- शंभूराज शिवाजीराव देसाई, मंत्री (राज्य उत्पादन शुल्क) महाराष्ट्र राज्य पालकमंत्री सातारा, ठाणे जिल्हा
आपल्या केवळ सहा महिन्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत राज्याच्या हिताचे धडाकेबाज निर्णय आणि कृतीतून कायमच सर्वांच्या आदरस्थानी असलेले आणि प्रसंगी आमच्यासारख्या सामान्य सहकार्याच्या जीवाला जीव देणारे महाराष्ट्राचे एकमेव लोकप्रिय,लाडके मुख्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय ना. एकनाथजी शिंदे साहेब यांचा आज वाढदिवस…! त्यांना वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा…!
सन्माननीय शिंदे साहेब हे केवळ राजकारणी, समाजकारणी नाहीत, तर ते उत्तम उद्योजक, प्रयोगशील शेतकरी आहेत. सामाजिक जीवनात वावरताना प्रॅक्टीकल विचार करून त्याला कृतीची पूरक जोड देणारी जी काही मोजकी नेतेमंडळी आहेत, त्यात शिंदेसाहेबांचा अव्वल क्रमांक लागतो. आपल्या मंत्रीपद कार्यकाळात कोरोना संकटाच्या काळ असो अथवा आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या केवळ सहा महिन्यांतील कार्यकाळ असो. कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता ते महाराष्ट्रासाठी ज्या तळमळीने, तडफेने कामे करतात त्याला तोड नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातील प्रत्येकाला त्यांच्या प्रती जिव्हाळा, आदर, आपलेपणा वाटतो.
कोणतीही विकासकामे साकारताना त्यांनी कधी पक्षीय भेद न करता महाराष्ट्र भर विकासाचे जाळे निर्माण केल्याप्रसंगी विचारधारा जरी भिन्न असल्या तरी एकमेकांप्रती आदर, मैत्री, जिव्हाळा, आपुलकी सांभाळण्याची आणि जपण्याची आपल्या महाराष्ट्राची राजकीय, सामाजिक परंपरा आहे. शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे संस्कार साहेबांनी आपल्या कृतीतून महाराष्ट्रात रुजवले. त्याच संस्काराच्या शिदोरीवर आमच्यासारखे कार्यकर्ते काम करत आहेत. तोच खरा महाराष्ट्राच्या मातीचा संस्कार आहे, त्याला अहंकाराचा, खुनशीपणाचा वास नाही. त्यामुळे माननीय साहेबांच्यात रुजला तो महाराष्ट्राच्या मातीतला संस्काराचा गुण आहे.
आदरणीय शिंदेसाहेब आता जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असले तरी राज्याच्या विधिमंडळात सहकारी म्हणून २००४ पासून आम्ही एकत्र काम करीत आहे. सन २००४ मध्ये एकाच वेळी आम्ही दोघेही विधानसभेवर निवडून आलो तेव्हापासूनच नव्हे, तर त्यापूर्वीपासून शिवसेनेमध्ये माझे आणि शिंदे साहेबांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि आजही ते तेवढेच जिव्हाळ्याचे आहेत.
सत्ता असो अथवा नसो सत्तेत असताना अहंकार आणि विरोधी पक्षात असताना एकारलेपणा, अाक्रस्ताळेपणा मला त्यांच्यात कधीही जाणवला नाही. मैत्री कशी जपावी? सहकाऱ्यांशी कसा स्नेह ठेवावा? हे कुणाकडून शिकावे, तर केवळ माझ्यासमोर केवळ एकच आदर्श व्यक्तिमत्त्व उभे राहते ते आदरणीय शिंदे साहेबांचे! एवढेच नव्हे, तर अगदी जीवाला जीव देणारे व्यक्तिमत्त्व कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर कोणी विचारले, तर तेदेखील केवळ आणि केवळ एकच नाव माझ्या डोळ्यांसमोर येईल ते म्हणजे शिंदे साहेब यांचेच! आणि ही केवळ माझीच भावना नाही, तर या राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेकांची माझ्यासारखी हीच भावना असेल, यात तिळमात्र शंका नाही. संकट काळात कोणीही, कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही केले पाहिजे. मदतीच्या कामांचा दिखावा केला नाही पाहिजे. अनावश्यक प्रसिद्धी केली नाही पाहिजे, प्रत्येकाने आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, असं आपल्या कार्यकर्त्यांना रोखठोकपणे सांगणारे सन्माननीय शिंदेसाहेब त्यामुळेच वेगळे ठरतात. त्यांचा हा रोखठोक सल्ला राजकीय, सामाजिक जीवनात काम करणाऱ्या प्रत्येकालाच अंतर्मुख करणारा आहे, दिशा देणारा, मार्गदर्शन करणारा आहे.
सन्माननीय शिंदेसाहेब हे स्पष्टवक्ते आहेत. विकासाची दृष्टी असणारे आणि त्या दृष्टीला कृतीची जोड देणारे नेते आहेत. त्यामुळेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत त्यांच्या कामांचा आलेख ठळकपणाने दिसतो. त्यासाठी स्वतंत्रपणे प्रसिद्धी करण्याची गरज लागत नाही. मंत्रीमंडळात त्यांच्याबरोबर काम करत असताना सन्माननीय साहेबांचे फार मोलाचे मार्गदर्शन मिळते. महाराष्ट्राच्या तळागाळातील समस्या, प्रश्न यांबरोबर विकासकामांवरही साहेबांचे बारकाईने कसे लक्ष असते, प्रत्येक विषयाला ते नेहमीच कसे सकारात्मकतेने, संवेदनशीलपणे प्रतिसाद देतात हे यानिमित्ताने विशेषत्वाने नमूद करावेच लागेल आणि हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने आणखी मिळालेली शिदोरी समजतो.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मातीशी घट्ट नाळ असलेला हा संवेदनशील आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला नेता राज्याचा डोलारा सांभाळताना आपल्या कर्मभूमी आणि मायभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील गल्लीपासून वाडी-वस्तीवरील विकासाच्या प्रश्नांची सोडवणूक करताना ही तेवढ्याच तडफेने तत्पर असतो हे नम्रपणे नमूद करावे लागेल आणि त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे, हे माझे मी भाग्य समजतो. त्यांच्या या सहकार्याच्या, संवेदनशीलतेच्या भावनेमुळेच महाराष्ट्रात ते अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्या वागण्या-बोलण्यात सातारी कणखरबाणा असला तरी ते मोठ्या मनाचे नेते आहेत. त्यामुळेच केवळ पश्चिम महाराष्ट्रातच नाही, तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही त्यांच्याबद्दल प्रत्येकाला आपुलकी, आपलेपणा वाटतो. सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. त्यांच्यात कधीही अहंकार, आत्मप्रौढी दिसत नाही, हेच त्यांचे वैशिष्ट्ये म्हणावे लागेल.
नवतंत्रज्ञानाचे आणि आधुनिकतेचे आचरण करणारे सन्माननीय शिंदेसाहेब आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्रभर आपल्या कीर्तीचा सुगंध पसरवत आहेत. राज्यात प्रत्येकाला त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे. नवकल्पनांच्या जोरावर आणि धडाकेबाज कृतीतून त्यांच्या हातून राज्याची अशीच सेवा निरंतर घडो, त्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो हीच त्यांच्या वाढदिनी माझी प्रार्थना..!