Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीराजकीय

Sushma Andhare : सुषमा अंधारेंची पक्षातून हकालपट्टीची वारकऱ्यांची मागणी

Sushma Andhare : सुषमा अंधारेंची पक्षातून हकालपट्टीची वारकऱ्यांची मागणी

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी हिंदू देवीदेवतांबद्दल केलेल्या विधानामुळे अडचणीत सापडल्या आहेत. सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


राज्यात शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे-ठाकरे असे २ गट निर्माण झाले. या परिस्थितीत सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. विरोधकांवर थेट आक्रमक हल्ला करणाऱ्या सुषमा अंधारे अत्यंत कमी काळात शिवसेना ठाकरे गटाच्या तोफ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मात्र सुषमा अंधारेंनी केलेल्या विधानांमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अंधारे यांच्या विधानामुळे विश्व वारकरी सेनेने त्यांच्याविरोधात शपथ घेतली आहे.


विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी पश्चिम बंगालच्या गंगासागर समुद्र किनाऱ्यावर शपथ घेत सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. मी आजपासून शपथ घेतो की, ज्या पक्षामध्ये सुषमा अंधारे राहतील त्या पक्षाला मतदान करणार नाही अशा प्रकाराचा शेटे यांचा व्हिडिओ समोर आला आहे. येत्या काळात महाराष्ट्रात अनेक वारकरी अशाप्रकारे शपथ घेतील, असे शेटे यांनी सांगितले. त्यामुळे सुषमा अंधारे यांच्या विधानांमुळे ठाकरे गटाची गोची निर्माण झाली आहे.



आळंदीत वारकऱ्यांनी काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा


सुषमा अंधारे यांनी भाषणात जे विधान केले त्यामुळे वारकऱ्यांची भावना दुखावली आहे. आळंदी येथे वारकऱ्यांनी सुषमा अंधारे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून त्यांना चपलेचा हार घातला. आळंदीचे युवा किर्तनकार महेश मडके पाटील यांच्या नेतृत्त्वात झालेल्या आंदोलनात वारकऱ्यांकडून अंधारे यांना उत्तर देण्यात आले. संतांबाबत बोलण्याआधी अभ्यास करा, असा सल्ला वारकऱ्यांनी सुषमा अंधारेंना दिला.


महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष दामुअण्णा महाराज शिंगणे यांनी सुषमा अंधारे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियात सुषमा अंधारे यांचा हिंदू देवी-देवता आणि साधुसंतांबद्दल वादग्रस्त विधानांची व्हिडिओ क्लीप व्हायरल होतेय. त्यामुळे वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. प्रभू राम, श्रीकृष्ण, संत ज्ञानदेव यांच्यावर अंधारे यांनी अवमानाजनक वक्तव्य केली आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

Comments
Add Comment