Friday, June 20, 2025

Second Test match : इंग्लंडचा पाकिस्तानवर मालिका विजय

Second Test match : इंग्लंडचा पाकिस्तानवर मालिका विजय

मुल्तान (वृत्तसंस्था) : दुसऱ्या कसोटी सामन्याच्या (Second Test match) दुसऱ्या डावात मार्क वुडने जबरदस्त गोलंदाजी करत यजमान पाकिस्तानच्या फलंदाजांना जेरीस आणले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी पाकला एकामागून एक धक्के दिले दुसरा कसोटी सामना २६ धावांनी जिंकला. विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी खिशात घातली.


मुल्तान कसोटी सामन्यात पाकिस्तान मजबूत स्थितीत दिसत होता. परंतु, या सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले आणि काही वेळातच सामना जिंकला. इंग्लंडने दिलेल्या ३५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ३२८ धावांवर सर्वबाद झाला.


पहिल्या डावात ७९ धावांची आघाडी मिळविल्यानंतर इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात २७५ धावांवर गारद झाला. कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानला ३५५ धावांचे लक्ष्य मिळाले. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण करताना इमाम-उल-हक जखमी झाल्याने मोहम्मद रिझवान आणि अब्दुल्ला शफीक यांनी पाकिस्तानसाठी डावाची सुरुवात केली. रिझवान आणि शफीक यांनी पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. पण पाकिस्तानचा संघ ६६ धावांवर असताना मोहम्मद रिझवान बाद झाला. यानंतर काही वेळातच कर्णधार बाबर आझमची विकेट गेली. बाबरला एकच धाव करता आली. शफिकच्या रुपात (४५ धावा) पाकिस्तानच्या संघाने तिसरी विकेट गमावली.


अवघ्या ८३ धावांत तीन विकेट गमावल्याने पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला. यानंतर जखमी इमाम-उल-हक आणि सौद शकील यांनी चौथ्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी केली. मात्र, इमाम ६० धावांवर बाद झाला. चौथ्या दिवशी सौद आणि फहीम अश्रफ फलंदाजीला आले. दोघांनी पहिला अर्धा तास विकेट पडू दिली नाही. मात्र, जो रूटने फहीमला (१० धावा) बाद करून सामना इंग्लंडच्या बाजूने झुकवला.


सौद आणि अष्टपैलू मोहम्मद नवाज यांच्यात ८० धावांची भागीदारी झाली. पाकिस्तानने पाच विकेट्स गमावून २९० धावा केल्या. तेव्हा पाकिस्तानचा संघ हा सामना जिंकेल असे वाटत होते. पण इंग्लंडने जबरदस्त गोलंदाजी करत पाकिस्तानच्या संघाला ३२८ धावांवर सर्वबाद केले. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात मार्क वूडने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर, जेम्स अँडरसन आणि ओली रॉबिन्सन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. याशिवाय, जॅक लीच आणि जो रूट यांच्या खात्यात प्रत्येकी एक-एक विकेट जमा झाली.

Comments
Add Comment