Monday, July 22, 2024
Homeअध्यात्मप्रतिभा ज्ञान

प्रतिभा ज्ञान

काही दिवसांपूर्वी टीव्हीवर एक लहान मुलाला तबला वाजवताना पाहिलं तो मृदंग आणि इतर कितीतरी वाद्ये सहज वाजवत होता. त्याची बोटे किती लहान पण मोठ्या तबलजीसारखे वाजवत होता. त्याच्या देहबोलीतून ते दिसत होते. हे आले कुठूनÆ तो एवढ्या लहानपणी कुठे शिकायला गेला होता. लोकमान्य टिळकांना बालगंधर्वांचे कलागुण लहानपणीच दिसले. त्यांचे खरे नाव नारायण राजहंस असे होते. लोकमान्य टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी दिली. पण हे मी सांगतो आहे, कारण हा “प्रतिभा ज्ञान” असा ज्ञानाचा एक प्रकार आहे. आपल्याला जर साक्षात्कार करून घ्यायचा असेल, तर साक्षात्कार हा प्रतिभा ज्ञानलाच होतो. प्रतिभा ज्ञान ही देणगी पण त्याच्यापाठीमागे पुण्याई लागते. गाठी व पाठी पुण्याई असण्यासाठी आपले कर्म चांगले पाहिजे.

कर्म चांगले केले की, संचितात पुण्याई जमा होते. रामदास स्वामींनी संचित हा शब्द बरोबर वापरला. “मनात्वाची रे पुर्वसंचित केले” हे संचित जे आहे ते फार महत्त्वाचे आहे. प्रतिभा ज्ञान हे संचितातून येते व संचितात पुण्य असावे लागते व त्यासाठी चांगले कर्म करावे लागते. शेवटी कर्म श्रेष्ठ. आपण जे कर्म करतो, त्यातून पुण्य निर्माण होते व पुण्य जितके जास्त, तितके ते तुम्हांला प्रतिभेकडे घेऊन जाईल. या सगळ्या गोष्टी नीट समजून घेतल्या, तर परमार्थात घोटाळा होणार नाही. या सर्व गोष्टींचा संबंध आपल्या जीवनाशी आहे. बाकीचे काय सांगतात, संसार सोडा व परमार्थ करा. जीवनविद्या सांगते की, परमार्थाचा संबंध आपल्या जीवनाशी आहे. जीवनविद्या सांगते संसारच असा करा की, त्यातून परमार्थ निर्माण झाला पाहिजे. निराळा परमार्थ करायला नको. संसारच असा करायचा की, त्यातून परमार्थ निर्माण करायचा, याला जीवनविद्या म्हणतात. झोपेतून जागृती व जागृतीतून झोप येते, तसे हे आहे. परमार्थाचे कमळ हे संसाराच्या कळीतून उमलले पाहिजे. यांत पुन्हा कर्मच सर्वांत श्रेष्ठ. “प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ” असे आम्ही म्हणतो त्याचे कारण हेच आहे.

पुण्य हे सत्कर्मातून येते, तर दुष्कर्मातून पाप येते. सत्कर्म करीत गेले की पुण्य वाढत वाढत जाते. हे पुण्य वाढत वाढत गेले की, आपण पुण्याचा क्षयही करत असतो. बायकोला रागवलो की, पुण्याचा क्षय झाला. आपण लोकांची निंदा केली की, पुण्याचा क्षय झाला, हे लोकांना कळत नाही. पुण्य जितके मिळविता येईल, तितके मिळविले पाहिजे. यासाठी जीवनविद्या काय सांगते, ‘शुभ चिंतावे शुभ इच्छावे वचनी शुभ बोलावे’, शुभ कर्मांच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे जीवनविद्या जे सांगते त्या सर्वांचा संबंध परमेश्वरापर्यंत जातो. म्हणूनच परमेश्वर हे जीवनाचे मूळ आहे व तेच आपल्या जीवनाचे फळही आहे.

– सद्गुरू वामनराव पै

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -