कोकणात जत्रा, उत्सवाला सुरुवात झाली आहे. शनिवारी सिंधुदुर्गमधील अंगणेवाडी येथे भराडी देवीचा जात्रोत्सव झाला. रत्नागिरीत प्रसिद्ध पीर बाबरशेख येथे उरूस आज आणि उद्या भरत आहे. असे अनेक जात्रोत्सव आता अनेक गावागावांत भरवले जातील. त्या निमित्ताने गाव एकत्र येईल.
या जात्रोत्सवांना धार्मिक अधिष्ठान असलं तरीही त्याचं महत्व वेगळं आहे. धार्मिक भावभावना जोडलेल्या असतात, पण याच निमित्ताने माणसं एकत्र येतात. गेल्या काही वर्षांत सोशल मीडिया आणि मोबाइलमुळे माणसं दुरावतात की काय, सोशल संवाद साधत अलिप्त राहतात की काय, असं चित्र निर्माण झालं होतं. पण कोरोनाने जग थांबलं. पण संवाद आणि प्रत्यक्ष भेटीचं महत्त्व अधोरेखित केलं. या आपल्या माणसांच्या, सवंगड्यांच्या गाठी-भेटी या आशा उत्सवातच अधिक होतात. काहीही झालं तरीही भेटणं, बोलणं ही माणसाची महत्त्वाची गरज आहेच, दैनंदिन गरज हवं तर म्हणूया. ही गरज आशा उत्सवांमध्ये पूर्ण होते. एकीकडे या गाठीभेटी आहेत, तर दुसरीकडे अनेक सामाजिक उपक्रम अशा ठिकाणी राबवले जातात. माणसं एकमेकांच्या मदतीला धावून जातात. गरजेला उभी राहतात. अनेक सामाजिक संस्था समाजाची गरज म्हणून विविध कार्यक्रम राबवतात आणि त्याचा उपयोग समाजातील अनेक घटकांना होत असतो. याच उत्सवामध्ये लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, उच्च-नीच हा भेदाभेद एकदम बाजूला होतो, समाजातील ही अदृश्य दरी एका क्षणात संपुष्टात येते, देवाच्या पायाशी सगळेच जण एक होऊन जातात आणि समाजातील एकोपा टिकून राहण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. हे सामाजिक अभिसरण खूपच महत्त्वाचे. त्यातूनच समाज निकोप आणि सदृढ राहतो. काळ बदलत असतो, अशा बदलांचा परिणाम आपल्या जीवनमानावर, विचारांवर होत असतो. मात्र हे बदल समाजाची घडी बदलणारे असू नयेत. अन्यथा समाजव्यवस्था विस्कळीत होते. त्याचा परिणाम नव्या पिढीवर होत असतो. त्यामुळेच काळ बदलला तरी एकोपा टिकून राहणे आवश्यक असेल, तर सामाजिक सलोखा टिकून राहणे आवश्यक असेल, तर अशा सामुदायिक भेटी-गाठी होणे अवश्यक आहे. त्यासाठी या जत्रा, उत्सव एक उपयोगी व्यासपीठ ठरते.
या सगळ्या गोष्टी सामाजिक स्तरावर झाल्या. पण याचं जत्रांमधून खूप मोठी आर्थिक उलाढाल होत असते. अंगणेवाडीसारख्या जात्रांमधून लाखोंचा समुदाय एका ठिकाणी जमत असतो. त्यावेळी जत्रेत उभारलेल्या बाजारपेठा अनेकांची वर्षाची बेगमी करून देतात. सध्याचा काळ हा खरीप हंगाम संपून गेलेला काळ आहे. शेतीची गडबड नाही. उन्हाळी शेती कोकणात फारशी दिसून येत नाही. अशावेळी या जत्रांमधून होणारी आर्थिक उलाढाल उपयोगी ठरते. काही कोटींतील ही उलाढाल कोकणातील आर्थिक उलाढालीतील महत्त्वाचे स्त्रोत आहे.
एकूणच या जत्रा आणि उत्सव कोकणात वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीने महत्त्वाची भूमिका बजावत असतात. तो जत्रेचा काळ आता सुरू झाला आहे. यातूनच नव्या ऋतूतील नवं कोकण, उत्साही कोकण, एकत्र आलेलं, गर्दीत हरवलेलं कोकण आता पुन्हा दिसणार आहे.
-अनघा निकम-मगदूम