Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीरुळावर काम करत असलेल्या चौघांना रेल्वे इंजिनने चिरडले

रुळावर काम करत असलेल्या चौघांना रेल्वे इंजिनने चिरडले

चारही कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

विंचूर : लासलगाव रेल्वे स्थानकावर आज सकाळी पावणे सहाच्या दरम्यान लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन (टॉवर) चुकीच्या दिशेने आल्याने काम करत असलेल्या चार गँगमनला उडवल्याची घटना घडली. या घटनेत चारही गँगमनचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की लासलगाव रेल्वे स्थानकावर आज दिनांक १३ फेब्रुवारी रोजी पहाटे ५.४४ वा दरम्यान टॉवर (लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन) चुकीच्या दिशेने लासलगावकडून उगावकडे जात होते. किमी २३० व पोल नंबर १५ ते १७ मधील ट्रॅक मेंटन (ब्लॉक तयारी) करण्याचे काम सुरू होते. सदर काम ट्रॅक मेंटेनर कर्मचारी करत असताना त्यांना लाईन मेंटनेस करणाऱ्या टॉवरने धडक दिल्याने अपघातात जबर मार लागला. संतोष भाऊराव केदारे, वय ३८ वर्षे, दिनेश सहादु दराडे, वय ३५ वर्षे, कृष्णा आत्माराम अहिरे, वय ४० वर्षे, संतोष सुखदेव शिरसाठ, वय ३८ वर्षे या चौघांना लासलगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील पाटील यांनी तपासणी करुन या चारही रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. हे सर्व कर्मचारी ट्रॅक मेंटनर या पदावर काम करत होते.

कर्मचाऱ्यांना रेल्वेने उडवल्याने संतप्त झालेल्या चतुर्थ श्रेणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वेच्या चालकावर लासलगाव रेल्वे स्थानकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लासलगाव पोलिसांनी रेल्वे चालकाला सुरक्षितपणे दुसऱ्या ठिकाणी हलवले. यानंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी रेल रोको आंदोलन सुरू केले. या घटनेनंतर नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करत टॉवर इंजिन चालवणाऱ्या चालकाविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली.

त्याचबरोबर नऊ वाजून २८ मिनिटांनी मुंबईकडे जाणारी गोदावरी एक्सप्रेस देखील दहा मिनिटे रोखण्यात आली. यावेळी रेल्वे प्रशासन मुर्दाबाद, ट्रॅकमन एकता जिंदाबाद अशा घोषणा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिल्या. त्याचबरोबर दुर्घटना घडून तीन तास उलटले असले तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्यापही घटनास्थळी पाहणी केली नसल्याने नागरिकांकडून तसेच कर्मचाऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

घटनेनंतर चारही कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी जोरदार आक्रोश केला. घटना समजतात लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक गवळी, पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोठुळे, लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती सुवर्णा जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -