सन २००१ ची घटना आहे. तेव्हा परवेझ मुशर्रफ हे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि माजी लष्कर प्रमुख म्हणून भारतात आले होते. या भेटीत त्यांनी राजधानी दिल्लीतील दरियागंजमधील नहरवाली हवेलीला आवर्जून भेट दिली. याच घरात ते दिल्लीत असताना राहत होते. बालपण त्यांचे याच घरात गेले. स्वातंत्र्यानंतर मुशर्रफ परिवार पाकिस्तानला निघून गेला.
परवेझ मुशर्रफ यांचे नुकतेच दुबईत निधन झाले. ७९ वर्षांचे मुशर्रफ गेले काही दिवस बरेच आजारी होते. दिल्लीत जन्मलेले, पुढे पाकिस्तानात स्थलांतर केलेले, पाकिस्तानचे लष्करप्रमुख झालेले, भारतावर, कारगीलवर युद्ध लादणारे, पाकिस्तानमधील नवाज शरीफ यांची राजवट उलथवून टाकणारे, आपल्याच देशातून पलायन करून दुबईला शरण जाणाऱ्या मुशर्रफ यांची भारताच्या दृष्टीने कारगीलचे खलनायक म्हणूनच इतिहासात नोंद आहे.
परवेझ यांचा जन्म १९४३ मध्ये दिल्लीतील दरियागंज भागात एका संपन्न परिवारात झाला. त्यांचे आजोबा ब्रिटिशांच्या काळात टॅक्स कलेक्टर होते. वडीलही मोठ्या हुद्द्यावर अधिकारी होते. त्यांची आई अलिगढ मुस्लीम विद्यापीठात अध्यापक होती. १९४७ साली झालेल्या फाळणीनंतर मुशर्रफ परिवार कराचीला गेला. पाकिस्तानच्या नव्या सरकारमध्ये त्यांचे वडील विदेश मंत्रालयात अधिकारी होते. काही काळ त्यांची बदली तुर्कीला झाली होती.
परवेझ यांचे शिक्षण लाहोरच्या फॉरमेन ख्रिश्चन कॉलेजमध्ये झाले. ब्रिटनमधील रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडिजमध्येही त्यांनी शिक्षण घेतले. वयाच्या १८व्या वर्षी पाकिस्तानी मिलिटरी अकादमीत प्रवेश केला. वयाच्या एकविसाव्या वर्षी पाकिस्तानी सैन्यदलात सामील झाले. १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात ते सेकंड लेफ्टनंट होते. या युद्धात पाकिस्तानचा पराभव झाला. तरीही पाकिस्तान सरकारने परवेझ यांना शौर्य पदक बहाल केले.
१९९७ मध्ये पाकिस्तानात झालेल्या निवडणुकीनंतर नवाज शरीफ पंतप्रधान झाले. सत्ता हाती आल्यावर शरीफ यांनी आपल्या पसंतीच्या व मर्जीतील अधिकाऱ्यांची मोक्याच्या जागी नेमणूक करायला सुरुवात केली. १९९८ मध्ये शरीफ यांनी अनेक ज्येष्ठांना डावलून परवेझ मुशर्रफ यांची चीफ ऑफ द आर्मी स्टाफ या पदावर नेमणूक केली. लष्करप्रमुख म्हणून सूत्रे घेतल्यावरच परवेझ यांनी कारगीलवर हल्ला करण्याची योजना आखली. कारगील युद्धात पाकिस्तानला जबर पराभव पत्करावा लागला व सर्व जगात पाकिस्तानची नाचक्की झाली. कारगीलमधील पराभवाला परवेझ मुशर्रफच जबाबदार ठरवले गेले.
