(Exclusive interview)
जगभरात सध्या ज्याची चर्चा होते, त्यापासून सुरुवात करूयात. तुमच्या त्या उद्योग प्रवासाबद्दल ज्यामध्ये दिवसाला मिलियन-बिलियन डॉलरची वाढ म्हणजे नित्याची बाब झाली आहे.
गौतम अदानी : एका अर्थाने पाहिले तर ही सारी निव्वळ आकडेवारी आहे आणि त्यात अडकणे हे आमचे उद्दिष्ट तर नक्कीच नाही. तुम्ही करत असलेले काम समाजासाठी आणि देशासाठी उपयुक्त आहे, हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. एक भारतीय असल्याने मला असे वाटते की, गेल्या काही काळापासून संपूर्ण देशात अशी भावना आहे की, आपण आपल्या राष्ट्राला विकसनशील श्रेणीतून विकसित श्रेणीत आणले पाहिजे. हे उद्दिष्ट साध्य करताना सर्व प्रयत्नांमध्ये आमच्या समूहाचाही एक छोटासा प्रयत्न आहे, असे मानले जाऊ शकते.
चला, हेही मानूयात की, जगातील सर्वात श्रीमंत होण्याची शर्यत म्हणजे केवळ नाममात्र संख्या आहे. असे गृहीत धरले तरी सदैव पुढे राहण्याची प्रेरणा नेमकी आपल्याला कुठून मिळते?
गौतम अदानी : अनेक वर्षांतील गुलामगिरीनंतर भारत देश स्वतंत्र झाला. सर्व काही नव्याने सुरुवात करणे आवश्यक होते. मला फार जुने सांगण्याचा अधिकार निश्चितच नाही. मात्र आम्ही १९८० आणि १९९०च्या दशकात जेव्हा व्यवसाय क्षेत्रात प्रवेश केला तेव्हा आम्हाला देशाची गरज आणि समस्या प्रकर्षाने जाणवल्या. आमच्याकडे पुरेशी विकसित अशी सागरी बंदरे होती. आमच्याकडे विमानतळ होते. मात्र रस्त्यांची अवस्था फारशी ठीक नव्हती. विजेची मागणी आणि पुरवठा यातही ताळमेळ नव्हता. त्याचवेळी जवळजवळ आपल्याबरोबरच एका नव्या भागातून प्रगतीच्या मार्गावर असलेला चीन खूप वेगाने पुढे जात होता. मला हेही लक्षात आले आहे की, सध्या आपल्या देशात सर्वात मोठी गरज आहे ती उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करण्याची. देशात साधनसंपत्तीची कमतरता नाही; परंतु त्यांचा योग्य वापर व्हावा यासाठी आवश्यक अशी व्यवस्था तयार करण्याची गरज आहे. तेव्हापासूनच आम्ही ती गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत.
तुमचा हा प्रयत्न कितपत यशस्वी झाला, असे तुम्हाला वाटते?
गौतम अदानी : कदाचित तुम्हीच याचे उत्तर उत्तमरीत्या देऊ शकता. आम्ही आमचे काम करत आहोत. व्यक्तिशः एक भारतीय या नात्याने मी आणि माझा उद्योग समूह देशाच्या उभारणीत शक्य होईल तितके योगदान देऊ शकलो, याबद्दल मी आत्म-समाधानी आहे. याला मी देवाची कृपा आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद म्हणूनही पाहतो. गेल्या तीन दशकांपासून समूह, कंपन्यांचे सर्व भागधारक, गुंतवणूकदार, सरकार, नियामक यंत्रणा आणि देशातील जनता आमच्या या प्रयत्नांना पाठिंबा आणि प्रोत्साहन देत आहेत, हे मी माझे भाग्य समजतो.
असे असले तरी, पंतप्रधान मोदींशी तुमची जवळीक असल्यामुळे हे सर्व शक्य झाले आहे, असे तुमचे टीकाकार नेहमीच म्हणतात. तुम्ही काय सांगाल?
