मुले आणि अर्थसाक्षरता

Share

माझ्या माहितीत असलेल्या एका व्यक्तीचे अलीकडेच निधन झाले. त्यांचा मुलगा एका नामवंत कंपनीत उच्च पदावर आहे. आज त्याच्या वडिलांची गुंतवणूकविषयक कागदपत्रे, कोणतीही कायदेशीर अडचण नसताना, सुरळीत करताना त्याला पावलोपावली अडचण येत आहे. याचे मुख्य कारण आहे अर्थसाक्षरतेचा अभाव. आपल्या राहणीमानात गेल्या काही वर्षांत प्रचंड फरक पडला आहे. त्यामुळे आपल्या जीवनाचे प्राधान्यक्रम पूर्णपणे बदलून गेले आहेत. अनेक नवीन गोष्टींचे सर्वांना आकर्षण आहे. त्याचप्रमाणे आर्थिक सुबत्ता आणि घरी दोन अथवा अलीकडे एकच मूल असल्याने त्याचे अनेक हट्ट सहज पुरवले जातात. याशिवाय ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाहीत त्या मुलांना मिळाव्यात, असे पालकांना वाटत असते.

आर्थिक क्षेत्रातील झपाट्याने होणारे बदल, वाढती महागाई आणि पालकांची बदललेली मानसिकता, त्याचबरोबर अनेक पालकांना या बदलांना कसं सामोरे जायचं हेच माहिती नसल्याने त्याचाच अभाव मुलांमध्ये दिसतो. काहींचे पालक घरून काम करत असतात. अनेकदा काही पालक मुलांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी नेतात, त्यामुळे मशीनमधून पैसे मिळतात असे त्यांना वाटत राहाते. या सर्वांचा एकच परिणाम म्हणजे चुकीच्या आर्थिक कल्पना डोक्यात फिट्ट बसतात. त्यात पालकही पूर्ण साक्षर नसल्याने त्याच्याही मनात काही चुकीच्या कल्पना ठाण धरून बसलेल्या असतात.

अजून तरी शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक विषयाची फारशी माहिती दिली जात नाही. महाविद्यालयात जाणाऱ्या सर्व लोकांना हा विषय सक्तीचा नाही. त्याचप्रमाणे ज्यांना तो सक्तीचा आहे त्यातील नेमका हाच महत्त्वाचा भाग त्यांनी कंटाळा येतो म्हणून अभ्यास न करता राखीव ठेवलेला असतो. खरं अलीकडील पिढी खूप हुशार आहे, जिज्ञासू आहे. त्यामुळे त्यांनी मनावर घेऊन काही प्राथमिक गोष्टी शिकून घेतल्या तर त्या आयुष्यभर उपयोगी पडतील. अलीकडेच मी आर्थिक सल्लागार हितेन माळी यांच्या एक वेबिनारमध्ये सहभाग घेतला. त्यांनी मुलांना आणि त्यांच्या पालकांना Money आणि Monkey यात असलेल्या K चे म्हणजेच Knowledge चे महत्त्व अधोरेखित केले. ते जर आपल्यापाशी नसेल तर आपल्याकडील पैसा माकडाचेष्टा करायला लागेल.

अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून पालक आणि मुले अर्थसाक्षर बनू शकतील. यासाठी सहज करता येण्यासारख्या गोष्टी –

