विक्रमच्या जाण्याने माझी वैयक्तिक हानी झाली आहे. तो फक्त माझा सहकलाकार किंवा नायक नव्हता, तर तो माझ्या कुटुंबातलाच एक होता. तो मला ‘बेबी’ म्हणायचा. अगदी शेवटपर्यंत तो मला ‘बेबी’ याच नावाने हाक मारायचा. विक्रम गेल्यामुळे ‘बेबी’ ही त्याची आपलेपणाची हाक आता पुन्हा ऐकू येणार नाही. विक्रम एक महान कलाकार होता. अभिनय त्याच्या रक्तात भिनला होता. तो भूमिकेत खऱ्या अर्थाने शिरायचा. त्याच्या रूपाते एक उमदा आणि प्रसन्नचित्त कलाकार आपल्यातून निघून गेला आहे.
विक्रमच्या तब्बेतीत सतत चढउतार होत असताना तो उपचारांना प्रतिसाद देत असल्याची बातमी आली आणि जीव भांड्यात पडला. विक्रम बरा होईल आणि पुन्हा कामाला लागेल, अशी आस वाटत असतानाच त्याच्या निधनाचं वृत्त आलं. त्याचं जाणं खरंच खूप धक्कादायक आहे. माझं आणि विक्रमचं जिव्हाळ्याचं नातं होतं. आमचे कौटुंबिक ऋणानुबंध होते. आम्ही अनेक नाटकांमध्ये, चित्रपटांमध्ये एकत्र कामं केली. चित्रपट, नाटकांमध्ये तो माझा नायक असायचा. चित्रपटसृष्टीत येण्याआधीपासूनची आमची ओळख. माझा भाऊ अनिल काळे आणि विक्रम गोखले पुण्याच्या एमईएस महाविद्यालयात एकत्र शिकत होते. त्यावेळी मी अभिनयक्षेत्रात आले नव्हते. अनिल माझा मोठा भाऊ. विक्रम त्याच्याबरोबरचा. त्यावेळी आम्ही पुण्यात राहात होतो. भावाचा मित्र असल्यामुळे विक्रम आमच्या घरी यायचा. बेबी हे माझं टोपणनाव होतं. त्यामुळे घरातले मला याच नावाने हाक मारायचे.
त्यामुळे विक्रमही मला बेबीच म्हणायचा. कलाक्षेत्रात एकत्र काम करू लागल्यानंतरही तो मला बेबी याच नावाने हाक मारायचा आणि यामुळेच तो मला अगदी घरचा वाटायचा. माझे आई-वडील, भाऊ, मामा, मावशा सगळे एक एक करून सोडून गेले. पण विक्रमने बेबी अशी साद घातली की, ही माझी गेलेली माणसं माझ्या जवळच असल्यासारखं वाटायचं. असंच एका भेटीत त्याने बेबी, कशी आहेस? असं अगदी दिलखुलासपणे विचारलं होतं. प्रत्येक भेटीत तो माझ्याशी अगदी भरभरून गप्पा मारायचा. मी अभिनेत्री झाले, कलाकार झाले तरी मला बेबी म्हणणारा आज या जगातून कायमचा निघून गेला आहे. ही माझ्यासाठी खरंच खूप मोठी पोकळी आहे. विक्रमच्या जाण्याने आता माझं असं कुणीच राहिलं नाही, असं वाटतंय.
एक कलाकार, अभिनेता म्हणून तो महान होता, जबरदस्त होता. त्याच्याबरोबर काम करताना जो आनंद मिळाला तो शब्दांत मांडता येणार नाही. ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकात तो माझा नायक होता. त्यातल्या आमच्या भूमिका खूप गाजल्या. ते नाटकही खूप गाजलं. त्या नाटकाचे ९०० प्रयोग मी केले. त्या काळात दूरदर्शन नव्हतं. तो १९६८-६९ चा काळ असावा. विक्रमबद्दल सांगायचं तर तो खूप मोठा कलाकार होता. त्याची संवादफेक, शब्दोच्चार सगळंच भन्नाट होतं. विक्रम गोखले पॉज हे काहीतरी वेगळंच रसायन होतं. त्याच्यासारखं पॉज घेणं कुणालाही जमणार नाही. एक वाक्य बोलल्यानंतर घेतलेल्या पॉजमधूनच तो बरंच काही सांगून जायचा. विक्रम जेवढा चांगला कलाकार होता तेवढाच माणूस म्हणून ग्रेट होता. आमचे कौटुंबिक संबंध होते. त्याचं आमच्या घरी येणं, आई-वडिलांसोबत गप्पा मारणं हे सगळंच वेगळं होतं. तो भावासोबत आमच्या घरी यायचा. मग भाऊ मला बेबी, पाणी आण गं असं म्हणायचा. त्यावेळी मी कुणीच नव्हते. नृत्य शिकणं, शाळेत जाणं असं माझं सुरू होतं. त्यामुळे अन्याची बहीण हीच त्याच्यासाठी माझी ओळख होती. माझं शिक्षण लवकर संपलं म्हणून मी विक्रमच्या आधी रंगभूमीवर आले. पण माझ्या मागावून कला क्षेत्रात येऊनही विक्रम अभिनयात खूप पुढे गेला. तो अभिनय सम्राट झाला. अभिनय त्याच्या रक्तात होता. अभिनयापुढे त्याला काहीच सुचायचं नाही. अभिनय एके अभिनय हेच त्याचं आयुष्य होतं. आजच्या भाषेत म्हणतात ना की, इट सिनेमा, ड्रीम सिनेमा, लिव्ह सिनेमा, तसंच त्याचं होतं. त्याच्या रोमारोमांत फक्त अभिनय होता, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्याचं घराणंही खूप मोठं. मला एका चित्रपटात चंद्रकांत गोखलेंसोबत काम करण्याची संधी लाभली.
विक्रमने त्याच्या कारकिर्दीत अनेकविध भूमिका साकारल्या. आज तो गेला असला तरी अभिनयाचं संचित मागे ठेवून गेला आहे. त्याच्याकडून शिकण्यासारखं, घेण्यासारखं बरंच काही आहे. त्याने अनेक नाटकं गाजवली. मराठी, हिंदी चित्रपट गाजवले. त्याचं बॅरिस्टर हे नाटक म्हणजे अभिनयाचा उत्तम नमुनाच. विक्रमचा अभिनय नव्या पिढीतल्या तरुणांसाठी अभ्यासाचा विषय ठरावा. विक्रम म्हणजे अभिनयाचं चालतं-बोलतं विद्यापीठच! विक्रम कायम मेहनतीला तयार असायचा. आजवर त्याने जे काही कमावलं ते सगळं मेहनतीच्या बळावर. त्याची मेहनत बघण्याची संधी मला मिळाली. चित्रपटांच्या संहिता असो, संवाद असो, तो या सगळ्यांचा अक्षरश: किस पाडायचा. तो अजिबात कंटाळायचा नाही. तो प्रत्येक भूमिकेत स्वत:ला सामावून घ्यायचा. त्याची कोणतीही भूमिका बघितली तरी तो विक्रम गोखले वाटायचा नाही. तो ती व्यक्तिरेखाच वाटायचा. ते भूमिकेत शिरणं असं म्हणतात ना, ते विक्रम करायचा. तो भूमिकेत शिरायचा.
