काश्मीर ते कन्याकुमारी चार हजार किलोमीटरचे अंतर पायी चालत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेचा मोठा गजावाजा केला. मै मोहब्बत की दुकान खोलने आया हूँ, असे ते प्रत्येक भाषणामध्ये सांगत होते. ही यात्रा म्हणजे तपश्चर्या असल्याची भावना आपल्या भाषणातून त्यांनी व्यक्त केली होती. एका बाजूला प्रेमाची भाषा वापरायची आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपवर टीका करायची हा यात्रेचा मूळ उद्देश होता. पण आता तळागाळातील काँग्रेसजनांचे सोडा, महाराष्ट्रातील आजी-माजी काँग्रेस पक्षाध्यक्षांमधील शिगेला पोहोचलेला संघर्ष कसा मिटवायचा? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यावेळी राहुल गांधी यांनी भारतातील सुजाण जनतेला शहाणे कराण्याचा खटाटोप करण्यापेक्षा काँग्रेसमधील अंर्तगत लाथाळ्यांचे प्रदर्शन होऊ नये याची काळजी करण्याची अधिक गरज असल्याचे दिसून येत आहे. झाले असे की, नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरून सुरू झालेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा सुप्त वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
नाना पटोले यांच्या कार्यशैलीबद्दल उघड नाराजी व्यक्त करत बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे दिल्ली हायकमांडकडे राजीनामा दिल्यामुळे ते या वादाबाबत काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यातील वादावर अनेकदा काँग्रेस वर्तुळात चर्चा होत असे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या कामाविषयी नाराजी थोरात यांनी बोलून दाखवली होती. नाना पटोले यांच्या कार्यशैलीबद्दल व्यक्त केलेली नाराजी आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दाखवलेली निष्क्रियता. तसेच पक्ष आणि तांबे कुटुंबात समन्वय घडवून आणण्यात आलेले अपयश यामुळे थोरात यांचे पद अडचणीत येईल, असे बोलले जात होते, तर दुसरीकडे थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचे सांगितले आहे. तसेच आपल्याला पक्षात अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती.
नागपूर अधिवेशनादरम्यान, अपघातामुळे बेडरेस्टवर असलेले बाळासाहेब थोरात यांनी त्यांचा भाचा सत्यजित तांबे हा अपक्ष निवडणूक लढवत असतानाही कोणतीही भूमिका जाहीर केली नव्हती. महाविकास आघाडीचा उमेदवार रिंगणात असतानाही थोरात यांचा नेमका कोणाला पाठिंबा ही भूमिका उघडपणे बाहेर आली नव्हती. मात्र वाढदिवसानिमित्त थोरात यांनी हॉस्पिटलमधून संगमनेर येथील कार्यक्रमात नागरिकांशी आणि आपल्या कार्यकर्त्यांशी ऑनलाइन संवाद साधत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. त्यांचा सगळा रोष हा नाना पटोले यांच्यावर होता. आता नाना पटोले यांच्या कार्यशैलीविषयी थोरात यांनी प्रश्न उपस्थित केले. आपण प्रदेशाध्यक्षांसोबत काम करू शकत नसल्याचे सांगितले. पुणे कसबा आणि चिंचवडमधील पोटनिवडणूक झाल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून बाळासाहेब थोरात यांच्या पत्रावर कारवाई होणे अपेक्षित होते; परंतु त्या आधीच बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता आजी-माजी प्रदेशाध्यक्षांना कसे समजावयाचे? असा प्रश्न काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाला पडला असेल.
बाळासाहेब थोरात यांचे घराणे हे पूर्वीपासून काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले आहे. २०१४ नंतर महाराष्ट्रातील काँग्रेस ही नावापुरती राहिली होती. एकेकाळी महाराष्ट्र राज्य हे काँग्रेसचे बालेकिल्ला म्हणून मानले जात होते. मोदी लाटेनंतर काँग्रेसचे बुरुज ढासळले गेले. महाराष्ट्रातील राजकारणाचे धडे देणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील काँग्रेसचा गड हा बाळासाहेब थोराताच्या रूपाने शिल्लक राहिला होता. महाराष्ट्राच्या पक्षातील काँग्रेसच्या कठीण काळात बाळासाहेब थोरात यांच्या खांद्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. थोरात कुटुंबावर गांधी कुटुंबाचा प्रचंड विश्वास असल्याचे दिसून आले होते. २०१९च्या विधानसभा निवडणुका काँग्रेसने लढविल्या. त्यावेळी दिल्लीतून कोणताही नेता महाराष्ट्रात प्रचाराला आला नव्हता. मात्र थोरात यांनी काँग्रेसच्या परंपरागत मतांच्या जोरावर ४२ आमदारांचा आकडा गाठण्यास यश मिळवले होते. २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्वात कमी जागा काँग्रेस पक्षाच्या असतानाही महाविकास आघाडी सरकारचे कडबोळे बांधले गेले आणि विरोधी पक्षात बसणारी काँग्रेस हे सत्तेवर आली.
बाळासाहेब थोरात हे मंत्री झाल्याने ‘एक व्यक्ती, एक पद’ या निकषानुसार त्यांना प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागले. त्या पदावर नाना पटोले हे विराजमान झाले. विशेष म्हणजे नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष होते. त्यांनी त्या पदाचा राजीनामा देऊन पक्षाचे काम करण्याची इच्छा पक्षनेतृत्वाकडे व्यक्त केली होती. त्यानुसार आजतायगत ते प्रदेशाध्यक्ष पदावर आहेत. मात्र थोरात यांच्यासह पक्षांतील अनेकांच्या नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीबद्दल तक्रारी आहेत. थोरात यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या राजकारणातील वाद हा काँग्रेस हायकमांडकडे गेला आहे. आता भारतातील जनतेला उपदेशाचे डोस देणारे राहुल गांधी हे अंतर्गत धुसफूस कशी दूर करणार? याकडे आता लक्ष लागले आहे. ज्या पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला स्वत:चे घर सांभाळता येत नसेल, तर त्यांनी जनतेला उपदेशाचे डोस देणे किती योग्य आहे, हा विचार आता देशातील जनता करत आहे.