Tuesday, July 23, 2024
Homeदेशmouth disorder : जगातील निम्मी लोकसंख्या तोंडाच्या विकाराने त्रस्त

mouth disorder : जगातील निम्मी लोकसंख्या तोंडाच्या विकाराने त्रस्त

जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातील जवळपास निम्मी लोकसंख्या (mouth disorder) तोंडाच्या आजाराने (किडलेले दात, हिरड्या आणि तोंडाचा कर्करोग) ग्रस्त आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

‘ओरल हेल्थ सर्व्हिस’पर्यंत पोहोचण्यासाठी असलेली असमानता एका अहवालात अधोरेखित करण्यात आली आहे. सर्वात कमकुवत आणि वंचित लोकसंख्येवर या आजारांचा वाईट परिणाम झाला असल्याची माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्यामध्ये ओरल म्हणजेच मौखिक आरोग्याकडे बऱ्याच काळापासून दुर्लक्ष केले जात आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडनोम घेब्रेसेयसस यांनी नमूद केले. तोंडाचे अनेक आजार रोखणे आणि त्यांच्यावर उपचार करणे शक्य आहे, असे टेड्रोस यांनी स्पष्ट केले.

संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेला आढळले आहे की, जागतिक लोकसंख्येपैकी ४५ टक्के किंवा सुमारे ३.५ अब्ज लोक दात किडणे, हिरड्यांचे रोग आणि तोंडाच्या इतर व्याधींमुळे ग्रस्त आहेत. १९४ देशांमधल्या परिस्थितीच्या व्यापक चित्रात आढळून आले की गेल्या ३० वर्षांमध्ये (तोंडाच्या आजारांनी ग्रस्त असलेली) जागतिक रुग्णसंख्या एक अब्जाने वाढली आहे. बऱ्याच लोकांपर्यंत तोंडाचे आजार रोखण्याचे उपाय अद्याप पोहोचलेले नाहीत. हा या गोष्टीचा स्पष्ट संकेत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

दंत क्षय, दात किडणे, हिरड्यांचा गंभीर आजार, दातांची हानी होणे आणि तोंडाचा कर्करोग हे सर्वात सामान्य आजार आहेत. उपचार न केलेले दंत क्षय (दातांवर बॅक्टेरियाचा हल्ला होणे) ही रुग्णांमधली सर्वात सामान्य स्थिती असून जगभरातले सुमारे २.५ अब्ज लोक यामुळे प्रभावित झाले आहेत. हिरड्यांचा तीव्र आजार हे दातांचे अपरिमित नुकसान होण्यामागचे प्रमुख कारण असून त्यामुळे सुमारे एक अब्ज नागरिक प्रभावित झाल्याचा अंदाज आहे. दर वर्षी तोंडाच्या कर्करोगाच्या तीन लाख ऐंशी हजार प्रकरणांचे निदान होते.

तोंडाचा आजार असलेले तीन चतुर्थांश लोक हे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधले आहेत, अशी माहिती अहवालातून समोर आली आहे. सर्व देशांमध्ये कमी उत्पन्न असलेले, अपंग, एकटे किंवा वृद्धाश्रमात राहणारे नागरिक, तसेच दुर्गम भागात, ग्रामीण समुदायात अथवा अल्पसंख्यांक समूहात राहणारे लोक हे तोंडाच्या आजाराने अधिक ग्रस्त आहेत.

FIFA World Cup 2022 : मोरक्कोने क्रोएशियाला गोलशून्य बरोबरीत रोखले!

कर्करोग, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि मधुमेह यासारख्या इतर असंसर्गजन्य रोगांसारखेच हे पॅटर्न आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. साखरेचे अधिक सेवन करणे, तंबाखूचे सेवन करणे आणि मद्यपान करणे, त्याचा गैरवापर करणे हे जोखमीचे घटकदेखील समान आहेत. या आजारांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज असल्याचे सांगण्यात आले. यामुळे कुटुंब आणि समाजावर आर्थिक बोजा वाढू शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -