Thursday, July 25, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखअग्रलेख : लावणीला प्रतिष्ठा मिळवून देणारी सम्राज्ञी

अग्रलेख : लावणीला प्रतिष्ठा मिळवून देणारी सम्राज्ञी

महाराष्ट्राला लोकगीत, लोकसंगीत, लोकनृत्याचा खजिना म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पण आपण एव्हढे कपाळकरंटे आहोत की, आपल्याला या खजिन्याचे महत्त्वच जणू कळलेले नाही. कारण हा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी किंवा त्याचा प्रसार, प्रचार करण्यासाठी कोणत्याही पातळीवर काहीही विशेष असे प्रयत्न केले जात असल्याचे दिसत नाही. ज्यावेळी लावणीला फारशी प्रतिष्ठा दिली जात नव्हती, लावणीला विशिष्ट नजरेतून पाहिले जात होते त्यावेळी आपल्या उपजत ठसकेबाज गायनाने सुलोचना चव्हाण यांनी आपल्याला ठसकेबाज आवाजाने माजघरापर्यंत पोहोचविली. त्यांच्या अनेक लावण्यांनी महाराष्ट्राला अक्षरश: वेड लावले. एकूणच ‘लावणी’ला प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून देणाऱ्या लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे वृद्धापकाळाने ८९ व्या निधन झाले. त्यांच्या निधनाने लावणीला घराघरांत, मनामनांत पोहोचविणारा आणि महाराष्ट्राच्या लावणीची ओळख सांगणारा आवाज शांत झाला आहे. विशेष म्हणजे लावणीचा बाज आणि त्याची लोकप्रियता ही सुलोचनाताईंमुळेच आजपर्यंत टिकून राहिली आणि नवनवे कलावंत या कलेकडे आकृष्ट होऊ लागले असे म्हटले पाहिजे. अतिशय साधे-सोज्वळ व्यक्तिमत्त्व असलेल्या सुलोचना चव्हाण यांचे लावणी या संगीत प्रकाराशी आकस्मिक जुळलेले व घट्ट होत गेलेले नाते अखेरपर्यंत टिकून राहिले. आपल्या पार्श्वगायनाची सुरुवात हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रापासून करणाऱ्या सुलोचना चव्हाण यांच्या आवाजाला तिथेही रसिकांची दाद मिळाली.

अगदी लहानपणी ‘कृष्ण सुदामा’ या चित्रपटासाठी त्यांनी पहिले हिंदी गीत गायले होते. चित्रपट संगीत गायनात रमलेल्या सुलोचना यांच्या आयुष्यात संगीतकार वसंतराव पवार यांनी केलेल्या आग्रहाखातर लावणीचा प्रवेश झाला. सुरुवातीला लावणी गायनासाठी त्या मनापासून तयार नव्हत्या. मात्र त्यांच्या आवाजात ‘नाव गाव कशाला पुसता मी आहे कोल्हापूरची…’ ही पहिली लावणी ध्वनिमुद्रित झाली आणि मग ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला’, ‘पाडाला पिकलाय आंबा’,‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘कसं काय पाटील बरं हाय का?’, ‘खेळताना रंग बाई होळीचा’, ‘कळीदार कापुरी पान’, ‘औंदा लगीन करायचं’, ‘पदरावरती जरतारीचा’ अशा अनेक बहारदार लावण्यांनी महाराष्ट्राला वेड लावले. महाराष्ट्रातील प्रत्येक गावखेड्यात त्यांनी लावणी गायनाचा कार्यक्रम केला. बैठकीची लावणी किती समृद्ध असावी याचा वस्तुपाठ सुलोचनाताईंनी घालून दिला. त्यांचे मोठे बंधू दीनानाथ यांनी ‘श्रीकृष्ण बाळमेळा’ सुरू केला होता. या मेळ्यात काही भजने आणि गाणी गाणाऱ्या सुलोचना यांचा आवाज रंगभूषाकार दांडेकर यांनी ऐकला. त्यांनी संगीत दिग्दर्शक श्यामाबाबू पाठक यांच्याशी त्यांची भेट घडवून आणली आणि ‘कृष्ण सुदामा’ या चित्रपटातील गाण्याने त्यांच्या गायन कारकिर्दीचा प्रारंभ झाला. शास्त्रीय संगीताचे कोणत्याही प्रकारचे शिक्षण नसताना, केवळ आवड म्हणून गाण्याकडे वळलेल्या सुलोचना यांनी वयाच्या अकराव्या वर्षांपासून पार्श्वगायनास सुरुवात केली. सी. रामचंद्र, मन्ना डे, मोहंमद रफी, मुकेश, जोहराबाई, आमीरबाई, शमशाद बेगम अशा मान्यवर गायकांबरोबर त्यांनी गायन केले. मराठी, हिंदीबरोबरच पंजाबी आणि गुजराती भाषेतही त्यांनी पार्श्वगायन केले. लावणी गाण्यासाठी पती, चित्रपट दिग्दर्शक श्यामराव चव्हाण यांनीच आपल्याला प्रोत्साहन दिले. संगीतकार वसंतराव पवार यांनी श्यामरावांकडे ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटातील ‘नाव, गाव कशाला पुसता’ ही लावणी सुलोचना यांच्याकडूनच गाऊन घ्यायची आहे, असा आग्रह धरला. जगदीश खेबुडकरांनी लिहिलेली ही लावणी सुलोचना यांनी गायली आणि त्यांचे अवघे आयुष्यच लावणीमय होऊन गेले. ‘मल्हारी मार्तंड’, ‘केला इशारा जाता जाता’, ‘सवाल माझा ऐका’ अशा अनेक तमाशाप्रधान चित्रपटांतून त्यांनी लावण्या सादर केल्या. लावणीतला ठसका, त्यातला श्रृंगार, खट्याळपणा या गोष्टी त्यांनी आपल्या आवाजातून लोकांपर्यंत पुरेपूर पोहोचविल्या.

त्यांच्या याच ठसकेबाज लावण्यांमुळे आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘लावणी सम्राज्ञी’ हा किताब दिला. सुमारे पाच हजारांहून अधिक मराठी आणि अडीचशेहून अधिक हिंदीतील गीतांमधून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. लावणी गायनाने त्यांना अनेक मान – सन्मान मिळवून दिले. ‘पी. सावळाराम – गंगा जमना’ पुरस्कार आणि संगीत क्षेत्रातील अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांना संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारानेही गौरवण्यात आले. ‘माझे गाणे माझे जगणे’ हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. लावणी या संगीत प्रकाराची वैशिष्ट्ये ओळखून ती आत्मसात करणाऱ्या आणि मनापासून लावणी महाराष्ट्रभर पोहोचवणाऱ्या सुलोचना चव्हाण या खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी होत्या. कलेच्या क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना यंदा ‘पद्मश्री’ने सन्मानित करण्यात आले. सरकारने अगदी उतारवयात हा मान बहाल केल्याने चाकाच्या खुर्चीवर बसून त्यांना हा सन्मान स्वीकारावा लागला. त्यामुळे पुरस्काराचा आनंदही त्यांना नीट घेता आला नाही. आयुष्यभर कार्य करून अगदी शेवटला पुरस्कार दिला, तर त्याला काय अर्थ आहे. एखादा कलावंत क्रियाशील असताना आणि चालता – फिरता असताना त्यांना मान-सन्मान देऊन त्यांची बडदास्त राखली जायला हवी. पण अनेकांच्या बाबतीत हे होताना दिसत नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -