Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

जग आर्थिक संकटात पण मोदींच्या काळात भारताचा वेगाने विकास

जग आर्थिक संकटात पण मोदींच्या काळात भारताचा वेगाने विकास

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी वाचला भारताच्या विकासाचा पाढा

चंद्रपूर : संपूर्ण जग संकटाच्या काळात असताना, प्रत्येक देशावर आघात होत असताना भारतीय नागरिकांनी स्वत:ला भाग्यवान मानले पाहिजे, कारण या देशाचे नेतृत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले. भारतासारख्या १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतिकूल परिस्थितीमध्येही पुढे घेऊन जात आहेत. मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारताने स्टील उत्पादन, मोबाईल निर्मिती, फार्मास्युटिकल, केमिकल अशा सर्वच क्षेत्रांमध्ये चौफेर प्रगती केली आहे. मोदीजींच्या याच धोरणांमुळे जग आज भारताकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहत आहे, असे जे. पी. नड्डा यांनी सांगितले. ते सोमवारी चंद्रपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी आखलेल्या भाजपच्या मिशन १४४ आणि मिशन २५ या मोहिमांचा जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. याप्रसंगी जे. पी. नड्डा यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात झालेल्या भारताच्या विकासाचा पाढा वाचला.

ज्या ब्रिटनने आपल्यावर २०० वर्षे राज्य केले, मंदीच्या काळात त्याच ब्रिटनला मागे टाकून भारत आजघडीला जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाला आहे. सद्यस्थितीत अमेरिका, रशिया हे देश महागाईचा सामना करत आहेत. मात्र, भारत महागाई आटोक्यात आणून अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया रचत आहे. आजघडीला भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्टील उत्पादक देश झाला आहे. २०१४ पर्यंत भारतामध्ये ५२ टक्के मोबाईल फोन बाहेर यायचे. मात्र, आज ९७ टक्के मोबाईल फोनची निर्मिती देशात होत आहे. जगातील अनेक अर्थव्यवस्था कोलमडत असताना मोदीजींमुळे आपली अर्थव्यवस्था मजबूतपणे पुढे वाटचाल करत आहे, असे जे. पी. नड्डा यांनी म्हटले.

अमेरिकेत अजूनही लसीकरण पूर्ण झालेले नाही. मात्र, भारतात २२० कोटी लसीचे डोस दिले गेले. काँग्रेसचे नेते अशिक्षित आहेत. त्यांच्यामुळे देशात टीबी आणि पोलिओसारख्या आजारांच्या लसी येण्यासाठी अनेक वर्षे गेली. मात्र, कोरोनाची साथ पसरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टास्क फोर्स स्थापन करून अवघ्या ९ महिन्यात कोरोनाच्या दोन लसी आणल्या. पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांमुळे देशातील अतिगरिबी एका टक्क्यापेक्षाही कमी झाली. गरीब कल्याण योजनेतंर्गत वाटप करण्यात येणाऱ्या मोफत धान्यामुळे हे शक्य झाले. या सगळ्यामुळे भारताकडे जगातील इतर देश वेगळ्यादृष्टीने पाहू लागले आहेत, असे जे. पी. नड्डा यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >