजक त्यांच्या हटके आणि नवीन कल्पना या शोमध्ये सांगतात आणि गुंतवणूक मागतात. त्यांच्या जास्तीत जास्त नफा मिळवून देणा-या बिझनेस आयडिया हे शार्क ऐकतात आणि त्यात गुंतवणूक करतात. पण शोमध्ये स्पर्धक म्हणून आलेल्या सगळ्यांनाच ही गुंतवणूक मिळतेच असे नाही.


'द शार्क टँक इंडिया'चा दुसरा सीझन देखील आता संपत आला आहे. पहिल्या सीझनला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. शोमध्ये नमिता थापर, विनिता सिंग, पियुष बंसल, अमन गुप्ता, अनुपम मित्तल, अमित जैन आणि अश्नीर ग्रोव्हर हे शार्क आहेत. तर कॉमेडियन राहुल दुआ हा शो होस्ट करत आहे.


काही दिवसांपूर्वी 'द शार्क टँक इंडिया'ची टीम 'द कपिल शर्मा शो'मध्ये सहभागी झाली होती. यावेळी राहुल दुआने असे काही सांगितले की, त्यामुळे शार्क टॅंक इंडियाच्या या दिग्गज शार्कची पोल-खोल झाली आहे.


यापूर्वी देखील शार्क टॅंक इंडिया स्क्रिप्टेड असल्याचे, नाटकी असल्याचे म्हटले गेले होते. शार्क अनेकदा मुद्दाम चांगल्या उद्योजकांनाही गुंतवणूक नाकारतात, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. राहुल दुआने मजेत का होईना पण खरे काय ते सांगून टाकले, असेच आता म्हटले जात आहे.






यासंदर्भातला कपिलच्या शोमधला राहुल दुआचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत राहुल शार्कबद्दल बोलत असताना तो म्हणतो की, 'यांना जर गुंतवणूक करायची असेल तर, ते कशीही करतात. आम्हाला बिझनेस समजला नाही, पण आम्हाला तू आवडला. पण एखादा फायद्यात सुरू असलेला बिझनेस असेल आणि तरीही यांना त्यांना जर गुंतवणूक द्यायचीच नसेल तर, त्याची चार कारणेही तयार असतात. एखादा बिझनेस बी टू बी म्हणजेच बिझनेस टू बिझनेस, बिझनेस टू कस्टमर दोन्हीमध्ये असेल तर हे बोलतात तुमचा फोकस नाहीये. आणि फक्त बी टू बी असेल तर म्हणतात तुम्हाला व्हिजन नाहीये. जर एखादी कंपनी लोकल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बिझनेस करत असेल तर, त्यालाही म्हणतात, काय करताय हे... आणि नसेल करत तरीही ते हेच बोलतात... का करत नाही.'


'शार्क टँक इंडिया' ही सोनीवर प्रसारित होणारी एक भारतीय व्यावसायिक वास्तव टेलिव्हिजन मालिका आहे. हा शो 'शार्क टँक' या अमेरिकन शोची भारतीय फ्रेंचाइजी आहे. हे पाच गुंतवणूकदारांच्या किंवा शार्कच्या पॅनेलसमोर व्यवसाय सादरीकरण करणारे उद्योजक दाखवतात, जे त्यांच्या कंपनीत गुंतवणूक करायची की नाही हे ठरवतात.

Comments
Add Comment