कोणत्याही गावाचा, शहराचा आणि एकूणच विभागाचा पद्धतशीरपणे विकास घडवून आणला, तर तेथील जनमानस हे कायमच तुमच्यासोबत राहते, हे गुजरातच्या विधानसभा निवडणुकीतून पुन्हा सिद्ध झाले आहे. ही अत्यंत महत्त्वाची बाब ध्यानी घेऊन राज्यातील एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारने मार्गक्रमणा सुरू केली आहे. विरोधकांनी कितीही आणि कोणत्याही पातळीवरील टीका केली, तरी त्याकडे कानाडोळा करून ही नेतेमंडळी आपल्या सहकाऱ्यांसोबत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या शहरांबरोबरच आपापल्या मतदारसंघांचा आणि एकूणच राज्याचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यास कार्यमग्न झाली असल्याचे एक आशादायक चित्र सध्या दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबईला सुंदर करण्याचा संकल्प शिंदे-फडणवीस सरकारने सोडला आहे.
या अंतर्गत गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबईला सुशोभित करणाऱ्या ५०० प्रकल्पांचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. गेली अनेक वर्षे मुंबईवर सत्ता गाजवणाऱ्यांनी मुंबईचा विकास घडविण्याचे मुख्य काम सोडून मुंबईला केवळ आणि केवळ भकास करण्याचे काम केले, असे खेदाने म्हणावे लागेल. मुंबईतील खड्डेयुक्त रस्ते, जागोजागी मोठ्या प्रमाणात होत असलेली वाहतूक कोंडी, फेरीवाल्यांचा सुळसुळाट असलेले फुटपाथ व त्यामुळे रस्त्यांवरून कसरत करीत जीव सांभाळून चालणारे मुंबईकर, वाहन पार्किंगची अपुरी सोय व त्यातून उद्भणारे वाद अशा एक ना अनेक समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा चंगच शिंदे-फडणवीस सरकारने बांधलेला दिसत आहे. शहराच्या सौंदर्यीकरणाबरोबरच स्वच्छता, पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. अत्यंत गचाळ आणि डम्पिंग ग्राऊंडच्या अपुऱ्या सोयीमुळे कचऱ्याच्या आणि अस्वच्छतेच्या समस्येने ग्रासलेल्या या शहराला पाच हजार स्वच्छता दूतांच्या माध्यमातून स्वच्छ ठेवण्यासाठीचे नियोजन केले जाणार आहे. मुंबई शहर सौंदर्यीकरण प्रकल्पामुळे सेवांचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे.
राज्यात सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई विकासाचा आराखडा तयार करण्यास सांगितले. त्यामुळे ते या योजनेचे शिल्पकार आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मुंबई शहरात सर्व सुविधायुक्त स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार निधी उपलब्ध करून देणार आहे. तसेच झोपडपट्टी परिसरात स्वच्छतागृहांची अधिकची तसेच पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. शहरात सांडपाण्याचा मोठा प्रश्न आहे. त्याच्या नियोजनासाठी कम्युनिटी वॉशिंग मशीन संकल्पना प्रत्यक्षात आणणे, झोपडपट्टी परिसरात अनेक ठिकाणी हँगिंग लाईट ही संकल्पना राबविण्याचे नियोजन सुरू आहे. ऐतिहासिक वारसा स्थळांचे महत्त्व जाणून त्याच पद्धतीने त्याची जपणूक करण्यात येणार आहे. स्काय वॉक तर बांधले. पण त्यांचा वापर करणे स्त्रियांना, मुलांना, वृद्ध मंडळींना कठीण जात होते. ही बाब ध्यानी घेऊन त्या ठिकाणी एस्केलेटर्स बसविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर स्कायवॉकवर महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाकडून सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. भर पावसाळ्यात मुंबईतील रस्ते जलमय आणि खड्डेमय होत असल्याने त्या समस्येकडे लक्ष दिले जाणार आहे. पावसाळा संपताच रस्त्यांची दुरुस्ती, पुनर्पृष्टीकरण केले जाणार आहे.
महत्त्वाच्या पुलांच्या भागांत रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाई केली जाईल. सर्व अधिकृत जाहिरात फलक सहा महिन्यांत टप्प्याटप्प्याने डिजिटल जाहिरात फलकांत रूपांतरित होतील. पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गांवरील सर्व जाहिरात फलक डिजिटल केले जातील. त्यासाठी नवीन जाहिरात धोरणही लवकर तयार केले जाणार आहे. मुंबईतील रस्त्यांची दुरुस्ती करून आणि रिसर्फेसिंग करून महत्त्वाचे रस्ते काँक्रीटचे केले जाणार आहेत. म्हणजे ते रस्ते किमान ३० वर्ष टिकले जातील. याचा विचार करून यावर्षी ५०० किलोमीटर रस्त्यांचे काम हाती घेतले जाणार आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. अनेकांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम हे शहर करते. सगळ्यांना सामावून घेणारे हे शहर आहे. त्यामुळे या शहरात पायाभूत सोयी-सुविधा ह्या उत्तम दर्जाच्या असायलाच हव्यात, याचा सांगोपांग विचार या सरकारने केलेला दिसत आहे. मुंबई शहर एकीकडे विस्तारत असताना कोळीवाडे, तेथील संस्कृती, परंपरा जोपासण्याचे कामही आवर्जून केले जाणार आहे. विशेष म्हणजे या सरकारने सत्तेवर आल्यानंतर केवळ चार महिन्यांत महानगरपालिका क्षेत्रात ५२ बाळासाहेब ठाकरे दवाखाने सुरू केले आहेत. मुंबईकरांसाठी शहराचा विकासात्मक बदल करताना रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेऊन या शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवरील ओळख अधिक ठळक करण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात येणार आहे. हे करताना प्रत्येक काम दर्जेदार आणि पारदर्शकपणे करण्यावर भर दिला जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असलेली लोकप्रियता आणि दबदबा ध्यानी घेऊन यावर्षी ‘जी-२० परिषद’ आयोजनाचा मान आपल्या देशाला मिळाला आहे. त्यानिमित्त मुंबईसह राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये १४ बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी परदेशातून येणाऱ्या मान्यवर प्रतिनिधी, पाहुणे मंडळी यांच्यासमोर मुंबई आणि आपल्या राज्याचे ब्रँडिग करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. त्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न यातून केला गेला पाहिजे. त्यातूनच आगामी काळात मुंबई या ऐतिहासिक शहरातील वास्तू आणि रस्त्यांचा चेहरा-मोहरा नक्कीच बदललेला दिसेल, असे म्हणायला हरकत नाही.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…