Share

एका गावात धनानंद व रमा नावाचे एक श्रीमंत जमीनदार जोडपे राहत होते. ते दोघेही श्रीमंत असूनही खूप प्रेमळ व दयाळू होते. कोणाही गरजवंतास ते नि:स्वार्थीपणे अगदी मनापासून मदत करीत होते. त्यांना कनक नावाचा एक मुलगा होता. कनकच्या अंगी आई-वडिलांचा, दयाळूपणाचा गुण आला होता.

एकदा असेच कनक व त्याचे मित्र शाळा सुटल्यानंतर बाजूच्या पटांगणावर खेळायला गेले. तेथे एका कोप­ऱ्यात एक कुत्र्याचे गोंडस पिल्लू मलूल होऊन पडलेले त्यांना दिसले. कनक ताबडतोब त्या पिल्लाजवळ गेला. त्याने पिलाला उचलून बघितले, तर त्याच्या पायाला मोठी जखम झालेली त्याला दिसली. तो त्या पिलाला उचलून घरी घेऊन आला. त्याने स्वयंपाक घराच्या कोनाड्यातून एका वाटीत थोडी हळद आणली. स्वत:च एका स्वच्छ व नरम कापडाने त्या पिलाची जखम साफ केली. मग त्याने त्याच्या जखमेत व्यवस्थित हळद भरली. नंतर त्याने दुसऱ्या एका स्वच्छ कापडाची एक चिंधी फाडली व त्याच्या जखमेवर नीट पक्की बांधली. एव्हाना रमाबाई बाहेरून घरी आल्या होत्या. आईने विचारण्याआधीच कनकने त्या पिल्लाची अवस्था आईला सांगितली व विचारले, आयी, आपून पाळू काय या पिलाले. लय चांगलं दिसते ते.

त्याने सांगितलेले ऐकून रमाबाईंना कनकचे कौतुक वाटले. त्याले अगुदर थोडसं आपलं घरात ठेयेलं दूध पाज. भुकेलं दिसतं बिचारं. तुये बाबा हाव म्हनतीन तं वागवू आपुन त्याले त्या म्हणल्या. त्याने त्या पिल्लाला वाटीत आपल्या घरचे दूध पाजले. संध्याकाळी शेतातून धनानंद घरी आल्यानंतर त्यांनी परवानगी देताच कनकने त्या पिल्लाचे मोती असे नामकरण केले. कनक दररोज सकाळ-संध्याकाळ नियमितपणे त्याला दूध पाजू लागला. कनक शाळेत गेल्यानंतर रमाबाईही मोतीची काळजी घ्यायच्या. थोड्याच दिवसात मोतीची जखम दुरुस्त झाली. कनक त्याला दोन्ही वेळा न चुकता दूध-भाकरीचा काला खाऊ घालायचा. त्यामुळे तो एकदम चांगला धष्टपुष्ट झाला. दिसामासाने दोघेही वाढू लागले, मोठे झाले; परंतु मोती मात्र आता बांध्याने चांगलाच भक्कम, मोठा धिप्पाड नि शरीराने सिंहासारखा भरदार असा जबरदस्त व बलवान कुत्रा झाला होता. त्याला बघूनच चोरांची भीतीने गाळण उडायची. एके दिवशी रमाबाईंची त्यांच्या शेतात जायची इच्छा झाली. सुट्टी असल्याने कनकही त्यांच्यासोबत जायला निघाला. मग काय मोती तर त्यांच्याही पुढे चालू लागला. ते रस्त्याने जात असता अचानक बाजूच्या दाट झाडीतून एक लांडगा बाहेर आला. तो गुरगुरत जोराने ह्या मायलेकांकडे येऊ लागला. लांडग्याची चाहूल लागल्याबरोबर मोती सावध झाला व त्याने लांडग्यावर हल्ला करण्याचा पावित्रा घेत त्याच्यासमोर उभा ठाकला. कनक व रमाबाईंनी मदतीसाठी जोरजोरात आरडा-ओरडा सुरू केला.

लांडग्याने मोतीला बघताच तो मोतीवर चालून गेला. मोतीही त्याच्यावर धावून गेला नि जोराने त्याच्यावर तुटून पडला. शेवटी खास दुधाच्या ताकदीवर पोसलेल्या मोतीच्या शक्तीपुढे लांडग्याची डाळ न शिजता पिछेहाट झाली. मोतीने त्याला जंगलात पिटाळून लावले व मगच माघारी परत आला; परंतु लांडग्यासोबतच्या लढाईत त्याच्या अंगावर बऱ्याच जखमा झाल्या होत्या.

तोपर्यंत कनक व त्याच्या आईने जोरजोराने दिलेल्या आवाजाने आजूबाजूच्या शेतातील लोकंसुद्धा हातात लाठ्या-काठ्या घेऊन धावत आले होते. त्यांनीही धावत येताना मोतीचा अचाट पराक्रम पाहिला होता. मोती येताबरोबर कनकने त्याला जवळ घेतले व त्याची पाठ थोपटली. रमाबाईंनी मायेने त्याच्या पाठीवरून हात फिरवित हळुवारपणे आपल्या लुगड्याच्या पदराने त्याच्या जखमा पुसल्या. एका जणाने बाजूच्याच कुंपणातून अघिरड्याचा पाला काढून आणला व त्याचा आपल्या हातावर चोळून रस काढला व तो मोतीच्या जखमांवर लावला. ते घरी परत आले नि मोतीला त्यांनी पशूंच्या डॉक्टरांकडे मोतीला नेले. डॉक्टरांच्या औषधोपचाराने मोती ४-५ दिवसांत खडबडीत बरा झाला.

-प्रा. देवबा पाटील

Recent Posts

पाकिस्तानला भारताच्या प्रतिहल्ल्याची भीती!

सीमेवर हालचाली वाढल्या, गावं रिकामी केली; सैन्याच्या सुट्ट्याही रद्द... भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची…

14 minutes ago

Summer Footwear : उन्हाळ्यात स्टायलिश फुटवेअर खरेदी करताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

उन्हाळ्याच्या (Summer) हंगामात घट्ट शूजऐवजी सँडल (Sandals) घालणे खरोखरच आरामदायक आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये शरीराला थंड…

39 minutes ago

थरार, आक्रोश आणि अश्रूंचा डोंगर : डोळ्यासमोर गेले कर्ते पुरुष; लेले, मोने, जोशी कुटुंबांचा हृदयद्रावक अनुभव

लेले, मोने आणि जोशी परिवाराने सांगितला तिथे घडलेला सर्व थरार मुंबई : काश्मीरच्या निसर्गरम्य खोऱ्यात…

42 minutes ago

Indus Water Treaty : सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्यास भारताची पूर्वतयारी!

नवी दिल्ली : मंगळवार २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे…

1 hour ago

“कटातील सर्वांना कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा इशारा

दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली: पहलगाममधील पर्यटकांवर…

1 hour ago

अतिरेक्यांची माहिती द्या, वीस लाख रुपये मिळवा

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम…

3 hours ago