Sunday, July 14, 2024
Homeअध्यात्मनामात दृढभाव कसा येईल?

नामात दृढभाव कसा येईल?

नामात प्रेम नामानेच येणार. हे प्रेम यायला विषयावरचे प्रेम कमी करायला पाहिजे. दृढनिष्ठा पाहिजे. नामच तारील, नामaच सर्व काही करील, असा दृढभाव पाहिजे. तो ठेवून व्यवहारातले प्रयत्न चालू ठेवावेत, पण यश देणारा परमात्मा असा भाव पाहिजे. वैद्याकडचे औषध आपण गड्याकडून आणवतो, पण गुण गड्याने दिला असे नाही म्हणत. याच्याही पुढे जाऊन, वैद्याच्या औषधाने आलेला गुण परमात्म्यानेच दिला, असे का मानत नाही? परमात्म्याला शरण जाणे म्हणजे परमात्मा आपला आहे, त्याच्यावाचून आपल्याला दुसरे कुणी नाही, आपण काही करीत नसून सर्व तोच आपल्या हिताकरिता करतो आहे, असा दृढ विश्वास ठेवणे. आपण आपल्या बायकोमुलांवर प्रेम करतो, कारण त्यांना ‘आपले’ म्हटले म्हणून. म्हणजे प्रेम हे आपलेपणात आहे, मग परमात्म्याला आपले म्हटले म्हणजे सहजच त्याच्यावर प्रेम बसणार नाही का? दुसरे असे की, भगवंत हा आपला जिवलग सखा आहे, तो सर्व काही आपल्या हिताकरिताच करतो आहे, असा विश्वास धरल्यावर काळजीला तरी जागा कुठे उरली? आपली देहबुद्धी नाहीशी होण्यातच आपले हित आहे. परमात्म्याच्या ठिकाणी आपलेपणा उत्पन्न व्हायला त्याच्या नामाशी पुष्कळ सहवास पाहिजे. सिद्धीच्या, चमत्काराच्या पाठीस लागू नये; ती आपल्या मार्गात विघ्ने आहेत. उलट, त्यांनी आपल्या पाठीस लागले पाहिजे. एखाद्याला साप चावत नाही, पण त्यात विशेष ते काय आहे ? सापात काय किंवा कशातही काय, भगवद्भाव, आपलेपणा पाहता यावा, म्हणजे कोणीही आपले शत्रू होणार नाहीत. आई आपल्याजवळ आहे या भावनेने मूल जसे निर्भय असते, तसे भगवंत आपल्यापाशी आहे या भावनेने आपण निर्धास्त व्हावे. आपल्याला ज्या गावाला जायचे आहे, त्या गावाची गाडी आली की नाही एवढे पाहावे; गाडीत कोण भेटतो याला फारसे महत्त्व नाही. समजा, गाडीत आपल्याला कोणीच भेटले नाही, तर आपण स्वस्थ झोप घेत आपल्या गावी जातो, त्याप्रमाणे आपण आपले साधन करावे. सृष्टीची तत्त्वे किती आहेत वगैरेच्या भानगडीत पडू नये, त्याचा निकाल कधीच लागायचा नाही. शंका गेल्याशिवाय नाम स्थिरच होत नाही हे लक्षात ठेवावे. देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचे महत्त्व कळणार नाही. आपला उद्धार व्हावा, असे वाटत असेल तर नामस्मरण सोडू नये. परमात्मा जसा निरूपाधिक आहे, तसे नामही निरूपाधिक आहे.

– ब्रह्मचैतन्य श्री गाेंदवलेकर महाराज

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -