Sunday, July 14, 2024
Homeक्रीडाVijay Hazare Trophy : ऋतुराज षटकारांचा बादशहा

Vijay Hazare Trophy : ऋतुराज षटकारांचा बादशहा

एका षटकात ठोकले ७ षटकार; विजय हजारे ट्रॉफी

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने सोमवारी फलंदाजीत रुद्रावतार दाखवत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या ऋतुराजने उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात एका षटकात अशक्यप्राय असे सात षटकार ठोकले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

ऋतुराज गायकवाडच्या या एकाकी लढतीच्या जोरावर उपउपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशला ५८ धावांनी पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपउपांत्य फेरीच्या या सामन्यात कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाबाद २२० धावा तडकावत महाराष्ट्राच्या विजयात चमकदार कामगिरी केली.

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यातील सामन्यात शिवा सिंगच्या षटकात ऋतुराजने ७ षटकार लगावले. षटकात एक नो चेंडू होता. त्यामुळे हे षटक सात चेंडूंचे झाले. या सातही चेंडूंवर गायकवाडने षटकार ठोकण्याची कामगिरी केली. महाराष्ट्राच्या डावाच्या ४९व्या षटकात गायकवाडने हा पराक्रम केला. ऋतुराजने एका षटकात एकूण ४३ धावा केल्या. या डावात त्याने १५९ चेंडूंत २२० धावा केल्या. गायकवाडने या खेळीत १० चौकार आणि १६ षटकार मारले.

गायकवाडच्या या खेळीमुळे महाराष्ट्राने ५० षटकांत पाच गडी गमावून ३३० धावा केल्या. गायकवाडशिवाय महाराष्ट्राच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला अर्धशतकही करता आले नाही. या स्पर्धेतील शेवटच्या ८ डावांमधील ऋतुराजचे हे सहावे शतक आहे. अंकित बावणे आणि अझीम काझी यांनी प्रत्येकी ३७ धावांची खेळी केली. उत्तर प्रदेशकडून वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीने ६६ धावांत सर्वाधिक तीन बळी मिळवले.

न्यूझीलंडमध्येही ठोकल्या होत्या ४३ धावा

एका षटकात ४३ धावा झाल्याची लिस्ट ए क्रिकेटमधली ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०१८-१९ मध्ये न्यूझीलंडच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये असे घडले होते. सेंट्रल डिस्ट्रिक्टचा गोलंदाज विलेम लुडिकने एका षटकात ४३ धावा दिल्या. त्या षटकात लुडिकने दोन नो-बॉल टाकले आणि नॉर्दर्न डिस्ट्रिक्टचे फलंदाज जो कार्टर आणि ब्रेट हॅम्प्टन यांनी मिळून सहा षटकार ठोकले. त्या षटकात १ चौकार आणि १ सिंगल धावही झाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -