Saturday, August 30, 2025

दत्तजयंतीचा उपदेश

दत्तजयंतीचा उपदेश

संत साईबाबा हे ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजे प्रेमळ त्रिमूर्ती दत्तात्रयाचे अवतार होते. ज्यांनी साईबाबांना पाहिले, त्यांची सेवाभक्ती केली, त्यांचे त्रिविध ताप नष्ट झाले. ते सर्व भक्त संसारी वर्तत असतानाही भक्तियोगे मुक्त झाले म्हणूनच श्रीबाबांच्या तेजःप्रताप साद्यंत वर्णन करणे कदापी शक्य नाही. श्रीबाबांच्या मुखातून प्रकट झालेल्या सरळ साध्या उपदेशपर कथा ऐकून कित्येक नास्तिक आस्तिक झाले. कित्येकांनी परमार्थाला वाहून घेतले, तर कित्येकांच्या कोट्यवधी पातकांचे क्षालन होऊन त्यांचा उद्धार झाला. म्हणून आजही ज्या कोणाला या जन्ममरणांच्या यातायातीमधून सुटका व्हावी असे मनापासून वाटते त्याने श्रीबाबांची भक्ती करावी, त्यांची पदासक्ती जोडावी, त्यांच्या उपदेशपर वचनांना अनुसरून वागावे आणि सर्वार्थाने सर्वसाक्षी, सर्वव्याप्त व सर्वांतर्यामी बसलेल्या सर्व समर्थ श्रीबाबांनाच अनन्य शरण जावे.

श्रीबाबांनी आपल्या आयुष्यात केव्हाही हा आपला तो परका, हा मोठा, तो लहान, हा उच्च, तो नीच, हा प्रिय तो अप्रिय असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव कधीही केला नाही. ते सर्वांना समानतेने वागवायचे; प्रत्येकाची सुखदुःखे, अडीअडचणी समजून घ्यायचे आणि ज्यायोगे त्याचे कल्याणच होईल असाच हितोपदेश करायचे. श्रीबाबा म्हणजे चालते-बोलते परमेश्वर होते. खडीसाखरेचा खडा कोठूनही चाखला तरी गोडच लागतो, त्याप्रमाणे श्रीबाबांची भक्ती कशीही केली तरी ती भक्तास पावनच करते आणि जसजशी भक्तीची गोडी वाढते तसतशी अंतःकरणातील प्रसन्नता वाढत जाते. श्रीबाबांच्या भक्तांना याचा प्रत्यही अनुभव येतो. जो साईबाबांना शरण जातो त्याची वृत्तीच साईमय होऊन जाते आणि त्याचा संसारबंध साईबाबा स्वामी समर्थ व गुरुदत्तात्रयांचे आधुनिक अवतार होते, असे भक्त मानतात. म्हणून दत्त जयंतीही शिर्डीला व साईबाबांच्या भक्तांकडे व देवळात जोरात साजरी होते.

-विलास खानोलकर

Comments
Add Comment