नागपूर : सीमाप्रश्नावरून नागपूर हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस आज वादळी ठरला. कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना आज कर्नाटकात जाण्यापासून कर्नाटक पोलिसांनी रोखले आहे. त्याचे जोरदार पडसाद आज सभागृहात उमटले.
विधान भवनाच्या पायऱ्यावर विरोधकांनी पन्नास खोके-एकदम ओके, अशी घोषणाबाजी करत सरकारला पुन्हा कोंडीत पकडण्यासाठी निदर्शने केली.
दरम्यान, बेळगावमध्ये मराठी नेत्यांना अटक करणे अयोग्य आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात जाऊ दिले पाहिजे, असे म्हणत सीमावादावर सरकार पाठिशी असल्याचे आश्वासन दिले. शोकप्रस्तावानंतर अधिवेशनाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलावे. त्यांनी सीमावर्ती भागात ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडायला लावावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली. याप्रकरणी लक्ष घालून त्यांना तातडीने सोडायला लावू, असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात अजित पवारांना प्रत्युत्तर दिले. एकनाथ शिंदे म्हणाले, सीमाप्रश्न हा महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कृपया यावरून राजकारण करू नये. राजकारण करण्यासाठी अनेक विषय आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत सीमावादावर आमची जी बैठक झाली, त्यात अमित शहांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना महाराष्ट्राविरोधात भूमिका न घेण्याची समज दिली होती. देशात प्रथमच प्रसारमाध्यमांसमोर गृहमंत्री अमित शहांनी अशी भूमिका घेतली, याचे खरे तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्वागत केले पाहीजे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केला की, मविआ सरकारनेच सीमाभागातील गावांचा विकासनिधी रोखून धरला होता. त्यांच्या विकासनिधीला स्थगिती दिली होती. आम्ही सत्तेत येताच सीमाभागातील विकासनिधीला मंजुरी दिली आहे. तसेच, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेले महाराष्ट्रविरोधी ट्विट कोणी केले, ते ट्विट करणारी व्यक्ति कोणत्या पक्षाची होती, हे लवकरच सभागृहात सांगू, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.