Tuesday, March 25, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखविहंगम खेळ तो...

विहंगम खेळ तो…

ऑस्ट्रेलियन ओपन टुर्नामेंटमध्ये मिक्स्ड डब्ल्सच्या अंतिम फेरीतील पराभवानंतर भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने शुक्रवारी ग्रँड स्लॅम स्पर्धेचा निरोप घेतला. आता पुढच्या महिन्यात दुबईमध्ये ती आपल्या कारकिर्दीतील शेवटचा टेनिस सामना खेळणार आहे. जवळपास दोन दशके भारतीय उपखंडातील टेनिस चाहत्यांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सानियाच्या अलविदाने यापुढे काही दिवस तरी चाहत्यांना चुकचुकल्यासारखे होईल. त्यामागील कारण म्हणजे ज्या पद्धतीने सानियाने आपली कारकीर्द बहरत नेली, ज्या लेव्हलला ती खेळत आहे तिथे अन्य भारतीय महिला खेळाडू कोणी नाहीत. शिवाय तिच्या खेळातील नजाकत, यश यांनी सजलेली भरगच्च कारकीर्द डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे.

जागतिक पटलावर सध्या ती ज्या स्थानावर आहे, तिथपर्यंत पोहोचणे भारतच काय पण शेजारील पाकिस्तान, लंका, बांगलादेश, नेपाळ या देशांतील खेळाडूंनाही जमले नाही. यापुढेही तरी जमेल याची शक्यता फारच कमी आहे. ती भारतीय खेळाडू जरी असली, तरी या पाच-सहा देशांचे जणू काही अप्रत्यक्ष प्रतिनिधित्वच करत आहे. त्यामुळे एकमेव अशी महिला टेनिसपटू सानियाला यापुढे खेळताना न पाहणे हे चाहत्यांकरिता सुरुवातीचे काही दिवस तरी अवघडल्यासारखे होईल. आशिया म्हणजे क्रिकेटवेडा खंड म्हणून ओळखला जातो. त्यात भारत म्हणजे क्रिकेटचे माहेरघर. क्रिकेट ही येथील लोकांची चौथी गरज. त्याला अन्य खेळ पर्याय असूच शकत नाही. असला तरी तो जेवणातल्या लोणच्यासारखा. अशा कठोर क्रिकेटवेड्या देशात जन्मलेल्या सानियासारख्या मुलीला टेनिसपटू म्हणून मोठे होणे हे स्वप्नापेक्षा कमी नव्हते. तशी ‘चूल आणि मूल’ ही येथील महिलांबाबत असलेली संकल्पना केव्हाच मागे सरली होती.

पण क्रिकेटचे भूत मात्र येथील लोकांच्या मानगुटीवरून उतरले नव्हते आणि उतरणारही नाही. अशा आव्हानांचा सामना करत सानियाचे बालपण गेले. वडील क्रीडा पत्रकार आणि घरात क्रीडा पार्श्वभूमी होती. तशी घरची परिस्थिती ठिकठाकच होती. त्यामुळे तिचे टेनिसकडे वळणे हे स्वाभाविकच होते. घरातील या पूर्वासुरीच्या मर्यादित छायेत न रमता तिने लाँग जंप घेतली. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षापासून ती टेनिस कोर्टवर तरतरायला लागली. तिच्या खेळातील नजाकती, वावर, सावधपणा, हालचाली, प्रतिकार, हल्ला अशा सर्वच आघाड्यांवर तिने स्वत:ला सिद्ध केले. प्रशिक्षकांनाही तिच्या खेळाची भुरळ पडली आणि फारच कमी कालावधीत तिने आंतरराष्ट्रीय लेव्हलला भारतीय खेळाडू म्हणून दरवाजा ठकठकवला. एकदाचा तो खोलला आणि मग तिने मागे वळून पाहिलेच नाही. आपल्या कारकिर्दीत तिने सहा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. लिअँडर पेस, महेश भूपती, बोपन्ना या पंक्तीत सानियाचे नाव अभिमानाने घेतले जाऊ लागले. पद्मभूषण (२००४), अर्जुन पुरस्कार (२००४), पद्मश्री (२००६) आणि राजीव गांधी खेलरत्न (२०१५) पुरस्कार तिने पटकावले. ती आतापर्यंतची सर्वात यशस्वी भारतीय महिला टेनिसपटू आहे. खेळाबरोबरच ती आपल्या सौंदर्यानेही अनेकदा चर्चेत राहिली. त्या सौंदर्याभोवती तिचा खेळ थबकला नाही.

त्याउपर तिच्या खेळातले सौंदर्य अधिक भावून गेले. ते कमालीचे विहंगम होते. तिचा ‘फोर हँड’ म्हणजे बेमिसाल मानला जातो. ती इतक्या स्ट्राँगली तो टोलवते की प्रतिस्पर्ध्याला दिवसाचेही तारे दिसतात. तो रोखताना समोरील खेळाडूची पंचाईत होते. पुरुष खेळाडूचीही तो रोखताना तारांबळ उडते. तिच्यातला धाडसीपणा मन जिंकून जातो. त्याचे प्रतिबिंब खेळात उमटते. त्याच्यातूनच तिच्यातल्या खेळातली डेअरिंग नरजेत सहज भरते. त्वेश, आवेग अशी आक्रमक विशेषणे तिला अभिमानाने चिकटतात. तिचा खेळ जिंकण्या किंवा हरण्यापर्यंत मर्यादित नाहीच. त्याउलट तिचा भर चेंडू जोरात मारण्यावर असतो. तिच्यातला हा बिनधास्तपणा, वकुबीपणा विजयाला तिच्यासमोर गुडघे टेकायला प्रवृत्त करतो. हीच तिच्यातली विद्वत्ता तिला बाजी मारून देऊ लागली आणि आंतरराष्ट्रीय पटलावर ती स्टार खेळाडू म्हणून मिरवू लागली. कोणत्याही मैदानी खेळामध्ये फिटनेस महत्त्वाचा असतो, तितकाच तो टेनिसमध्येही गरजेचा. मनगटी जोरावर खेळल्या जाणाऱ्या या खेळात फोर आर्म्स, खांद्यातील जोर यांना अधिक महत्त्व, त्यासोबतच शरीराच्या हालचाली विशेष गरजेच्या. फिटनेसच्या या सर्वच आघाड्यांवर सानिया खरी उतरली.

ती मानसिकदृष्ट्या प्रचंड स्ट्राँग, हे स्ट्राँगपण तिच्या खेळातही झळकू लागले. ज्या काळात सानियाने चमकदार कामगिरी करायला सुरुवात केली, तेव्हा जगात प्रसिद्धीझोतात असलेला टेनिस खेळ क्रिकेटवेड्या भारतात मात्र दुर्लक्षित म्हणण्यासारखा होता. देशातील चाहत्यांना टेनिसकडे वळविणारी महिला खेळाडू म्हणूनही सानियाकडे पाहिले जाते. अलीकडच्या काही वर्षांत भारतात टेनिसने मनोरंजन झाले असे म्हणण्यापेक्षा देशाला टेनिस जगतात महिला खेळाडू म्हणून सानियाने मोठे केले. देशातील घराघरांत तिने टेनिस खेळ पोहोचवला. अनेकांना टीव्हीसमोर बसण्यास प्रवृत्त केले. सौंदर्याची चमक तिच्या खेळातही विलसत होती. ती कोर्टावर वावरायची. पॉइंट मिळवल्यावर तिचे हातवारे, रिअॅक्शन प्रेक्षकांना आपलेसे करून जाते. भारतीय संस्कृतीवर धर्माचा पगडा पूर्वापार चालत आलेला आहे. आपण कितीही सुशिक्षित असलो, तरी तो अधूनमधून डोकावतच असतो. ठरावीक धर्माच्या मुलींनी घराबाहेर पडू नये, त्यांनी धार्मिक पोषखातच वावरायला हवे असा अघोषित नियमच. पण त्यालाही भेदून, अनेकांची टीका झेलून सानियाने कमी कपड्यातल्या टेनिसमध्ये विलक्षण खेळ करत आपल्या खेळानेच चोख उत्तर दिले. त्यामुळे सानियातल्या सौंदर्याबरोबरच तिच्या खेळातले, बिनधास्तपणातले, टेनिस विद्वत्तेतले सौंदर्यच अधिकच विहंगम आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -