दागिना हा प्रत्येक स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय. ती स्वत: ट्रेडिशनल-डे साठी साडीला साजेसे दागिने शोधत होती; परंतु असे पारंपरिक दागिने मिळाले नाहीत. गरज ही शोधाची जननी असते, ही म्हण तिने प्रत्यक्षात उतरवली. गरजेतून तिने दागिने तयार करत मराठमोळ्या पारंपरिक दागिन्यांचं एक प्रशस्त असं दालनच उभं केलं. यात दुग्धशर्करा योग घडला जेव्हा चंद्रमुखीने हे दागिने परिधान केले आणि महाराष्ट्रासह अवघ्या जगाला भुरळ पाडली. चंद्रमुखीसह मराठी आणि अमराठी स्त्रियांना आपलासा आणि हवाहवासा वाटणारा तो दागिन्यांचा ब्रॅण्ड म्हणजे कांक्षिणी. ही कथा आहे कांक्षिणीच्या सर्वेसर्वा स्नेहा गुंड यांची.
स्नेहा गुंड म्हणजे पूर्वाश्रमीची स्नेहा मधुकर सैद. घरात वडिलांचा व्यवसाय होता, त्यामुळे साहजिकच स्नेहा घरातच उद्योजकता अनुभवत होती. स्नेहाचा जन्म डोंबिवलीचा. डोंबिवलीच्याच स्वामी विवेकानंद विद्यालयातून तिचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. पुढे पेंढारकर महाविद्यालयातून इंग्रजी साहित्यात बी.ए. पदवी संपादन केली. याच विषयात २००७ साली मुंबई विद्यापीठातून तिने पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. यानंतर स्नेहाने संज्ञापन व पत्रकारिता विषयामधील एका वर्षाची पदव्युत्तर पदविका सुद्धा मिळवली. एका संस्थेत तिने तब्बल आठ वर्षे ‘डिजिटल कन्टेंट रायटर’ म्हणून काम केलं.
२०१३च्या आसपासची गोष्ट. स्नेहाच्या ऑफिसमध्ये ट्रेडिशनल डे होता. या दिवशी पारंपरिक साडीला साजेसे दागिने हवे होते. स्नेहा तसे दागिने डोंबिवलीमध्ये शोधत होती. पण तिला कुठेच दागिने मिळाले नाहीत. आपल्या डोंबिवलीमध्ये दागिन्यांचं एक्स्क्लुझिव्ह असं काहीच नाही याचं तिला वाईट वाटलं. मात्र हीच ती संधी हेरून ती कामाला लागली. नोकरी सुरू असतानाच तिने दागिन्याचा व्यवसाय सुरू केला. छोट्या प्रमाणावर दागिने तयार करून ती आपल्या वर्तुळात विक्री करू लागली. त्यानंतर शनिवार-रविवार जेव्हा सुट्टी असायची, तेव्हा छोट्या स्तरावरील एक्झिबिशन करायची.
२०१४ मध्ये अतिश गुंड या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुविद्य तरुणासोबत स्नेहाचा विवाह झाला. कांक्षिणी म्हणजे ‘महत्त्वाकांक्षा असलेली स्त्री’ कांक्षिणी हे नाव अतिश यांनीच सुचवलं. या नावानेच २०१४ सालापासून ऑनलाइन विक्री व्यवसायाला सुरुवात झाली. २०१४ साली डोंबिवलीमध्ये भरलेल्या प्रदर्शनात स्नेहाने भाग घेतला. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. पुढे २०१५ मध्ये स्नेहाने स्वत:च्या घरातच तीनदिवसीय दागिन्यांचे प्रदर्शन भरविले. यास उदंड प्रतिसाद मिळाला. तब्बल ५० हजार रुपयांची उलाढाल झाली. अल्पावधीत दागिन्यांच्या चमचमत्या दुनियेत कांक्षिणीने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. कॉपर आणि ब्रासला सोन्याचे मुलामा दिलेले हे दागिने भारताच्या सीमा पार करून थेट परदेशात पोहोचलेले आहेत.
ग्राहकांच्या मागणीनुसार कलाकुसर केलेले पारंपारिक मराठमोळे दागिने हे कांक्षिणीचे वैशिष्ट्य. ठुशी, तन्मणी, कोल्हापुरी साज, वज्रटीक, दुर्वाहार, चंद्रहार, चिंचपेटी, गोफ, नथ, खोपा, बुगडी, बाजूबंद, कंठी, बोरमाळ, पाटल्या, सरी, मंगळसूत्र असे अनेक दागिने प्रकार कांक्षिणीमध्ये उपलब्ध आहेत.
एखाद्या नववधूला टिपिकल डिझाइनचे दागिने देण्यापेक्षा इंडो वेस्टर्न टच देऊन नवीन काय देता येईल, याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. कस्टमाइझ काम आम्ही नववधूसाठी करतो. त्यामुळे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी अशा बऱ्याच ठिकाणाहूनसुद्धा नववधूच्या दागिन्यांसाठी स्टुडिओला भेट देतात. महाराष्ट्रातूनच नाही, तर भारताबाहेरसुद्धा कांक्षिणी या ब्रँडला वाग्दत्त वधूकडून प्रेम मिळत आहे. ते खरंच खूप छान वाटते. कस्टमाइझ काम केल्यामुळे वेगळेपण अबाधित राहते. कांक्षिणीचे दागिने पटकन ओळखता येतात. लोकांचा प्रतिसाद प्रचंड मिळतोय. तन्मणीमध्ये आम्ही वैविध्य दिले आहे. अनेकवेळा कांक्षिणीच्या डिझाइन्स कॉपी होतात. कॉपी करणाऱ्यांना सांगावेसे वाटते की, तुम्ही तंतोतंत कॉपी करू नका. एक आयडिया घ्या. त्यानुसार कल्पकतेने डिझाइन करा. जसेच्या तसे कॉपी करू नका.” असे स्नेहा कळकळीने सांगते.
सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, स्पृहा जोशी, जेनेलिया देशमुख, राणी गुणाजी यांसारख्या नामवंत अभिनेत्री या कांक्षिणीच्या जितक्या चाहत्या आहेत, तितकाच त्यांचा कांक्षिणीच्या यशात मोठा वाटा आहे. चंद्रमुखीच्या परफॉर्मन्सला आवश्यक असलेले दागिने कांक्षिणीचेच. अमृता खानविलकर आणि कांक्षिणीचे नाते खूप स्पेशल आणि अतूट आहे. अमृतामुळेच कांक्षिणीचं एका ब्रॅण्डमध्ये रूपांतर झालं.
डोंबिवलीचा कांक्षिणी स्टुडिओ हा आता मराठमोळ्या दागिण्यांचं माहेरघर म्हणून ओळखला जातो. २०१९ मध्ये स्नेहाने थेट मॉरिशसमध्ये प्रदर्शनात भाग घेतला. आता हल्लीच झेप या संस्थेतर्फे दुबई येथे भारतीय वस्तू प्रदर्शनात कांक्षिणीची उपस्थिती होती. आपली मराठी संस्कृती, परंपरा, दागिने, साड्या जगभरात पोहोचाव्या या उद्देशाने आता तिला आंतरराष्ट्रीय अवकाश खुणावू लागलं. बेकर्सफील्ड-अमेरिकेत प्रायोगिक तत्वावर पहिली शाखा २०२२ ला सुरू करून सीमोल्लंघनाचा श्रीगणेशा केलाय . कांक्षिणी ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंडमध्ये पोहोचलेली आहे. भारतात आणि परदेशात कांक्षिणीच्या शाखा सुरू करणे आपले ध्येय असल्याचे स्नेहा गुंड नम्रपणे नमूद करतात.
या संपूर्ण व्यावसायिक प्रवासात स्नेहाला त्यांच्या सासूबाई हर्षला हरिश्चंद्र गुंड यांनी मोलाची साथ आहे. सोबतच सासरे, पती अतिश आणि कन्या स्वरा आई वंदना, बाबा मधुकर सैद, बहीण अर्चना आणि तिचे पती दिनेश यांनी देखील अनमोल सहकार्य केले. या सगळ्यांमुळेच कांक्षिणी आता जागतिक पातळीवर उभी राहण्यास सिद्ध झाली आहे. अनेक महिलांसाठी कांक्षिणी स्टुडिओ आणि स्नेहा प्रेरणादायी आहेत. अनेकजणी निव्वळ प्रेरणा घेण्यासाठी या स्टुडिओत येतात.
स्नेहाला भेटतात.
“कोणतंही काम श्रेष्ठ अथवा हलकं नसतं. प्रत्येक व्यवसायाचे स्वत:चे फायदे अन तोटे असतात. आपल्याला जे भावतं. ज्यामध्ये आपल्याला गती असा व्यवसाय केला पाहिजे. चिकाटी, मेहनत आणि कल्पकता यांचा वापर केल्यास कोणताही उद्योग यशस्वी ठरतो. हे ज्या ‘लेडी’ला उमगलं, तीच खरी लेडी बॉस ठरते,” स्नेहा लेडी बॉसची व्याख्या इतक्या सहज सुंदर शब्दांत करतात. थोडक्यात सांगायचं, तर स्नेहा गुंड हे उद्योग क्षेत्रातील बावनकशी सोनं आहे.
-अर्चना सोंडे
[email protected]