  • अगदी लहान मुलांना पैशांची ओळख करून द्या. आपण वस्तू आणि सेवेचा मोबदला अन्य व्यक्तीस देत असाल, तर तो मुलांमार्फत द्या आपल्याला मिळणाऱ्या वस्तू सेवेबद्दल जसे यांना पैसे मिळतात तसेच पैसे आपण नोकरी-व्यवसाय करत असल्याने मिळतात. फक्त ते रोख न मिळता आपल्या बँक खात्यात जातात. जरुरीनुसार ते काढता येतात हे त्यांना समजून सांगा.
  • हे पैसे तुम्ही बँकेतून एटीएममधून काढू कसे शकता, इतरांना कसे पाठवू शकता, ते त्यांना तेथे नेऊन दाखवा. अगदी छोटे व्यवहार त्यांच्याकडून करून घ्या. पालकांनी आपले उत्पन्न आणि खर्च लिहावा. मुलांना त्यांच्या पॉकेटमनीचा हिशोब ठेवण्यास सांगावा. ठरावीक अंतराने त्याचा आढावा घ्या. यामुळे दोघांनाही आपले अनावश्यक खर्च कुठे होतात ते समजेल. याच वयात शाळेत सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज अभ्यासास आहे. यासंबंधात पालकांचे गणित कच्चे असल्यास मुलांबरोबर या संकल्पना समजून घ्या.
  • नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच वर्षाचे आर्थिक संकल्प लिहावे. त्यात मुलांना सहभागी करावे. त्यांचे विचार जाणून घ्यावेत. न झेपणारे संकल्प बाजूस ठेवावेत. मुलांना ते समजून सांगावे पण भलते धाडस करण्याच्या भानगडीत पडू नये.
  • अल्प काळात करता येतील असे छोटे व्यवसाय करायला मुलांना प्रोत्साहन द्यावे. कोणतंही काम हे काम असतं. त्यात उच्च-नीच काही नसतं. ते काम दर्जेदारपणे करणं, हे कौशल्याचं काम आहे, याची जाणीव बालपणापासून करून द्यावी. ज्येष्ठ नागरिक असतील, तर त्यांचा सल्ला घ्यावा. व्यवसायाचा हिशोब शिकवावा. झालेल्या नफ्याची अन्य ठिकाणी गुंतवणूक करण्यास मुलांना मार्गदर्शन करावे अथवा दोघांनीही मार्गदर्शकाकडे जाऊन सल्ला घ्यावा.
  • अनेक पालकांना महागड्या वस्तूंचे आकर्षक असते. त्यामुळे ते अशा वस्तूच खरेदी करतात. तीच आवड मुलांकडे संक्रमित होते. ‘ब्रॅण्डेड म्हणजे चांगलेच’ हा विचार पालकांनी डोक्यातून काढून टाकावा. या वस्तूंसाठी मोजलेली अधिकची किंमत ही जाहिरात खर्च आणि कंपनीच्या मोठ्या नफ्याचा आपला वाटा असतो. दर्जेदार वस्तू वाजवी भावात कशा आणि कुठे मिळतात याचा सातत्याने शोध घ्यावा. पालक जर असा शोध घेतील, तर मुलांनाही तशी सवय लागेल.
  • आपले राहणीमान हे बचत, गुंतवणूक आणि जोखीम व्यवस्थापन यावर कसे अवलंबून आहे ते स्वतः जाणून घ्या. मुलांना सोप्या शब्दांत समजावून द्या. महागाई ही संकल्पना त्यांना समजावून द्या. यातही भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर कार्टून चित्रमालिका आहे त्याचा योग्य वापर करता येईल.
  • मुलांचे हट्ट पुरवणं आणि त्यांचे कौतुक करणं आपण वेगळ्या पद्धतीने कसे करू याचा सातत्याने विचार करा. गरज आणि आवश्यकता यातील फरक समजून द्या. ती जाणती झाल्यावर या गोष्टी कायम त्यांना आठवतील.
  • आर्थिक घडामोडींची माहिती देणारे वृतांत दिवसभरातून काही काळ का होईना. नेहमीच्या रटाळ मालिका अनेक चुकीच्या गोष्टी ठसवत असतात, त्या पाहणे टाळा.
  • श्रीमंत असणं आणि श्रीमंत दिसणं यातील फरक समजून सांगा. केवळ ज्ञान आणि त्याचा सुयोग्य वापर यामुळेच व्यक्ती श्रीमंत होऊ शकते हे जाणून अधिकाधिक ज्ञान मिळावीत राहा. या यादीत भर टाकता येईल. बालदिनाच्या सर्व बालकांना आणि त्यांच्या पालकांना आपली आर्थिक स्वप्न साकारण्यासाठी शुभेच्छा.

-उदय पिंगळे

Recent Posts

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

1 hour ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

2 hours ago

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

2 hours ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

4 hours ago