
मुंबई : महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या ४० गावांवर दावा (Boundary question) करणार असल्याचे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले आहे. त्यामुळे नवा वाद पेटला आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही एकही गाव देणार नाही. उलट बेळगाव, कारवार, निपाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करू, असे सडेतोड उत्तर दिले आहे.
सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या ४० गावांनी आम्हाला कर्नाटकमध्ये घ्या, असा ठराव २०१२ मध्ये केला होता. पाणीप्रश्नाला कंटाळून या गावांनी हे टोकाचे पाऊल उचलले होते. या ठरावाचा आम्ही आता गांभीर्याने विचार करत आहोत. सांगली जिल्ह्यातल्या या ४० गावांवर दावा सांगणार आहोत, असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी दिला आहे.
बोमई यांच्या दाव्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातले एकही गाव कुठेही जाणार नाही. उलट आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढू आणि बेळगाव, निपाणी, कारगाव ही गावे मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
फडणीस पुढे म्हणाले की, या गावांनी नव्याने कुठलाही ठराव केला नाही. त्यांनी २०१२ मध्ये आम्हाला पाणी मिळत नाही, असा ठराव केला होता. त्यानंतर आमचे सरकार आल्यानंतर म्हैसाळ सुधारित योजनेला निधी देण्याचा निर्णय घेतला. आता तात्काळ मान्यता देणार आहोत. तिथे पाणी पोहचणार आहे. सीमावादाच्या प्रश्नावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी याप्रकरणी एक ट्विट केले आहे. ते म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कर्नाटकच्या याच मुख्यमंत्री महाशयांची हिंमत आता थेट #जत तालुक्यातील गावांवर दावा सांगण्यापर्यंत गेली आहे. एकीकडे सीमा भागाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असताना दुसरीकडे आपले सरकार मात्र कर्नाटक सरकारच्या या नव्या भूमिकेबाबत शांत आहे.
रोहित पवार पुढे म्हणतात की, दोनच दिवसांपूर्वी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आपण अभिवादन केले आणि आज कर्नाटक आपल्या गावांवर डोळा ठेवतो, हे संतापजनक आहे. गुजरात आपले प्रकल्प पळवून युवांचे भविष्य चिरडतोय, कर्नाटक गावांवर डोळा ठेवतोय आणि आपल्या सरकारचा मात्र डोळा लागला, याची खंत वाटते.