Friday, May 9, 2025

रायगड

Underage driver : अल्पवयीन मुलांकडून गाडी चालविण्याच्या प्रमाणात वाढ

Underage driver : अल्पवयीन मुलांकडून गाडी चालविण्याच्या प्रमाणात वाढ

श्रीकांत नांदगावकर


तळा : तळा शहरात अल्पवयीन मुलांचे (Underage driver) दुचाकी चालवण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे भर बाजारपेठेतून धुमस्टाईलने सदर मुले गाडी पळवीत असल्याने अपघात घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.


गेल्या काही दिवसांपासून तळा शहरातील प्रमुख रस्त्यांवर अल्पवयीन मुले सुसाट वेगाने दुचाकी चालवताना पहायला मिळत आहेत. बऱ्याचवेळा ही मुले ट्रिपल सीटसुद्धा गाडी चालवताना दिसतात.अशावेळी अनावधानाने एखादा अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.


तळा बाजारपेठेत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये तसेच अल्पवयीन दुचाकी स्वारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसाची नेमणूक करण्यात आली होती. परंतु गेली कित्येक दिवस तळा शहरात वाहतूक पोलीस निदर्शनास आले नसल्याने वाहतूक पोलीस आहेत तरी कोठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वाहतूक पोलीस नसल्याचा फायदा घेत अल्पवयीन मुले शहरातील महाविद्यालयीन रस्त्यावर बेभान होऊन ट्रिपल सीट घेऊन दुचाकी पळवीतात.


त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थीनी, लहान मुलांसह त्यांच्या पालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. अशावेळी वाहतूक पोलीस त्या ठिकाणी उपस्थित असल्यास अल्पवयीन मुलांचे गाडी चालविण्याचे प्रमाण नक्कीच कमी होईल. दुसरीकडे आपल्या पाल्ल्याचे गाडी चालविण्याचे वय पूर्ण झालेले नसताना पालक त्यांच्या हातात वाहने देतातच कशी, हा एक प्रश्न निर्माण झाला आहे.


मुलाने हट्ट धरला म्हणून लहान वयातच त्याच्या हातात मोटारसायकल देणारे पालक मुलाकडून अपघात घडल्यानंतर डोक्याला हात मारून घेत नशिबाला दोष देतात. त्यामुळे पालकांनी देखील आपल्या मुलांचे नको ते हट्ट पुरविण्यापेक्षा त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीकडे लक्ष केंद्रित केले तर त्याला जीवनात प्रगती साधता येईल.

Comments
Add Comment