राष्ट्र सेविका समितिच्या पहिल्या प्रमुख संचालिका आणि संस्थापिका वंदनीय मावशी केळकर यांचा देशभर सर्वत्र कामानिमित्त प्रवास होत असे. त्यांच्या मनात १९५३ च्या सुमारास प्रवासात महिलांना भेटल्यानंतर अशी एक कल्पना आली की, महिलांना गृहशास्त्र शिक्षण देण्याची गरज आहे. त्यांच्या लक्षात आलं की, आता मुली हळूहळू नोकरी करू लागल्या आहेत. विभक्त कुटुंब पद्धती, शहरी वास्तव्य निर्माण होत आहे. अशा वेळी त्यांना गृह काम, वृद्धांची सेवा, नवीन संसारात जबाबदाऱ्या पेलताना अनेक समस्या येत आहेत. बालसंगोपन, आजारी माणसांची सेवा-शुश्रूषा, पथ्य-पाणी, पाहुण्याचे स्वागत याच नेमके आणि योग्य ज्ञान मिळावे असे वाटून त्या दृष्टीने काही करता येईल काय? अशी चर्चा मावशी केळकर व मा. बकुळताई देवकुळे यांच्यात झाली आणि त्या अानुषंगाने अभ्यासक्रमाची आखणी करून गृहिणी विद्यालयाची ही मूळ योजना लक्ष्मीबाई केळकरांनी शिक्षण तज्ज्ञांसमोर मांडली. त्याच सुमारास १९५३ साली याच विचारातून स्त्री शिक्षणाचे महत्त्व जाणणारे आणि त्यासाठी आयुष्य वेचलेले महर्षी धोंडो केशव कर्वे आणि अनेक शिक्षण तज्ज्ञांची एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेला तीन हजारांहून अधिक महिला उपस्थित होत्या आणि तिथे असा निर्णय घेण्यात आला की, गृहशास्त्राचा एक अभ्यासक्रम तयार करायचा आणि त्याचे प्रशिक्षण देऊन महिलांना आत्मनिर्भर बनवायचं. आता सध्या एसएनडीटी विद्यापीठात जे गृहशास्त्र म्हणजे होम सायन्स शिक्षण दिलं जाते, त्याची ती सुरुवात होती, असं म्हणता येईल.
सुरुवातीच्या काळात उन्हाळी वर्ग तात्पुरत्या स्वरूपाचे घेतले गेले. पण नंतर नुसते वर्ग घेऊन उपयोग होणार नाही, तर त्याचं रितसर प्रशिक्षण दिलं गेलं, तर त्याचा घरगुती व व्यावसायिक उपयोग होऊ शकेल म्हणून अनेक शिक्षणातज्ज्ञांनी एकत्र येऊन एक अभ्यासक्रम तयार केला आणि मग त्यातून तीन वर्षांचा एक रीतसर डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात आला. सुरुवातीला दादर-माहीम भागामध्ये तीन फ्लॅट विकत घेऊन तिथे हे प्रशिक्षण वर्ग सुरू झाले.
‘भारतीय स्त्री जीवन विकास परिषद’ या संघटनेअंतर्गत गृहिणी विद्यालय अशा रितीने सुरू झाले. परिषदेचा एक उपक्रम म्हणून गृहिणी विद्यालय सुरू होते. मावशींच्या प्रेरणेने बकुळ ताई देवकुळे यांनी खूप मेहनत घेऊन याची स्थापना केली होती; परंतु निवासी इमारतीमध्ये फ्लॅट स्वरूपात असल्यामुळे तिथे तक्रारी येऊ लागल्या. त्यामुळे स्वतःची अशी एखादी वास्तू असावी असं प्रकर्षाने जाणवू लागलं. त्यामुळे ठाण्यात कोपरी भागामध्ये प्लॉट अल्प दरात विकत घेऊन त्या ठिकाणी २ संस्था सुरू झाल्या. त्यापैकी एक ‘भारतीय स्त्री जीवन विकास परिषद.’ त्याच दरम्यान केंद्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाची एक योजना आली होती. महिलांसाठी वसतिगृह सुरू करणाऱ्या संस्थांना ७५ टक्के अनुदान मिळणार होते. त्या अनुदानाचा लाभ घेऊन पहिला मजला बांधण्यात आला आणि नंतर दानशूर व्यक्तींकडून मिळालेल्या दान, वर्गणी गोळा करून आणखी दुसरा मजला बांधण्यात आला. ठाण्याच्या इमारत उभारणीत न्यू इंग्लिश स्कूलच्या तत्कालीन मुख्याध्यापिका लीला ताई पातकर यांचे योगदान विसरता येणार नाही. तसेच आर्किटेक्ट मुकुंद नातू यांनीही खूप सहकार्य केलं. तेव्हापासून कोपरीच्या या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर वसतिगृह सुरू आहे. सध्या तिथे ४० कामकाजी तसेच शिक्षण घेणाऱ्या महिलांना निवास आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था अत्यंत माफक दरात केली जाते. त्यावेळी ठाण्यात एकच कर्णबधिर मुलांसाठी शाळा होती आणि ठाण्यामध्ये औद्योगिक विकास खूप होत असल्यामुळे कामगार वर्गाची लोकसंख्याही वाढू लागली होती. त्यामुळे समाजाची ही गरज लक्षात घेऊन १९९० सालापासून कर्णबधिर मुलांची शाळा दुसऱ्या मजल्यावर सुरू करण्यात आली. आधी शाळेला अनुदान मिळत नव्हतं. त्यामुळे स्वखर्चातूनच ही शाळा सुरू होती. २००२ सालापासून मात्र सरकारकडून शाळेला अनुदान मिळू लागलं. सध्या ५७ मुलं या शाळेमध्ये शिकत आहेत. इथे पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण दिलं जातं. त्याशिवाय नियमित योग वर्ग चालतात. त्याचा लाभ अनेक महिलांना होत आहे. त्याशिवाय ठाणे जिल्ह्यात आदिवासी बहुलक्षेत्र सुद्धा आहे. तिथल्या आघाई आणि पिवळी या गावांमधील कुपोषित बालक आणि मातांना सकस अन्न, औषध, शतावरी कल्प, आरोग्य सेवा देण्याचे काम नियमितपणे केले जाते. परिषदेत सुरुवातीला वामनराव वर्दे त्यांच्यानंतर मालतीबाई दांडेकर बरीच वर्षे अध्यक्ष होत्या. मालतीबाई जवळ जवळ २३/२४ वर्षे अध्यक्ष होत्या आणि जवळजवळ ४० वर्षे त्यांनी बकुळताईंना साथ दिली. राष्ट्रसेविका समितीच नेहमीच एक धोरण असतं की, आपण ज्या ठिकाणी कार्य करतो, त्या ठिकाणी देवाचं काहीतरी अधिष्ठान असावं. त्यामुळे संस्थेच्या परिसरामध्ये रामाच एक छोटे मंदिरही उभारण्यात आलं आहे. २००२ या सुवर्णमहोत्सवी वर्षापासून आणखी एक महत्त्वाचे व आवश्यक पाऊल भारतीय स्त्री जीवन विकास परिषदेने टाकले आहे. ते म्हणजे गौरव समारंभाचे आयोजन. प्रसिद्धी पराड्मुख वृत्तीने काम करणाऱ्या प्रचारिका आणि तशाच मुशीतून तयार झालेल्या सेवावृत्तीने काम करणाऱ्या समाजसेविकांचे कार्य लोकांसमोर यावे, म्हणून त्यांचा सन्मान केला जातो.