गौतम अदानी : अशी टीका करणाऱ्यांना ना मोदी माहीत आहेत, ना त्यांची कार्यक्षमता. वास्तविक ही टीका केली जाते, कारण मी गुजरातचा आहे आणि नरेंद्र मोदी हे सलग १२ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते म्हणून. पंतप्रधान पूर्णपणे निष्पक्ष आणि प्रामाणिक आहेत, हे मला तसेच इतरांनाही माहीत आहे. सत्य हेच आहे की, त्यांच्या दूरदृष्टी धोरणांमुळे आधी गुजरातमध्ये आणि आता देशात व्यवसायासाठी अनुकूल असे वातावरण तयार झाले आहे. शिवाय प्रत्येक व्यवसायालाही, मग तो कोणत्याही क्षेत्रातील असो त्याला त्याचा लाभ झाला आहे. देश आणि राज्यालाही लाभ झाला आहे. वैयक्तिक फायद्याचा प्रश्न उपस्थित होत असेल, तर माझ्या समूहाचे कार्य राजस्थान, छत्तीसगड, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा अशा देशातील सर्व बिगर भाजपशासित राज्यांमध्येही आहे. या राज्यात वेगवेगळ्या पक्षांची सरकारे आहेत. आम्ही त्या सरकारांसोबत त्यांच्या सहकार्याने आणि समन्वयाने योग्य धोरण आणि निर्धाराने काम करत आहोत. तुम्ही असे एक तरी उदाहरण द्या, ज्यामध्ये माझ्या कोणत्याही कंपनीला स्पर्धात्मक बोलीशिवाय कोणतेही कंत्राट मिळाले.
राहुल गांधी तुम्हाला सतत लक्ष्य का करतात?
गौतम अदानी : मी याचे उत्तर कसे देऊ शकतो? ते देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आहेत. ते राजकारणी आहेत. तर मी एक सामान्य उद्योजक आहे.
तुमच्या समूह कंपन्यांवर कर्जाचा एवढा भार आहे की हा फुगा फुटला तर बँका मोठ्या अडचणीत येतील, अशीही टीका होते.
गौतम अदानी : तुम्ही हा खूप चांगला प्रश्न विचारला आहे. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना खूप पैसा लागतो, हे तुम्हीही जाणताच. त्यासाठी कर्ज घ्यावे लागते. जर कर्ज दीर्घ कालावधीसाठी असेल, नेमक्या वेळी उपयोगी आले आणि तुम्ही त्या अर्थसाहाय्याने त्वरित विकास करू शकत असाल, तर ही मला वाटते ही एक चांगली रणनीती आहे. गेल्या ९ वर्षांत आमच्या समूहाचे कर्ज प्रमाण ११% ने वाढले आहे आणि उत्पन्नात दुप्पट म्हणजेच २२% वाढ झाली आहे. आता मला सांगा की, ही एक उत्तम रणनीती आहे किंवा नाही? यामुळेच या ९ वर्षांत माझ्या कंपन्यांच्या शेअरच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत आणि गुंतवणूकदार तसेच भागधारकांनाही मोठ्या प्रमाणात नफा झाला आहे.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या ९ वर्षांत कर्ज आणि कर्ज सेवा उत्पन्नाचे प्रमाण – ज्याला आर्थिक भाषेत EBIDTA म्हणतात ते जवळपास ५०% कमी झाले आहे. याच कालावधीत सरकारी आणि खासगी बँकांचा कर्जातील हिस्सा ८४% वरून अवघ्या ३३% वर आला आहे. म्हणजे जवळपास ६०% ची घट झाली आहे. परिणामी असे सर्व आरोप निराधार असल्याचे याच आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. कर्ज बुडविणे तर सोडा अदानीसमूहाने कर्जफेडीसाठी कधीही एक दिवसाचाही विलंब केला नाही. इतिहास याचा साक्षीदार आहे. कंपन्यांच्या आर्थिक आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी पतमानांकन संस्थांना खूपच महत्त्वाचे स्थान असते. पतमानांकन संस्थांकडून सर्वोत्तम पतमानांकन म्हणजे सार्वभौम दर्जा. मला सांगायला आनंद होतो की, अदानीसमूहातील आमच्या जवळपास सर्व कंपन्या भारत सरकारच्या पतमानांकनाच्या बरोबरीने सार्वभौम पतमानांकन राखून आहेत. आमच्या व्यतिरिक्त भारतातील इतर कोणत्याही उद्योग समूहाच्या संख्येने इतक्या कंपन्यांना सार्वभौम पतमानांकन मिळालेले नाही, हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे. तेव्हा कर्ज हा मुद्दाच नाही. आमच्या कंपन्यांवरील कर्जाबाबत इतके काही वेळोवेळी ठळकपणे मांडले जाते, हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. मात्र गेल्या ३ वर्षांत समूहात सुमारे १,३०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याची चर्चा कधीच होत नाही आणि तीही जगातील सर्वात मोठ्या अशा गुंतवणूकदारांकडून!
आतापर्यंत आम्ही बहुतेक तेच प्रश्न विचारले आहेत जे समीक्षक सातत्याने उपस्थित करत आले आहेत. त्यांच्याकडीलच एक शेवटचा
प्रश्न – तुम्ही सर्वात मोठी हरित ऊर्जा कंपनी असल्याचा दावा करता. मात्र तुमचा कोळशाचा मोठा व्यवसायही आहे. काही महिन्यांपूर्वी तुम्ही ऑस्ट्रेलियातील कोळशाच्या खाणीही विकत घेतल्या…
गौतम अदानी : व्यक्तिशः मी हरित ऊर्जेचा कट्टर समर्थक आहे. मात्र भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आम्हाला अजूनही आष्णिक ऊर्जा प्रकल्पांची गरज आहे, ही वास्तविकता आहे. मात्र कालांतराने जीवाश्म इंधन आधारित ऊर्जेची जागा ही हरित ऊर्जेद्वारे घेतली जाईल आणि लवकरच हरित आणि स्वच्छ ऊर्जा ही देशाच्या ऊर्जा सुरक्षेचे प्राथमिक स्त्रोत नक्कीच बनेल. मात्र तोपर्यंत या स्पर्धेच्या युगात जीवाश्म इंधनाचीही भूमिका असेलच. त्यामुळे आमचा दीर्घकालीन व्यवसाय हा स्वच्छ आणि हरित ऊर्जेसाठीच आहे.
देशातील अनेक लोकांसाठी तुम्ही प्रेरणास्रोत आहात. या मुलाखतीच्या माध्यमातून तुमच्या प्रवासाविषयी जाणून घेतल्यास ते लोकांसाठी उत्तम यश मिळविण्यासाठी प्रेरणादायक ठरेल.
गौतम अदानी : मी भारतीय कुटुंब परंपरेतील एक साधा माणूस आहे. आजही आम्ही एकत्र कुटुंबात राहतो. त्या कुटुंबातील केवळ रक्ताचे नातेवाईकच नाहीत, तर माझे सहकारी आणि मित्रही कुटुंबाचा एक भाग आहेत. माझ्या हातून जे काही काम असेल ते माझ्यासाठीच नाही तर इतरांनाही उपयोगी पडले पाहिजे, यासाठी मी सदैव प्रयत्नशील असतो. आपण जे काही काम केले आहे, त्याला यशाचे बिरुद लावायचे असेल, तर अशा सर्व लोकांचा माझ्या या प्रवासात खूपच महत्त्वाचा वाटा आहे, हे नाकारून चालणार नाही.
एकेकाळी देशात औद्योगिक घराण्यांचा उल्लेख झाला की, टाटा-बिर्ला हेच नाव प्रत्येकाच्या जिभेवर असायचे. आता अदानीआणि अंबानींचे नाव येते. या बदलाकडे तुम्ही कसे पाहता?
गौतम अदानी : टाटा-बिर्ला ही निःसंशयपणे, देशातील सर्वात प्रतिष्ठित कुटुंबे होती आणि अजूनही आहेत. आपण आजही त्यांच्यापासून शिकतो. रिलायन्स समूहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांनीही एक सामान्य माणूस काय करू शकतो, याचे उदाहरण जगाला घालून दिले. व्यवसायारंभ ते यशापर्यंतचा त्यांचा प्रवास हा सर्व उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. माझ्यासाठी हे आणखी महत्त्वाचे आहे. कारण मी देखील पहिल्या पिढीचा उद्योजक आहे. मी सुद्धा धीरुभाईंप्रमाणे शून्यातून माझा व्यवसाय सुरू केला. माझा समूह या सर्व औद्योगिक समूहांबद्दल खरोखर कृतज्ञ आहे. कारण त्यांच्या अनुभवातून आपण खूप काही शिकलो आहोत.
गौतम अदानीआज लाखो लोकांसाठी आदर्श आहेत. गौतम अदानीयांच्यासाठीही काही रोल मॉडेल असतीलच ना? आणि जर हो तर ते कोण?
गौतम अदानी : होय, आहे नं. नक्कीच आणि तो म्हणजे श्रीकृष्ण. हो. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला आव्हानांचा सामना हा करावाच लागतो. श्रीकृष्णाच्या चरित्रात तुम्हाला त्यावरील उत्तर मिळेल. संघर्ष ते यश आणि संकट ते समाधान या प्रवासावरील तो उपाय आहे. मी जेव्हा द्विधा मन:स्थितीत असतो तेव्हा मला परमेश्वराची आठवण येते.
सध्याच्या काळातही काही प्रेरणास्त्रोत आहेत का?
गौतम अदानी : आर. के. लक्ष्मणच्या सर्वच व्यंगचित्रात असलेला सामान्य माणूस लक्षात ठेवा. त्याच्या समस्या, त्याच्या आकांक्षा, त्याची आवड, त्याची निराशा, त्याचा आनंद, त्याच्या सर्व भावना टिपा. अशा सगळ्या भावना मी अनुभवल्या आहेत. त्या नेहमी माझ्यासोबत राहिल्या आहेत. आयुष्यात, कुटुंबासह, मित्रांसह त्या वेळोवेळी राहिल्या आहेत. म्हणूनच देशातील प्रत्येक नागरिक हा माझ्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे. आम्ही त्याच्या भल्यासाठीची स्वप्न पाहतो आणि ती पूर्ण करण्यासाठी कार्यरत राहतो.
देशात नवउद्यमी (स्टार्टअप) संस्कृती वेगाने वाढते आहे. अशी स्वप्ने पाहणाऱ्यांसाठी तुमचा काय सल्ला असेल?
गौतम अदानी : आयुष्यात कोणताही शॉर्टकट नसतो. जेव्हा तुमचा तुमच्या स्वप्नांवर पूर्ण विश्वास असतो आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम करता तेव्हाच स्वप्ने सत्यात उतरत असतात. यश-अपयश हा जीवनाचा एक भाग आहे. अपयशाने घाबरू नका किंवा घाबरवू नका. शिवलिंगसिंह सुमीच्या पुढील कवितेने माझ्या लहानपणीच माझ्यावर अमिट छाप पाडली –
हार असो वा जीत,
मला मुळी भय नाही
संघर्षाच्या वाटेवरचे,
तेही बरोबर आणि हेही बरोबर
मात्र वरदान मागणार नाही.
आता पुन्हा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुद्द्याकडे वळुयात. कोरोना वैश्विक साथ आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे उद्भवलेल्या संकटातून आपण आता पूर्णपणे सावरलो आहोत, असे वाटते का?
गौतम अदानी : महासाथी दरम्यान यशस्वी लसीकरण मोहिमेची कोणी अपेक्षा केली होती का? टाळेबंदीनंतर आर्थिक संकटातून बाहेर पडणे एवढे सोप्पे होते का? आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा पूर्णपणे कोलमडून पडतील असे वाटत होते. मात्र तसे काही झाले का? रशिया-युक्रेन युद्धानंतर जगभर ऊर्जेचे संकट निर्माण झाले. अन्नटंचाई, महागाईचे आव्हान आहे. मात्र या सर्व समस्यांपासून आपला देश वाचला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या ताकदीचा हा पुरावाच म्हणायला हवा. देशात गुंतवणुकीसाठी विदेशी गुंतवणूकदार तिष्ठित आहेत. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण झाल्यामुळे उत्पादन क्षेत्र झेप घेत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आता भारतात उत्पादन निर्मिती करण्यासाठी येत आहेत. जागतिक स्तरावर भारत हा एक आशास्थान आहे. भारताला जी-२०चे अध्यक्षपद मिळाले आहे. भारतीय असल्या कारणाने आपल्या सर्वांसाठी हा बदल अभिमानास्पद आहे.
तुमच्या माध्यम क्षेत्रातील प्रवेशाबद्दल तुम्हाला काही विचारले नाही, तर ही मुलाखत अपूर्ण राहील. एनडीटीव्ही वाहिनीवर समूहाने ताबा घेतल्याच्या घटनेकडे काही लोक माध्यमांवरील स्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहत आहेत…
गौतम अदानी : उद्योग जगताचा प्रसारमाध्यमांमध्ये प्रवेश आणि प्रसारमाध्यमांचा इतर व्यवसायांमध्ये विस्तार हे वर्षानुवर्षे घडत आले आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात ते होत आहे. मात्र असे काही गौतम अदानीकरत असल्याने त्याबाबतची चर्चा होणे आपसूक आलेच. मी यापूर्वी देखील स्पष्ट केले आहे की, एनडीटीव्हीचे संपादन ही आमची एक सामाजिक जबाबदारी आहे आणि तेही काही केवळ व्यवसाय लाभासाठी केलेले अधिग्रहण नाही. भारतात अनेक उत्तम माध्यम समूह आहेत. मात्र एनडीटीव्हीच्या माध्यमातून आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरील (ब्रँड) नाममुद्रा तयार करावी, अशी माझी इच्छा आहे. एनडीटीव्ही ही एक चांगली वृत्तसंस्था आहे आणि उत्तम अशा नाममुद्रेसाठी आवश्यक असे सर्व गुण या वाहिनीत आहेत. केवळ आवश्यकता आहे ती योग्य विचारसरणी, धोरणनीती, तांत्रिक, आर्थिक आणि मनुष्यबळाची. याद्वारे एनडीटीव्ही ही तिच्या उद्योग ओळखीनुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जा मिळवू शकेल. या ठिकाणी मला हे देखील नमूद करायला आवडेल की, माझ्या सर्व कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतंत्र आहेत आणि त्यांच्या दैनंदिन कामकाजात माझा कोणताही हस्तक्षेप नाही. माझी भूमिका केवळ धोरण आखण्यापुरती मर्यादित आहे. एनडीटीव्हीच्या बाबतीतही वृत्त आणि संपादकीय यांच्यामध्ये निश्चितच स्पष्ट अशी लक्ष्मणरेखा असेल.
आता हा शेवटचा प्रश्न. समाजसेवा किंवा समाज कल्याणाशी संबंधित उद्योगाच्या कामाचे नेमके स्थान काय आहे?
गौतम अदानी : हा थेट माझ्या हृदयाला भिडेल असा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्ही आधी विचारायला हवा होता, शेवटचा नाही. असो. सामाजिक सेवा आणि जनकल्याणासाठी आम्ही अदानीफाऊंडेशनची स्थापना केली आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही देशात परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी, माझ्या ६०व्या वाढदिवशी, मी माझ्या कुटुंबासमवेत एक कल्पना मांडली की, मला देशाच्या सामाजिक क्षेत्राला ६०,००० कोटी रुपयांचे योगदान द्यावयाचे आहेत. याबाबत माझ्या कुटुंबाने मला लगेचच संमती दिली, याचा मला आनंद आहे. याद्वारे शिक्षण, आरोग्य, सामाजिक विकास यांसारख्या क्षेत्रात ठोस कार्य होईल. या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही देशातील प्रत्येक सामान्य माणसाच्या दु:खात सहभागी होण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्या राष्ट्र उभारणी प्रकल्पातील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे.
अदानीफाऊंडेशनच्या कामगिरीबद्दल काही सांगाल का?
गौतम अदानी : अदानीफाऊंडेशन आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणण्यासाठी कार्यरत आहे. फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रीती अदानीयांच्या भक्कम नेतृत्वाखाली फाऊंडेशन आज जगातील सर्वात सक्रिय आणि दूरगामी संस्थांपैकी एक अशी आहे. ही संस्था सकारात्मक असा सामाजिक प्रभाव पाडते आणि आकडेवारीतच सांगायचेच झाले, तर फाऊंडेशनने सपोर्ट कार्यक्रमाद्वारे भारताच्या कानाकोपऱ्यांतील २,४०९ गावांमधील सुमारे ४० लाख लोकांना साहाय्य केले आहे. स्वच्छताग्रह, सुपोषण, सक्षम, उड्डाण आणि उत्थान यांसारख्या अनेक उपक्रमांनी हजारो मुले, तरुण, महिला आणि कुटुंबांना नवी दिशा मिळवून दिली आहे. अदानीफाऊंडेशन शिक्षण, आरोग्य, शाश्वत उपजीविका आणि ग्रामीण पायाभूत सुविधांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या आणि अनेकांच्या जीवनात सुधारणा करण्याच्या अथक हेतूने परिचित आहे. अदानीफाऊंडेशनचे मूळ ध्येय सर्वांसाठी समान आणि सामंजस्यपूर्ण समाजनिर्मिती करणे हेच आहे.