Friday, May 9, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

ज्येष्ठांना मोफत देवदर्शन घडवणार!

ज्येष्ठांना मोफत देवदर्शन घडवणार!

मुख्यमंत्री शिंदेंचा मेगा प्लॅन?


राज्यातला मोठा मतदार वर्ग आपल्याकडे आकर्षून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता एक नवा प्लॅन आखल्याची चर्चा आहे. एसटी महामंडळाच्या मदतीने ज्येष्ठांसाठी मोफत देवदर्शन सुविधा देण्याचे नियोजन सध्या सुरू आहे.


राज्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या एक कोटींच्या आसपास आहे. या ज्येष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन घडवून आणण्याचा विचार सध्या शिंदे सरकारचा सुरू आहे. प्रत्येक शनिवार-रविवारी ही सुविधा देण्यात येणार आहे. यामध्ये पंढरपूर-तुळजापूर-अक्कलकोट, अष्टविनायक दर्शन, शिर्डी, शेगाव, कोल्हापूर - जोतिबा दर्शन या स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी असणाऱ्या धर्मशाळा, यात्रीनिवास येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव खोल्या देखील ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.


यासाठी एसटी महामंडळानेही मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. महामंडळाकडून दोन हजार एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थस्थळांना जाण्यासाठी ही सेवा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिले आहेत. ही सेवा देताना केवळ संबंधित व्यक्तींना आपल्या राहण्याचा आणि जेवणाचा खर्च करावा लागणार आहे.


सध्या राज्यात ६५ वर्षावरील नागरीकांना ५० टक्के तिकीट तर ७५ वर्षांवरील नागरीकांना मोफत प्रवास जाहीर करण्यात आला आहे.

Comments
Add Comment