राष्ट्रसेविका समितीच्या प्रथम प्रमुख संचालिका वंदनीय मावशी केळकर आणि दुसऱ्या प्रमुख संचालिका ताई आपटे यांच्या नावाने हे पुरस्कार दिले जातात. पहिला पुरस्कार ज्येष्ठ अशा प्रचारिकेला केला दिला जातो, तर दुसरा पुरस्कार सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलेला दिला जातो. अगदी दहा हजार रुपयांपासून सुरू झालेल्या हा पुरस्कार आता पस्तीस हजार रुपये इतका झाला आहे. संस्थेच्या संस्थापिका बकुळ ताई देवकुळे या २०१० सालापर्यंत संस्थेमध्ये कार्यरत होत्या. त्यानंतर वृद्धापकाळमुळे त्यांनी प्रत्यक्ष काम बंद केलं असलं तरी त्या नेहमीच प्रोत्साहन आणि सहकार्य देत असत. २०१४ पासून त्यांच्या नावाने सामाजिक संस्थेला निधी स्वरूपात मदत करण्याची योजनाही सुरू केली आहे. २०१० साली बकुळ ताई देवकुळे यांनी काम सोडल्यानंतर डॉक्टर विद्या नानल या आतापर्यंत संस्थेच्या अध्यक्ष होत्या. वृद्धापकाळामुळे त्यांनीही कार्य सोडल्यानंतर सध्या पद्मजा काळे संस्थेच्या अध्यक्ष आहेत, तर उज्ज्वला केतकर कार्यवाह आहेत आणि मानसी सहस्त्रबुद्धे कोषाध्यक्ष आहे. भारतीय स्त्री जीवन विकास परिषदेची इमारत बांधताना बकुळताई देवकुळे यांना त्या काळात खूप त्रास सहन करावा लागला होता. त्या काळात नेमकं सिमेंट घोटाळा प्रकरण आलं आणि त्यामुळे बांधकामांमध्ये खूप अडचणी आल्या होत्या. त्यामुळे अशा सामाजिक कार्य करण्यासाठी पुढे आलेल्या संस्थांना मदतीचा हात द्यायला पाहिजे, असं त्यांचं नेहमी म्हणणं असायचं. म्हणून त्यांच्या नावे ५० हजार रुपयांचा सन्मान निधी अशा एखाद्या संघटनेला दर वर्षी देण्यात येतो.
ठाण्यातील इमारतीमध्ये प्रत्यक्ष काम १९८८ मध्ये सुरू झाले. १९८८ साली वसतीगृह आणि १९९० साली कर्णबधिरांची शाळा सुरू झाली. त्यानंतर गृहिणी विद्यालयाचे स्वतंत्र व्यवस्थापन करून रजिस्ट्रेशन करण्यात आल. अर्थात आजही सर्व कामात राष्ट्र सेविका समिति, भारतीय स्त्री जीवन विकास परिषद आणि गृहिणी विद्यालय एकमेकांना मदत करून एकमेकांच्या सहकार्याने करत असतातच. संस्थेच्या कामामध्ये रस घेणाऱ्या, निरलस भावनेनं काम करणाऱ्या महिलांना सदस्य केले जाते. अशा ५० महिला सदस्य संस्थेमध्ये आहेत. भारतीय स्त्री जीवन विकास परिषदेने त्यांच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सूर्यनमस्कारांचा प्रकल्प राबवला होता. ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधून शिक्षणाधिकाऱ्यांना सूर्यनमस्काराचे महत्त्व पटवून दिले. परिषदेच्या कार्यकर्त्या पालिकेच्या विविध शाळांमध्ये सूर्यनमस्कार शिकवण्यासाठी जात होत्या. त्या वर्षी योगाचार्य व्यवहारे गुरुजी यांच्या उपस्थितीत ८०० मुलांनी सूर्यनमस्कार घातले होते. कोरोना काळात तीन वर्ष संस्थेला खूप अडचणींचा सामना करावा लागला परंतु आता पुन्हा जोमानं काम सुरू झालं असून, इतकी सुरक्षित, विश्वासार्ह, स्वच्छ निवास आणि भोजनाची व्यवस्था उपलब्ध होत असल्यामुळे कोरोनानंतर महिलांची वेटिंग लिस्टही सुरू झाली आहे. अशा तऱ्हेने कालानुरूप आपल्या सेवा कार्य योजनांमध्ये बदल करून समाजातील महिलांचे प्रश्न पाहून ते सोडवण्याचा प्रयत्न संस्थेकडून सातत्यानं होत असतात.
-शिबानी जोशी
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…