तो रंगमंचावर गेला किंवा कॅमेरा त्याच्यासमोर आला की, तो विक्रम नसायचाच तो ती भूमिकाच होऊन जायचा आणि हेच त्याचं मोठेपण होतं. अरे तू कसं करतो रे हे सगळं, असं मी त्याला विचारायचे. त्यावर ‘अगं काय सांगू मी बेबी तुला, कसं करतो म्हणजे काय?’ असं तो म्हणायचा. विक्रम एक अवलिया कलावंत होता. त्याने बरंच काम करून ठेवलं आहे. तो बरंच काय काय करायचा. तो एक सच्चा कलावंत आणि माणूस होता. त्याने समाजकार्यही केलं. मात्र कधीही दिखाऊपणा केला नाही. तो मनाने खूप चांगला होता. त्याचं रागावणंही खरं असायचं. त्याच्या बोलण्यात तळमळ जाणवायची. तो अगदी आतून बोलतोय, हे कळायचं. विक्रम उगीचच चिडत नव्हता. उगाचच चिडायचं, आरडाओरडा करायचा, मी कुणीतरी मोठा माणूस आहे हे दाखवून द्यायचं असं त्याने कधी केलंच नाही. त्याने काही मागितलं नाही तर त्याला सगळं मिळत गेलं. आमच्या सतत गाठीभेटी व्हायच्या. कौटुंबिक पातळीवरही आमच्या गाठीभेटी व्हायच्या. त्यावेळी अरे, कशी आहेस तू बेबी, कुठे आहेस तू बेबी, काय चाललंय तुझं, असं तो अगदी आपुलकीने विचारायचा. तो खूप निर्मळ मनाचा होता. त्याच्या बोलण्यात कायम आपलेपणा जाणवायचा. तो आला की वातावरण अगदी प्रसन्न करून जायचे. म्हणूनच त्याचं जाणं ही माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे. माझ्या कुटुंबातलंच कोणीतरी गेलंय, असं मला वाटतंय. तो गेला आणि ती प्रसन्नताही संपली.
मी त्याच्यासोबत काम केलंय. बराच काळ घालवला आहे. तेव्हाचा काळ शांततेचा असला तरी नाटकाच्या निमित्ताने बरेच दौरे असायचे. संपदेचे, गोवा हिंदू असोसिएशनचे, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ असे अनेक दौरे आम्ही केले. आम्ही खूप फिरायचो. त्यामुळे नाटकातले कलाकार म्हणजे दुसरं कुटुंबच होऊन जायचं. आम्ही घरी यायचो ते फक्त चार-पाच दिवसांसाठी. बाकी दौऱ्याच्या निमित्ताने सर्व कलाकार एकत्रच असायचो. त्यामुळे अर्थातच जिव्हाळ्याचं, आपलेपणाचं नातं निर्माण व्हायचं. मध्यंतरी बालगंधर्वला एक कार्यक्रम होता. त्यावेळी जॅकी श्रॉफ पण आला होता. मीही गेले होते. अजूनही बरीच मंडळी होती. विक्रमही होता. विक्रम रंगमंचावर भाषणासाठी उभा राहिला होता. भाषणादरम्यान त्याने जॅकी श्रॉफचा उल्लेख केला. तसंच अन्य कलावंतांचीही नावं घेतली त्याने. प्रत्येक नावाला टाळ्या पडल्या. माझंही नाव घेतलं. म्हणाला, माझी नायिका आलीये. बेबी इथे आलेली आहे. बेबी म्हटल्यावर कोण टाळ्या वाजवणार? मग त्याने त्याचा तो जगप्रसिद्ध पॉज घेतला आणि म्हणाला, बेबी म्हणजे, प्रसिद्ध अभिनेत्री आशा काळे! असं त्याच्या स्टाईलमध्ये तो बोलला आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या. मी तिला बेबी म्हणतो, असं त्याने त्या जाहीर कार्यक्रमात सांगून टाकलं. त्याचं जाणं हे माझ्यासाठी वैयक्तिक पातळीवरचं दु:ख तर आहेच शिवाय एक महान कलाकार गेला याचंही मला खूप दु:ख वाटत आहे.
विक्रम गेल्यामुळे कुठेतरी आत, खोलवर काहीतरी गमावल्याची जाणीव बळावली आहे. खरंच खूप दु:ख होतंय. या आठवणी जागवताना सातत्याने त्याचा चेहरा समोर येतोय. तो गेल्याचं कळल्यानंतर एक वेगळीच अस्वस्थता जाणवते आहे. विक्रमच्या रूपात माझ्या घरातला, आपला माणूस गेला आहे. आता ‘बेबी’ ही हाक पुन्हा ऐकू येणार नाही, याचं शल्य वाटतंय.
-आशा काळे