
मुंबई : ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर (Mohandas Sukhtankar) यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते दीर्घआजाराने त्रस्त होते.
रायगडाला जेव्हा जाग येते, लेकुरे उदंड झाली, अखेरचा सवाल, दुर्गा, स्पर्श, आभाळाचे रंग आणि मस्त्यगंधा या नाटकांमध्ये त्यांमी काम केलं. नाटकांप्रमाणेच त्यांनी ‘कैवारी’, ‘जावई माझा भला’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘थोरली जाऊ’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘जन्मदाता’, ‘पोरका’, ‘प्रेमांकुर’, ‘निवडुंग’ या मराठी चित्रपटांतही काम केले आहे.
मोहनदास श्रीपाद सुखटणकर यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३० रोजी झाला. त्यांचे वडील श्रीपाद सुखटणकर हे गोव्याचे नामांकित डॉक्टर होते. सामाजिक कार्य म्हणूनच त्यांनी वैद्यकीय सेवा केली. त्यांची आईही स्वतंत्र विचारांची होती.
मोहनदास यांनी गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून दीर्घकाळ नाट्यसेवा केली. तसेच त्यांच्या नाट्य प्रवासात ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’ला महत्त्वाचे स्थान आहे. या संस्थेत अगोदर त्यांनी कलाकार म्हणून प्रवेश केला आणि नंतर ते ‘कार्यकर्ता’ भूमिकेत वावरले.