कारगील युद्धातील पराभवानंतर शरीफ व मुशर्रफ यांच्यातील संबंध बिघडले. ११ ऑक्टोबरला मुर्शरफ यांना त्यांच्या पदावरून हटवले गेले व १२ ऑक्टोबरला ते श्रीलंकेला रवाना झाले. शरीफ यांनी पाकिस्तानचे इंटेलिजन्सचे प्रमुख जनरल जियाउद्दीन यांच्याशी बोलणी करून मुर्शरफ यांना हटविण्याची योजना आखली. ही बाब मुर्शरफ यांना समजली. त्यांनी जनरल अजीज खान, जनरल एहलान-उल-हक आणि जनरल मेहमूद यांना नवाज शरीफ सरकार उलथविण्याचा आदेश दिला. मुशर्रफ यांच्या विमानाचे अपहरण करण्याचा व देशात दहशतवाद पसरविण्याचा आरोप लावून शरीफ यांनाच अटक केली गेली. पुढे त्यांना त्यांच्या ४० सदस्यांच्या कुटुंबीयांसह सौदी अरेबियात पाठवून दिले. मुशर्रफ यांनी ‘इन द लाइन ऑफ फायर’ या आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, त्यांनी कारगीलवर कब्जा करण्याची प्रतिज्ञा केली होती. पण नवाज शरीफमुळे ते असे करू शकले नाहीत.
फेब्रुवारी १९९९ मध्ये भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी बसमधून लाहोरला गेले. लाहोरमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्यांचे स्वागत केले. वाजपेयी-शरीफ यांच्या भेटीला जगभर महत्त्व मिळाले. लाहोर बस यात्रा हा वाजपेयींच्या काळात भारत-पाकिस्तान नाते संबंधातील एक टर्निंग पॉइंट होता. पण त्याला कारगील अतिक्रमणाने गालबोट लागले. लाहोर बस यात्रेनंतर अवघ्या तीन महिन्यांत पाकिस्तानी सैन्याने कारगीलवर हल्ला चढवला. पण भारतीय सैन्याने पाकिस्तानला सडेतोड जवाब दिला व अतिक्रमण मोडून काढले. ३ मे ते २६ जुलै १९९९ असे कारगील युद्ध चालू होते. या युद्धामागचा मास्टर माइंड परवेज मुशर्रफच होता. भारताने सुरू केलेल्या शांतता प्रक्रियेवर घाव घालण्याचा मुशर्रफ यांचा प्रयत्न होता. कारगील युद्धाचा भयानक कट मुशर्रफ यांनी आखला. पण पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पूर्ण अंधारात ठेवून… एवढेच नव्हे पाकिस्तानी हवाई दलाला किंवा नौदलला त्याची पुसटशीसुद्धा कल्पना नव्हती. भारताची गुप्तचर संघटना ‘रॉ’चे जाळे पाकिस्तानी सैन्य दलात थेट पसरले आहे, याची कल्पना मुशर्रफ यांना होती. त्यामुळेच त्यांनी सैन्यातील वरिष्ठ सहकाऱ्यांना कारगील अतिक्रमणाची कल्पना दिली नव्हती.
कारगील हल्ल्याची माहिती फुटली असती, तर त्यांनाच धोका निर्माण झाला असता तसेच तो हल्ला त्यांच्यावरच शेकला असता, याचीही त्यांना जाणीव होती. पाकिस्तानी सैन्याबरोबर दहशतवाद्यांचे जथ्थे भारताच्या हद्दीत घुसले होते, याचीही माहिती मुर्शरफ यांनी गोपनीय ठेवली होती. कारगीलमध्ये पाकिस्तानी सैन्य नव्हे, तर दहशतवादी घुसले आहेत, असा भारताचा समज व्हावा, असा मुशर्रफ यांनी कट रचला होता. कारगील युद्धात आपला सहभाग असल्याचा पाकिस्तानने नेहमीच इन्कार केला होता. पण मुशर्रफ यांनी त्यांच्या पुस्तकातच कारगील युद्धात पाकिस्तानी सेना सामील होती, असे म्हटले आहे. आपली राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मुशर्रफ यांनी कारगीलवर आक्रमण केले. या युद्धात आलेल्या अपयशाचे खापर त्यांनी नवाज शरीफवर फोडले. कारगीलमधून माघारी फिरण्यास नवाज शरीफ यांनी सांगितले, असा उल्लेख त्यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. भारत पाकिस्तानच्या शांतता प्रक्रियेला कारगील युद्धाने खिळ घातली. दोन्ही देशांतील संबंध आणखी ताणले गेले.
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना दोन्ही देशांत शांतता प्रक्रिया सुरू करण्याच्या हेतूने आगरा येथे भारत-पाकिस्तान शिखर बैठक झाली. आगरा शहरात १४ ते १६ जुलै २००२ या काळात भारत व पाकिस्तान दोन्ही देशांचे झेंडे फडकत होते. पाकिस्तानच्या वतीने राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ चर्चेसाठी आले होते. या बैठकीसाठी तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी आराखडा तयार केला होता. अडवाणी व मुशर्रफ यांच्या झालेल्या बैठकीत अडवाणी यांनी १९९३ मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट घडविणाऱ्या दाऊद इब्राहिमला भारताकडे सुपूर्द करावे, म्हणजे शांततेच्या प्रक्रियेला सुरुवात करता येईल, असे सांगताच, मुशर्रफ यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. आग्रा बैठक असफल झाली.
परवेझ मुशर्रफ यांना इस्लामाबादच्या विशेष न्यायालयाने २०१९ मध्ये देशद्रोहाच्या आरोपावरून मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती. त्यांच्यावर संविधान बदल्याचा आरोप होता. देशाच्या लष्करशहाला मृत्युदंडाची शिक्षा झालेले मुशर्रफ हे पाकिस्तानातील पहिलेच उदाहरण असावे. त्यांच्या शिक्षेच्या अंमलबजावणी अगोदर त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे शव इस्लामाबादच्या के. डी. चौकात तीन दिवस लटकवावे, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले होते. नंतर लाहोर उच्च न्यायालयाने त्यांची मृत्युदंडाची शिक्षा रद्द केली.
पाकिस्तानातील वादग्रस्त लष्करशहा अशी मुशर्रफ यांची इतिहासात नोंद राहील. १९९९ मधे नवाज शरीफ यांना हटवून त्यांनी सत्ता काबीज केली. २००१ मध्ये त्यांनी लष्करप्रमुख असताना स्वत:ला राष्ट्राध्यक्ष घोषित केले. दोन वेळा ते राष्ट्राध्यक्ष झाले. देशात आणीबाणी जारी केली. २००८ मध्ये त्यांनी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला.
२००९ मध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी जारी केलेली आणीबाणी असंविधानिक ठरवली. २०१२ मध्ये पाकिस्तानी संसदेने त्यांना अटक करण्याचा प्रस्ताव संमत केला. विदेशातून पाकिस्तानात येताच २०१३ मध्ये त्यांना अटक झाली. २०१६ मध्ये विशेष न्यायालयाने त्यांना फरार म्हणून घोषित केले. मुशर्रफ हे कारगीलचे खलनायक होतेच. पण नंतर ते पाकिस्तानलाही नकोसे झाले होते….
-डॉ. सुकृत खांडेकर
sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in
मोखाडा : तालुक्यातील मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या घटना थांबविण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नसल्याचे आता समोर…
मुंबई महापालिकेने बेस्टच्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून यामुळे बेस्टला ५९० कोटी रुपयांचा वार्षिक महसूल प्राप्त…
अनिल आठल्ये, निवृत्त कर्नल, ज्येष्ठ अभ्यासक अमेरिकेच्या अध्यक्षांकडून नवनवीन धोरणांचा धडाका उडवला जात असताना जागतिक…
श्रुती गोखले यांचा जन्म एका बाळबोध, मध्यम वर्गीय घरात, कुलकर्णी कुटुंबात पुण्यात झाला. आईला शिक्षणाची खूप…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग सौभाग्य. चंद्र राशी…
जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत…