केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची एनडीएच्या बैठकीत मागणी
नवी दिल्ली : अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी पदोन्नती मध्ये आरक्षण लागू करण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा तसेच दलित आदिवासी विद्यार्थ्यांना महागाई निर्देशांकानुसार दर ५ वर्षांनी शिष्यवृत्ती रक्कमेत वाढ करावी, अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीत आठवले यांनी ही मागणी केली. यावेळी अध्यक्षस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.
आगामी २०२४च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत एनडीएला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात प्रचंड बहुमताने विजय प्राप्त होईल असा विश्वास रामदास आठवले यांनी बैठकीत बोलताना व्यक्त केला.
यावेळी ओबीसी आरक्षणामध्ये वर्गवारी करण्याच्या विषयाकडे आठवले यांनी एनडीएच्या घटक पक्षांचे लक्ष वेधले.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व राज्य सरकारने पदोन्नती मध्ये आरक्षण देणारा कायदा करणे आवश्यक होते. मात्र अनेक राज्यांत तसा कायदा झालेला नाही. त्यामुळे संविधानाच्या तत्वानुसार केंद्र सरकारने लवकरच दलित आदिवासी मागासवर्गीयांना नोकरीत पदोन्नती मधील आरक्षण देणारा कायदा करावा, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.