भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील नागरिकांच्या सततच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी लक्षात ठेवून आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी आज गोल्डन नेस्ट ते शितल नगर, मीरा रोड या परिसराचा पाहणी दौरा केला. शहरातील सर्व नागरिकांच्या समस्यांचे तातडीने निवारण केले जाईल असा विश्वास आयुक्त दिलीप ढोले यांनी व्यक्त केला.
“वॉक विथ कमिशनर” या संकल्पनेतून मीरा भाईंदरचे आयुक्त यांनी गोल्डन नेस्ट, लोढा रोड, पूजा नगर, नया नगर, मिरा रोड स्टेशन रोड, शितल नगर याठिकाणाची पहाणी केली. पाहणीदरम्यान फुटपाथवरील टपऱ्या, अनधिकृत शेड, बेवारस वाहने, फेरीवाले, विजेच्या पोलवर अनधिकृतरीत्या लावण्यात आलेले बॅनर, रस्त्याच्या कडेला तसेच फूटपाथ व दुकानासमोर ठेवण्यात येणाऱ्या कुंड्या यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश अतिक्रमण विभागास दिले. फूटपाथ व रस्त्यांवर काही ठिकाणी गटारांची तुटलेली झाकणे नव्याने बसवणे, रस्त्यापासून ते फूटपाथपर्यंत डांबरीकरण करणे, रस्त्याच्या कडेला व फुटपाथवर पडलेले डेब्रिज उचलणे, रस्त्यावर साफसफाई ठेवणे, फुटपाथवरील अनधिकृत फेरीवाले, टपऱ्या, खाद्यविक्रेते यांच्याकडून अस्वच्छता पसरत असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. रस्त्याच्या दुभाजकांवरील झाडांना नियमित पाणी देणे याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. या दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) रवी पवार, शहर अभियंता दिपक खांबित, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.