Sunday, June 15, 2025

Table Tennis : मनिका बत्राची ऐतिहासिक कांस्य कमाई

Table Tennis : मनिका बत्राची ऐतिहासिक कांस्य कमाई

बँकॉक (वृत्तसंस्था) : आशियाई कप टेबल टेनिस (Table Tennis) चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या मनिका बत्राने कांस्यपदक जिंकत इतिहास रचला आहे. या स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.


शनिवारी सकाळी चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीतील सामना हरल्यानंतर मनिकाने कांस्य पदकाच्या सामन्यात जोरदार पुनरागमन केले आणि देशाला पदक मिळवून दिले. बँकॉकमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात मनिकाने जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेली आणि तीन वेळा आशियाई चषक विजेती हिना हयातचा ४-२ असा पराभव केला.


तत्पूर्वी, तिला उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित जपानी खेळाडू मीमा इटोकडून ८-११, ११-७, ७-११, ६-११, ११-८, ७-११ (२-४) असा पराभव पत्करावा लागला होता. उपांत्यपूर्व फेरीत चिनी तैपेईच्या सु-यूचा ४-३ असा पराभव केला होता.


भारतीय स्टारने एक दिवस आधी शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईच्या चेन सु-यूचा ४-३ असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. या स्पर्धेत टॉप-४ मध्ये पोहोचणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली होती.


जागतिक क्रमवारीत ४४व्या क्रमांकावर असलेल्या मनिका बत्राने महिला एकेरीत अनेक उलटफेर केले. तिने सुरुवातीच्या फेरीत जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरील चिनी खेळाडू चेन जिंगटोंगला बाहेरचा रस्ता दाखवला.

Comments
Add Comment