पुणे : हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू, देखणे आणि रुबाबदार अभिनेते म्हणून प्रसिद्ध असणारे जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे वयाच्या ७७व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने रसिकांना मोठा धक्का बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात भरती असलेले प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती पुन्हा खालावल्याचे रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी यांनी आज शनिवारी सकाळी माहिती दिली होती.
तर काल शुक्रवारी रुग्णालयाकडून दिलेल्या माहितीनुसार गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले होते. तसेच त्यांनी डोळे उघडले आणि हात-पाय हलवल्याचेही बोलले जात होते. तसेच ४८ तासांमध्ये त्यांना व्हेंटिलेटरवरून हटवण्यात येईल, असेही सांगितले होते.
३० ऑक्टोबर १९४५ रोजी जन्मलेले विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या कुटुंबातूनच मिळाला. त्यांच्या पणजी दुर्गबाई कामत, आजी कमलाबाई गोखले आणि वडील चंद्रकांत गोखले अशा त्यांच्या तीन पिढ्या अभिनय क्षेत्रात कार्यरत होत्या. त्यांचे वडील चंद्रकांत गोखले हे सुद्दा हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. जवळपास ७० हुन अधिक चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या होत्या. त्यांच्या वडिलांकडूनच त्यांना अभिनयाचे बाळकडू मिळाले होते.
लहान वयातच त्यांनी बाल कलाकार म्हणून काही नाटकात भूमिका केल्या. नाटकात येण्यापूर्वी त्यांनी विजया मेहता यांच्याकडून अभिनयाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले होते.
त्यांनी भूमिका केलेले बॅरिस्टर हे नाटक त्या काळात खूप गाजले. या भूमिकेद्वारे मराठी रंगभूमीला एक उमदा अभिनेता लाभला ज्याने पुढे अनेक दशके मराठी रंगभूमीवर अधिराज्य गाजवले.
आधारस्तंभ, आम्ही बोलतो मराठी, कळत नकळत, ज्योतिबाचा नवस, दरोडेखोर, दुसरी गोष्ट, नटसम्राट, भिंगरी, महानंदा, माहेरची साडी, लपंडाव, वजीर, व-हाडी आणि वाजंत्री, वासुदेव बळवंत फडके हे त्याचे मराठी चित्रपट गाजले.
एखादी तरी स्मितरेषा, कथा, कमला, कल्पवृक्ष, कन्येसाठी, के दिल अभि भरा नही, खरं सांगायचं तर, छुपे रुस्तम, जावई माझा भला, दुसरा सामना, नकळत सारे घडले, पुत्र मानवाचा, बॅरिस्टर, मकरंद राजाध्यक्ष, महासागर, मी माझ्या मुलांचा, संकेत मिलनाचा, सरगम स्वामी ही त्यांनी भूमिका केलेली नाटके खूप गाजली.
त्यांना जी भूमिका मिळत त्या भूमिकेचा आधी ते बारकाईने अभ्यास करीत आणि आपल्या आकलन आणि निरीक्षण शक्तीच्या जोरावर त्या भूमिकेवर आपला ठसा उमटवित. केवळ नाटकातच नव्हे तर चित्रपट असो वा दूरचित्रवाणीवरील मालिका प्रत्येक भूमिका स्वीकारताना ते हीच पद्धत वापरत म्हणूनच त्यांनी केलेल्या भूमिका रसिकांच्या मनात कोरल्या जात. मग ती माहेरच्या साडीतील कठोर मनाच्या वडिलांची भूमिका असोत की अग्निपथमधील हळव्या मनाच्या जेलरची भूमिका असो. आपल्याला मिळालेल्या भूमिकेची लांबीपेक्षा खोली किती मोठी आहे हे ते पाहत. त्यामुळेच त्यांचा लहान लहान भूमिका देखील रसिकांच्या लक्षात राहिल्या.
नाटक आणि चित्रपटात त्यांनी केलेल्या भूमिकेप्रमाणेच टीव्ही मालिकेत त्यांनी केलेल्या भूमिका देखील गाजल्या. टीव्हीवरील अग्निहोत्र या मालिकेत त्यांनी साकारलेले मोरेश्वर अग्निहोत्र हे पात्र आजही रसिकांच्या मनात घर करून गेले आहे. याशिवाय अकबर बिरबल, अल्पविराम, उडाण, कुछ खोया कुछ पाया, जीवनसाथी, द्विधाता, या सुखांनो या, इत्यादी मालिकेतील त्यांच्या भूमिका रसिकांना भावल्या.
हम दिल दे चुके सनम, भूल भुलैय्या, मिशन मंगल, अग्निपथ, दिल से अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या.
चित्रपट सृष्टीतील त्यांनी केलेल्या भूमिकेसोबतच त्यांनी केलेले सामाजिक कार्य देखील मोठे आहे. आपली आजी कमलाबाई गोखले यांच्या नावे त्यांनी चॅरिटेबल ट्रस्ट उभारला आहे. त्या ट्रस्टच्या माध्यमातून अपंग सैनिक आणि समाजातील उपेक्षितांसाठी त्यांनी मोठे काम केले आहे. कलाकारांना उतार वयात हक्काचे व्यासपीठ असावे या उद्देशाने दोन एकर जमीन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दान केली आहे.
विक्रम गोखले यांना त्यांच्या अभिनय कलेसाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमात भूमिका करून आपल्या अभिनयाचे रसिकांवर गारुड निर्माण करणारा हा श्रेष्ठ नट असा अकाली निघून गेल्याने चित्रपट सृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीचे जे नुकसान झाले ते कधीही भरून निघणारे नाही. त्यांच्या निधनाने एक श्रेष्ठ, अष्टपैलू कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…