Wednesday, April 23, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यम्हातारा (ना) इतुका १९४६ - २०२३

म्हातारा (ना) इतुका १९४६ – २०२३

ग्राहकांना सुरक्षिततेची आणि दर्जाची हमी देणाऱ्या आस्थापनेला (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड)ला ६ जानेवारी रोजी ७६ वर्षे पूर्ण झाली. स्थापनेच्या वेळेस भारतातील ब्रिटिश राजवट संपत आल्याची चाहूल लागली होती. देशाला औद्योगिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी राष्ट्रीय मानके तयार करण्याचे मोठे कार्य समोर होते. त्यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीयर्स (इंडिया) ही संस्था कार्यरत होती. तिने संस्थेच्या घटनेचा पहिला मसुदा तयार केला. उद्योग आणि पुरवठा विभागाने ३ सप्टेंबर १९४६ रोजी ‘भारतीय मानक संस्था’ या संस्थेच्या स्थापनेची औपचारिक घोषणा केली आणि ६ जानेवारी १९४७ रोजी भारतीय मानक संस्था (ISI) अस्तित्वात आली.

सुरुवातीच्या वर्षांत, संस्थेने मानकीकरणावर लक्ष केंद्रित केले. सामान्य ग्राहकांना मिळणारे मानकीकरणाचे फायदे डोळ्यांसमोर ठेवून भारतीय मानक संस्थेने मानकीकरण योजना योजनेची सुरुवात केली. ISI द्वारे १९५५-५६ मध्ये औपचारिकपणे सुरू केलेली ही योजना हळूहळू सक्षम होत गेली. भारतीय मानकांच्या आनुषंगाने वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उत्पादकांना, त्यांच्या उत्पादनांवर ISI मार्क लागू करण्यासाठी परवाने देण्यास सुरुवात झाली. १९६३ मध्ये प्रमाणीकरण योजनेच्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. भारतीय मानक संस्था (प्रमाणन गुण) अधिनियम, १९५२ अंतर्गत उत्पादनाचे प्रमाणीकरण कार्यान्वित होत असताना, मानके तयार करणे आणि इतर संबंधित काम करण्यासाठी कोणताही कायदा अस्तित्वात नव्हता. त्या दृष्टीने २६ नोव्हेंबर १९८६ च्या संसदेत विधेयक मांडण्यात आले. २६ नोव्हेंबर १९८६ ला ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) कायद्याद्वारे अस्तित्वात आली.
वस्तू, सेवा यांना त्रयस्थाकडून दर्जा आणि सुरक्षितता याबद्दल मिळणारी सरकारी हमी म्हणजेच ISI किंवा ISO हे मानांकन. पर्यावरण स्नेही उत्पादनांकरिता इको मानक किंवा सोन्याच्या शुद्धतेची हमी देणारे हॉलमार्क, अशी सर्व मानके बीआयएस देत आली आहे. IS एक हे मानक आपल्या भारतीय झेंडा-तिरंगा याला आहे. तिरंग्याच्या लांबी-रुंदीचे प्रमाण, रंगांच्या छटा, वापरण्यात येणारे कापड (खादी) इ. गोष्टी त्यात प्रमाणित केलेल्या असतात. IS २ मानक आकड्यांचे सुलभीकरण किंवा (round off) साठी देण्यात आलेले आहे. प्रमाणीकरणाची सुरुवात इंजिनीयर मंडळींकडून झाल्याने त्यांना या गोष्टीची नितांत आवश्यकता होती. भारतीय मानके विकसित करणे, प्रकाशित करणे ही कामे बीआयएस करते. त्यासाठी योग्य मूल्यमापन योजना लागू करते. योग्य मूल्यमापनासाठी प्रयोगशाळा चालविणे किंवा सक्षम, खासगी प्रयोगशाळांची क्षमता जोखून त्यांना मान्यता देणे, हॉलमार्किंगची अंमलबजावणी करणे, ग्राहक सक्षमीकरण करणे ही देखील कामे त्यांच्याकडून केली जातात. तसेच ISO आणि IEC (इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन) यामध्ये बीआयएस भारताचे प्रतिनिधित्व करते.

ग्राहकांना उपयोगी पडेल, असे एक ॲप बीआयएसने विकसित केले आहे. एखाद्या वस्तूच्या दर्जाच्या किंवा सुरक्षिततेबद्दल हमीची माहिती हवी असल्यास बीआयएसच्या या ॲपवर तपासून बघता येते. हे ॲप २७ जुलै २०२० पासून उपलब्ध करण्यात आले आहे. त्या ॲपचे नाव ‘बीआयएस केअर.’ हे ॲप डाऊनलोड करून घ्या. ISI चिन्हाच्या वर भारतीय मानक नंबर अथवा इंडियन स्टँडर्ड लिहिलेले असते आणि खालच्या बाजूला उत्पादकाचा CM/L नंबर किंवा लायसेन्स नंबर लिहिलेला असतो. समजा आपल्याला ISI चिन्ह तपासून पाहायचे असेल, तर आयएसआय चिन्हावर टिचकी मारा. त्यावर ISI नंबर आणि CM/L नंबर टाका. तुम्हाला हव्या असलेल्या वस्तूची सर्व माहिती तिथे ताडून बघता येईल. सत्यता पडताळून मगच ग्राहकांनी खरेदी करावी.

भारतीय मानकांनुसार इलेक्ट्रॉनिक उपकरणांना स्वयं-घोषणेवर आधारित नोंदणीद्वारे, विशिष्ठ आर-नंबरसह मानक चिन्ह वापरण्यासाठी किंवा लागू करण्यासाठी परवाना उत्पादकांना मंजूर केला जातो. मूल्यांकन किंवा तपासणी केल्यावर अनिवार्य नोंदणी योजनेंतर्गत परवाना मंजूर करणे आणि कार्यवाही करणे अशी कामे केली जातात. इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी उपलब्ध असलेला हा परवाना ‘CSR’ ऊर्फ ‘कंपलसरी रजिस्ट्रेशन स्कीम’ देण्यास सुरुवात झाली आहे. इलेक्रोनिक गेम्स, मोबाइल फोन, लॅपटॉप/टॅबलेट/नोटबुक, मायक्रोवेव्ह ओव्हन, प्रिंटर, स्कॅनर वगैरे उपकरणांना ते दिले जाते. ग्राहकांनी अशा वस्तू खरेदी करताना पडताळणीसाठी याचा उपयोग जरूर करावा. ॲपवर ‘CRS’वर टिचकी मारावी व वस्तूवर लिहिलेला नंबर टाकून स्वतःची खात्री करून घ्यावी.

सोने खरेदीच्या वेळी ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून बीआयएसने हॉलमार्कची सुविधा सुरू केली. पण, त्यासाठी खर्च जास्त होतो म्हणून ग्राहक विना हॉलमार्कच्या दागिन्यांना प्राधान्य देत होते. हॉलमार्क दागिन्यांवर उमटवताना त्यात बीआयएसचा लोगो, सोन्याची शुद्धता आणि HUID (हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन) नंबर कोरला जातो. हा नंबर आपल्या आधार कार्डासारखा प्रत्येक दागिन्यासाठी वेगळा असतो. दोन दागिन्यांना एकच नंबर आहे असे कधीच होऊ शकत नाही.

काही बातमी मिळाल्यास या केंद्रांवर धाड घालते. नुकत्याच टाकलेल्या अशाच एका धाडीमध्ये साक्षीदार म्हणून जाण्याचा योग आला होता. कोणत्याही केंद्रामध्ये सोन्याचा कस (टंच) काढून देण्याला परवानगी असते. हे काम अर्ध्या तासाच्या आत होऊ शकते. पण, त्या दागिन्यावर HUID नंबर लेझरने कोरायचा असेल, तर मात्र ४८ तास लागतात. अशा वेळेस चुकीचा किंवा दुसऱ्याच एखाद्या दागिन्याचा नंबर कोरला जातो. हे लक्षात येण्याचे कारण म्हणजे मी त्या दागिन्यावर (नेकलेस) कोरलेला नंबर BIS care या ॲपवर टाकला असता ॲप मात्र तो दागिना कर्णफुले असल्याचे दाखवत होते. तसेच केंद्राचे नावही जुळत नव्हते. दागिन्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांचे हजारोंनी पैसे लागतात. फसवणूक टाळण्यासाठी या ॲपचा उपयोग नक्कीच फायदेशीर ठरेल.

बीआयएसच्या स्थापनेला ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत. अवघे पाऊणशे वयोमान तरीही नवीन मानके तयार करणे, असलेल्या मानकांत सुधारणा करणे, लॅबोरेटरीची व्यवस्था वाढवणे, बीआयएस केअर ॲप तयार करणे अशा वेगवेगळ्या कामांतून संस्था अधिकाधिक मजबूत होत आहे.

-मंगला गाडगीळ

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -